Next
अलौकिक बुद्धिमत्ता असलेली सौंदर्यवती
BOI
Sunday, May 27 | 12:45 PM
15 0 0
Share this story

हॉलिवूडमधील अलौकिक बुद्धिमत्ता असलेली सौंदर्यवती अभिनेत्री म्हणजे हेडी लमार. अभिनयासोबतच तिने एक अत्यंत महत्त्वाचा असा वैज्ञानिक शोधही लावला होता. एके काळी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्रीला नंतरच्या काळात विपन्नावस्थेत राहावे लागले. ही अभिनेत्री म्हणजे एक वेगळेच रसायन होते. बुद्धिमान सौंदर्यवती हेडी लमारबद्दल ‘किमया’ सदरात सांगत आहेत ज्येष्ठ लेखक, अनुवादक रवींद्र गुर्जर...
...........
आपल्या सौंदर्याने हॉलिवूड गाजवणारी आणि प्रेक्षकांना घायाळ करणारी ‘बोल्ड’ नटी म्हणून आपण मेरलिन मन्रोला ओळखतो. तिच्याही आधी हेडी लमार ही अभिनेत्री ‘त्याच’ गुणांच्या आधारावर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली होती; मात्र तिला तेवढा गौरव प्राप्त झाला नाही. ती दीर्घ काळ उपेक्षित जीवन जगली. गेल्या वर्षी तिच्यावर ‘बॉम्बशेल : दी हेडी लमार स्टोरी’ या नावाने एक माहितीपट निघाला. तो अवश्यमेव बघण्यासारखा आहे. व्हिएन्नामध्ये (ऑस्ट्रिया) नऊ नोव्हेंबर १९१४ रोजी जन्मलेल्या हेडी लमारला ८६ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. त्यातला अखेरचा बराच काळ तिला विपन्नावस्थेत काढावा लागला. अभिनयाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानात महत्त्वाचे शोध लावणाऱ्या एका प्रतिभासंपन्न व्यक्तीच्या वाट्याला ही अवस्था यावी, हा केवढा दैवदुर्विलास!

पॅरामाउंट कंपनीने काढलेला सेसिल बी. डेमिल दिग्दर्शित ