Next
समर्थांचा नेतृत्व आराखडा
BOI
Friday, March 09 | 09:45 AM
15 0 0
Share this storyप्रत्येक गोष्ट कष्टाने, प्रयत्नाने साध्य होणारी आहे. जगात अशक्य असे काही नाही. नशिबाने नव्हे तर ‘कष्टाने, ज्ञानाने, प्रयत्नाने व अचूक प्रयत्नाने माणूस यशस्वी व मोठा होतो,’ असा समर्थांचा संदेश आहे. नेतृत्वगुणाबद्दलची तत्त्वे समर्थांनी ३५० वर्षांपूर्वीच दासबोधामध्ये सांगून ठेवली आहेत. ‘मॅनेजमेंट गुरू - दासबोध’ या लेखमालेत आज पाहू या नेतृत्वगुणाबद्दलच्या समर्थांच्या विचारांबद्दल...
............
समर्थांचा नेता हा सतत व कठोरपणे अहंकार बाजूला ठेवून, आत्मपरीक्षण करून, स्वतःचे दोष-अवगुण ओळखून ते बाजूला सारणारा व स्वतःचा सतत विकास साधणारा असा नेता आहे. सतत नव्या गोष्टी शिकून आत्मसात करणारा, अनेक गुण, ज्ञान व कौशल्य यांनी जीवनाचा ‘आंतरशृंगार करणारा’ असा नेता, तसेच नि:स्वार्थी व भव्य कार्य करणारा नेता समर्थांना अपेक्षित आहे. म्हणूनच त्यांनी मूर्ख लक्षणे, पढतमूर्ख लक्षणे, कुविद्या लक्षणे, करंट लक्षणे असे अनेक समास दासबोधात लिहिले आहेत. ते खरे म्हणजे प्रत्येकाने कठोर आत्मपरीक्षण करून आपल्यामध्ये ते अवगुण-दोष आहेत का, हे शोधून काढण्यासाठीच! तसेच अनेक उत्तम गुण, नेतृत्वगुण त्यांनी उत्तम लक्षणे, महंत लक्षणे, नि:स्पृहव्याप लक्षणे अशा अनेक समासांमध्ये सांगितली आहेत. ते म्हणतात, ‘तुमच्या महत्त्वाकांक्षा प्रत्यक्षात आणायच्या असल्या तर खूप कष्ट करा, झटा, भरपूर प्रयत्नशील रहा, झिजा, कीर्ती व यश हे झिजल्याशिवाय येत नाही.’ असे सांगताना ते म्हणतात,

झिजल्यावांचुनि कीर्ती कैंची।
मान्यता नव्हे की फुकाची।
जिकडे तिकडे होते ची ची। अवलक्षणे।।

समर्थ पुढे सांगतात, ‘आपल्या मनातल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करायच्या असतील, ध्येये साध्या करायची असतील, तर दोष टाकले पाहिजेत व उत्तम गुण जीवनात उतरवले पाहिजेत. ती ओवी अशी – 

या कारणे अवगुण त्यागावे। उत्तम गुण समजोन घ्यावे।
तेणे मनासारिखे फावे। सकळ काही।।

‘कळते पण वळत नाही’ त्याला समर्थ ‘पढतमूर्ख’ किंवा शिकला-सवरलेला मूर्ख असे म्हणतात. त्यांचे म्हणणे - 

सजले आणि वर्तले। तेचि भाग्यपुरुष झाले।।
या वेगळे बोलचि राहिले। ते करंटे जन।।

नुसते ट्रेनिंग, वाचन, प्रवचन ऐकणे प्रत्यक्षात आचरणात आणले नाही, कृती केली नाही व दोष टाकले नाहीत, तर अशा माणसाला स्वतःचे हित कळत नाही असेच म्हणावे लागेल. ते म्हणतात -

रात्रंदिवस करी श्रवण। ना सांडी आपुले अवगुण।।
स्वहित आपुले नेणे आपण। तो एक पढतमूर्ख।।

त्यापुढे जे स्वतःच्या दोषांचे, अवगुणांचे समर्थन करतात, ते सुधारायची काहीही शक्यता नाही, असे समर्थ म्हणतात. ते स्वतःच्या दोषांचे समर्थन करून मोठे पाप करताहेत, असे समर्थ म्हणतात. अशा वृत्तीला ते सगळ्यात मोठा दोष, अवगुण समजतात. या संबंधातील ओवी पुढीलप्रमाणे -

