Next
जागतिक युद्धांचा इतिहास
BOI
Sunday, August 19, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

पहिल्या महायुद्धातील विश्रांतीचा एक क्षण

‘युद्धस्य कथा रम्या’ असे म्हणतात. त्यात कितीही क्रौर्य, हिंसा आणि हानी झाली असली, तरी त्याबद्दल ऐकताना, बघताना किंवा वाचताना अंगावर रोमांचकारी काटा उभा राहतो. मानवजातीला पुन्हा तशा भीषण युद्धांना तोंड देण्याची वेळ येऊ नये, असा इशारा त्यातून मिळतो. ज्येष्ठ लेखक, अनुवादक रवींद्र गुर्जर ‘किमया’ सदरात 
आज लिहीत आहेत जागतिक युद्धांच्या इतिहासाबद्दल....
............
आजवर जगात ६५ हजार लहान-मोठी युद्धे झाली, असे नुकतेच वाचनात आले. मानवजातीचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. रानावनांत वस्ती करणाऱ्या टोळ्यांमध्ये आपल्या अस्तित्वासाठी अनेक युद्धे झाली असतील. त्यांची नोंद कुठे मिळणार? त्यामुळे एकूण युद्धांची संख्या लाखाच्या वरही गेली असेल. रामायणाचा काळ फारच जुना आहे. त्यामुळे राम-रावण युद्ध सोडून द्या. द्वापार युगात सर्वाधिक गाजलेले युद्ध म्हणजे कुरुक्षेत्रातील महाभारत संग्राम. त्यात सर्व मिळून सुमारे ३०-४० लाख लोक धारातीर्थी पडले. पांडवांकडचे सात आणि कौरवांचे पाच असे बारा जणच त्यात वाचले.

भारतीयांचा सहभाग

नंतर राज्याराज्यांमध्ये झालेली युद्धे. सम्राट अशोकाने कलिंगासह सर्व राज्ये युद्ध करून जिंकली. त्यातील हत्याकांडांचा उबग येऊन त्याने अखेर बौद्ध धर्माचा स्वीकार केला. पुढे चंद्रगुप्त मौर्य आणि सिकंदर यांचा संघर्ष. नंतर शक, हूण, मोगल यांची आक्रमणे. हे झाले भारतामधील. जगभर, देशादेशांत तसाच रक्तरंजित इतिहास लिहिला जात होता. रामायण-महाभारतकालीन युद्धे ही खऱ्या अर्थाने पहिली दोन महायुद्धे.

कालानुक्रमे युद्धकलेचा विस्तार :
ऋग्वेदात (पाच हजार वर्षांहून जुना काळ) दहा राजांमधील, म्हणजे देशांमधील युद्धाचा उल्लेख आहे. युद्धविषयक विचार (उपपत्ती), सैन्याची रचना, विविध प्रकारची अस्त्रे-शस्त्रे या गोष्टी त्या काळातही लोकांना ज्ञात होत्या. आक्रमणापेक्षा बचावासाठी त्यांचे महत्त्व होते. गावाला संरक्षक भिंती होत्या. राजवाड्याभोवती खंदक (त्यात पाणी) आणि बुरुज होते. युद्धासाठी प्रशिक्षित घोडे आणि हत्ती यांचा वापर होई. चाणक्याने ‘अर्थशास्त्र’ या आपल्या ग्रंथात प्राचीन भारतीय युद्धकलेचे तपशीलवार वर्णन केलेले आहे. त्यात राजे-महाराजे प्रवीण/तरबेज होते. चंद्रगुप्त मौर्याने संपूर्ण भारतभर राज्य करून आपल्या सीमांचा विस्तारही केला. त्याच्याकडे ३० हजार शस्त्रसज्ज घोडदळ, नऊ हजार हत्ती आणि सहा लाखांचे पायदळ होते. ते जगातील सर्वांत मोठे लष्करी दल मानले जाते.

