
भिवंडी : ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील पडघा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत जागतिक अंडी दिन (World Egg Day) विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.

१२ ऑक्टोबर या जागतिक अंडी दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेत ग्रामपंचायत पडघा व पशुसंवर्धन, महिला बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी व पशुसंवर्धन सभापती उज्ज्वला गुळवी, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. व्ही. टी. राईकवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप देशमुख, गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के, पंचायत समिती उपसभापती वृषाली विशे, ठाणे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एल. डी. पवार, सदस्य गुरुनाथ जाधव, जिल्हा परिषद सदस्या श्रेया गायकर, सरपंच पराग पाटोळे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना अंड्यांचे वाटप करण्यात आले. अंड्यांमध्ये बौद्धिक क्षमता वाढविणारे घटक व प्रोटीन्स असल्याने रोज अंडे खाण्याचा सल्ला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच आदिवासींचे कुपोषण हटविण्यासाठी अंडी खाणे महत्त्वाचे आहे, असे डॉ. व्ही. टी. राईकवार यांनी सांगितले.

वर्षातून १८० अंडी खाल्ली गेली पाहिजेत, असे पशुधन विकास अधिकारी (पडघा) डॉ. सुभाष पाठारी यांनी सांगितले. सूत्रसंचालन डॉ. अनुप्रिया जोशी व शिक्षक श्याम मोराणकर यांनी केले.