सकळ अवगुणांमध्ये अवगुण।
आपले अवगुण वाटती गुण। 
मोठे पाप। करंट पण चुकेना की।।

त्यामुळे समर्थांना अपेक्षित असलेला नेता हा नुसता नेमलेला (Appointed Leader) नाही, तर जो सारे दोष, अहंकार बाजूला सारून अनेक गुणांनी, ज्ञानाने व स्वतःच्या कर्तृत्वाने सिद्ध झालेला व ‘ Walk Your Talk’ (बोले तैसा चाले) या सूत्राने चालणारा नेता आहे.

नेतृत्वाचे अनेक गुण समर्थ सांगतात. नेत्याकडे आंतर-परीक्षा, सावधपणा, उत्तम वागण्या-बोलण्याची कौशल्ये (InterPersonal Skills), संवादाचे कौशल्य, भावनिक बुद्धिमत्ता हे गुण हवेत. तो खूप कष्ट व प्रयत्न करणारा, पण केवळ खूप प्रयत्न नाहीत, तर अचूक ज्ञान व कौशल्यावर आधारित प्रयत्न (Working Hard, Working Smart) करणारा, उत्तम Delegation करणारा असा नेता समर्थांना अपेक्षित आहे. याविषयी समर्थांच्या अनेक ओव्या आहेत, ज्यावर एक मोठे पुस्तक तयार होईल. नमुन्यादाखल काही ओव्या आपण पाहू.

समर्थांचा प्रयत्नांवर इतका जबरदस्त भर आहे, की संत असूनसुद्धा ‘प्रयत्न हाच देव’ असे स्वरूप प्रयत्नाला देतात. तसेच कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक असावा, असे सांगताना ते म्हणतात - 

केल्याने होत आहे रे। आधी केलेचि पाहिजे। 
यत्न तो देव जाणावा। अंतरी धारता बरे।।

जणू काही ते फिलिप्स क्रॉस्बी या अमेरिकन क्वालिटी गुरूचे तत्त्व ३५० वर्षांपूर्वी सांगताहेत. ज्याला आजच्या भाषेत आपण ‘Do it Right, First Time, everytime’ असे म्हणतो.

नेतृत्व विकासात सतत शिकणे व उरलेला सगळा वेळ समर्थांच्या भाषेत ‘एक एक क्षण’ हा वाया न घालवता ज्ञान/कौशल्य संपादन करण्यात खर्च केला पाहिजे, ज्याचा आपल्या व्यवसायात, नोकरीत व सांसारिक व्यवहारात यश, विकासासाठी उपयोग होईल. या संदर्भातील ही ओवी पाहा - 

ऐक सदेवपणाचे (यशस्वी माणसाचे ) लक्षण।
रिकाम्या जाऊ नेदी येक क्षण।
प्रपंच-व्यवसायाचे ज्ञान। बरे पाहे।।

लोकांना तुमच्या उत्तम गुणवत्तेच्या कामाने तुम्ही हवेहवेसे वाटले पाहिजेत. तुमची त्यांना सारखी ‘चटक’ लागली पाहिजे. आठवण झाली पाहिजे, असे म्हणताना ते सांगतात -

काया बहुत कष्टवावी। उत्कृष्ट कीर्ती उरवावी।
चटक लाऊनी सोडावी। काही येक।।
कष्टेविण फळ नाही। कष्टेविण राज्य नाही।
केल्याविण होत नाही। साध्य जनी।।

प्रत्येक गोष्ट कष्टाने, प्रयत्नाने साध्य होणारी आहे. जगात अशक्य असे काही नाही. नशिबाने नव्हे तर ‘कष्टाने, ज्ञानाने, प्रयत्नाने व अचूक प्रयत्नाने माणूस यशस्वी व मोठा होतो,’ असा समर्थांचा संदेश आहे.


श्रीनिवास रायरीकर
- श्रीनिवास रायरीकर

(लेखक ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर’चे माजी संचालक आहेत. ते दासबोधाचे अभ्यासक असून, ‘दासबोध : नेतृत्व आणि व्यक्तिविकास’ या विषयावर ते कार्यशाळा घेतात. ‘मॅनेजमेंट गुरू - दासबोध’ या दर शुक्रवारी प्रसिद्ध होणाऱ्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/5DePk6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link