युद्ध म्हणजे राजकीयदृष्ट्या भिन्न अस्तित्व असलेल्या देशांमधील संघर्ष. ते दीर्घ काळ चालते, त्यात अतोनात हिंसा आणि हानी होते. सामाजिक आणि आर्थिक ऱ्हास होतो. त्याचा परिणाम दीर्घ काळ भोगावा लागतो. हेतुपुरस्सर, पूर्वनियोजित, मोठ्या प्रमाणात पसरलेला राजकीय हिंसाचार, अशी युद्धाची व्याख्या करता येते.

युद्धाचे प्रकार अनेक आहेत. १) शीतयुद्ध, २) वसाहतींमधील युद्ध, ३) स्वातंत्र्यासाठी युद्ध, ४) मुक्तिसंग्राम, ५) जनतेने केलेली राज्यक्रांती, ६) सीमेवरील युद्धे, ७) धार्मिक युद्ध, ८) अघोषित (पोलिसी) युद्ध, ९) जागतिक महायुद्ध, १०) अण्वस्त्र वापराचे युद्ध, इत्यादी इत्यादी. दहशतवाद, नक्षलवाद, अंमली पदार्थांच्या व्यापारासाठी होणारे संघर्ष ही युद्धाचीच उदाहरणे आहेत.

युद्धभूमीही अनेक प्रकारच्या आहेत. कुरुक्षेत्राप्रमाणे जमिनीवर चालणारे, पाणी व आकाशातील, जंगलात, वाळवंटी, पर्वतीय, खड्डे आणि भुयारातून चालणारे युद्ध (व्हिएतनाम) इत्यादी. त्यात वापरली जाणारी शस्त्रेही भिन्न भिन्न प्रकारची आहेत. रासायनिक आणि जंतुफैलावाचाही त्यात समावेश होतो. विस्तारभयास्तव त्यांचा तपशील येथे देत नाही. परंतु ते अभ्यासनीय आहे.

त्यांचा काळही महत्त्वाचा ठरतो. अश्मयुगीन (प्रागैतिहासिक), ग्रीक, अझ्टेक, सेल्टिक, गोथिक, माया संस्कृतीमधील, रोमन, मध्ययुगीन अँग्लो-सॅक्सन, नेपोलियनकालीन, औद्योगिक आणि आधुनिक युद्धे. संगणकांच्या पिढ्यांप्रमाणे युद्धप्रकारांतही काळानुसार बदल होत गेले. सुरुवातीला फक्त मानवी सेना, सैन्यरचना यांचा वापर होता. पुढे शस्त्रे विकसित झाली. बंदुका, तोफा, मशीनगन्स आल्या. गनिमा कावा, अचानक केलेले हल्ले पुढे आले. आणि आधुनिक काळातील युद्धनीती आणि शस्त्रास्त्रे.

लष्करात वरिष्ठांपासून खालपर्यंत असलेले अधिकार, आज्ञापालन, व्यूहरचना, हेरांची नियुक्ती, गोपनीय माहिती, शस्त्रनिर्मिती व वापर, शिस्तभंगाबद्दल कोर्टमार्शल हेसुद्धा युद्धशास्त्राचेच विषय आहेत. आपल्या देशाच्या रक्षणासाठी सैन्यदले प्राणार्पण करण्यास सिद्ध असतात. युद्धांमध्ये होणारी मनुष्यहानी आणि संपत्तीचा विनाश या गंभीर व चिंतनाच्या गोष्टी आहेत. लढायांमधील मृत्यूंचे काही बोलके आकडे पाहा.

चीनमध्ये तीन राज्यांमधील युद्ध - सुमारे चार कोटी (दुसरे-तिसरे शतक)
मुघल आक्रमणे - चार कोटी (१३-१४वे शतक)
तैमूरलंगचे हल्ले - दोन कोटी (१४वे शतक)
शीतयुद्ध - तीन ते १० कोटी (१९४७ ते १९९१)

दोन जागतिक महायुद्धांमधील मनुष्यहानी पुढे दिलेली आहे. अमेरिकन, फ्रेंच, रशियन राज्यक्रांतींचाही इतिहास रक्तरंजित आहे.

‘मिलिटरी इंटेलिजन्स’ ही एक आधुनिक शाखा आहे. खऱ्याखोट्या प्रचार-प्रसाराचा भडिमार, मानसिक, युद्धशास्त्र, इलेक्ट्रॉनिक यंत्रणेचा वापर करून माहितीची देवघेव, गुप्तहेरांची फौज, साम-दाम-दंड-भेद ही प्राचीन काळापासून चालत आलेली नीती, यांचा प्रभावी वापर चालू असतो.

१९६५ आणि ७१ साली भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध झाले. तशा लहान-मोठ्या चढाया (कारगिलसारख्या) चालूच आहेत. १९६२मध्ये चीनबरोबर संग्राम झाला. भारतीय भूमी ताब्यात घेण्याच्या चीनच्या कारवाया चालूच आहेत. आपापसात युद्ध पेटण्यासाठी त्या पुरेशा ठरू शकतात. अमेरिकेने पुकारलेले व्हिएतनाम युद्ध दीर्घ काळ चालले आणि त्यात अमेरिकेला माघार घेण्याची नामुष्की पत्करावी लागली.

असा प्राचीन काळापासून हजारो युद्धांचा इतिहास आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होते, असे म्हणतात. त्यातून धडे न घेणे म्हणजे पुन:पुन्हा अनर्थांना आमंत्रण!

आधुनिक काळातील पहिले महायुद्ध सन १९१४ ते १८ यादरम्यान घडले. दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता सन १९३९ ते ४५. या दोन्ही युद्धांवर हजारो पाने लिहिली गेली आणि शेकडो चित्रपट निर्माण झाले. दुसऱ्या महायुद्धाची व्याप्ती मोठी असल्याने त्यावर आजपर्यंत अनेकानेक पुस्तके प्रसिद्ध झाली. या दोन्ही युद्धांचा थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत. ‘युद्धस्य कथा रम्या’ असे म्हणतात. त्यात कितीही क्रौर्य, हिंसा आणि हानी झाली असली, तरी त्याबद्दल ऐकताना, बघताना किंवा वाचताना अंगावर रोमांचकारी काटा उभा राहतो. मानवजातीला पुन्हा तशा भीषण युद्धांना तोंड देण्याची वेळ येऊ नये, असा इशारा त्यातून मिळतो. एखाद्या क्षुल्लक शॉर्टसर्किटमुळे १०-२० मजली इमारत जळून खाक होऊ शकते, त्याप्रमाणे लहानशा ठिणगीमुळेसुद्धा युद्धाचा भडका पेटू शकतो, हे आपल्याला ठाऊक आहे. त्या तणावग्रस्त वातावरणात आपण आजही वावरत आहोत.

पहिले महायुद्ध (१९१४-१८)
हे ‘ग्रेट वॉर’ या नावानेही ओळखले जाते. जुलै १०१४मध्ये ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले. रशिया सर्बियाच्या बाजूने उभा राहिला, तर जर्मनीने ऑगस्टमध्ये रशियाविरुद्ध लढाई सुरू केली. ब्रिटन हे जर्मनांच्या विरोधात गेले. युरोपमध्ये सर्वत्र तणाव पसरला होता. अनेक देश युद्धात ओढले गेले. जर्मनीचा लाजिरवाणा पराभव झाला. फ्रान्सच्या व्हर्सेल्समध्ये अखेर शांतता करार होऊन युद्ध संपले. अंदाजे एक कोटी लोक त्यात मृत्युमुखी पडले. जर्मनीने आपल्या अपमानाचा बदला दुसऱ्या महायुद्धात घेतला.

हिटलरचे फौज निरीक्षण

दुसरे महायुद्ध (१९३९-४५)
हे विसाव्या शतकातील सर्वांत भयानक महायुद्ध. या कालावधीत छळछावण्यांमध्ये झालेली ६० लाख ज्यूंची हत्या, ही मानवजातीला काळिमा फासणारी दुर्दैवी घटना होय. वर्णवर्चस्वाच्या विचाराने पछाडलेल्या जर्मनीच्या अॅडॉल्फ हिटलरने जगावर हे युद्ध लादले. या युद्धाने साऱ्या जगात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक उलथापालथी झाल्या. जपानही त्याला जबाबदार ठरले.

ऑगस्ट १९३९मध्ये जर्मनीने रशियाबरोबर संरक्षणविषयक (मैत्रीचा) करार करून पोलंडवर आक्रमण केले. त्यामुळे ब्रिटन व फ्रान्सने सप्टेंबरमध्ये युद्ध जाहीर केले. जर्मनीने युरोपमधील देश वेगाने पादाक्रांत केले. ब्रिटनमधील कित्येक शहरे बॉम्बवर्षावात उद्ध्वस्त केली. जर्मन पाणबुड्याही हाहा:कार माजवत होत्या. तशात इटलीचा हुकूमशहा मुसोलिनी हिटलरला सामील झाला. त्यांनी एकत्र येऊन ग्रीस आणि युगोस्लाव्हियावर आक्रमण केले. रशियाबरोबरचा करार मोडून जून १९४१मध्ये जर्मनीने रशियावरही हल्ला चढवला. त्यांच्या फौजा मॉस्को आणि लेनिनग्राडपर्यंत (सेंट पीटर्सबर्ग) जाऊन थडकल्या. उत्तर आफ्रिकेत आघाडीवर असलेल्या ब्रिटिश फौजांना माघार घ्यावी लागली. डिसेंबर १९४१मध्ये जपानने पर्ल हाबर्रवर बॉम्बफेक करून अमेरिकेला युद्धात उतरणे भाग पाडले. त्यांच्या हवाई हल्ल्यांमुळे जपानला आग्नेय आशिया आणि ब्रह्मदेशातील मुसंडी आवरावी लागली.

D- Day : ६ जून, १९४४. नॉर्मंडीवर निकराचा हल्ला१९४२पासून जर्मनीच्या पाडावाला सुरुवात झाली. जानेवारी ४३मध्ये स्टालिनग्राडमध्ये त्यांचा पराभव झाला आणि पुढे दीड वर्षात सोव्हिएत युनियनने जर्मनीला देशाबाहेर पूर्णपणे पिटाळले. सन १९४२-४३ दरम्यान दोस्त राष्ट्रांनी इटलीला नामोहरम करून त्यांना शांतता करारास भाग पाडले. १९४५पर्यंत जर्मनीने तिथे आपल्या फौजा घुसवून निकराचा लढा दिला. १९४४मध्ये दोस्तांनी नॉर्मंडी काबीज करून फ्रान्सला मुक्त केले आणि  त्यांनी जर्मनीत प्रवेश केला. 

नागासाकीवर अणुबॉम्बचा हल्ला
मे ४५मध्ये जर्मनीने शरणागती पत्करली. जपानने आपली कुरघोडी चालूच ठेवली. परंतु ऑगस्ट ४५मध्ये हिरोशिमा-नागासाकीवर बॉम्बहल्ले झाल्यानंतर त्यांना सपशेल लोटांगण घालावे लागले. दुसऱ्या महायुद्धात किमान पाच कोटी लोक मृत्युमुखी पडले. त्यात ज्यूंचे दुर्दैवी हत्याकांड तर होतेच; शिवाय निरपराध नागरिक मोठ्या प्रमाणात बळी गेले. अमेरिका आणि रशिया ही विरोधी विचारसरणीची राष्ट्रे महासत्ता बनली.

तिसऱ्या महायुद्धाचे वेध वारंवार लागले. परंतु सुदैवाने ‘युद्धग्रहण’ अद्याप झालेले नाही. हे (संभाव्य) युद्ध अण्वस्त्रांमुळे काही तासांतच आटोपेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यानंतरचे (कधी काळी घडलेच तर) चौथे महायुद्ध मानवाला दगडी हत्यारांनी करावे लागेल. अर्थात त्यासाठी आतापासूनच दगड-धोंडे गोळा करण्याची गरज नाही. तो फार दूरचा काळ आहे. आजची आव्हाने वेगळी आहेत. त्यासाठी सावध राहू या. 

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search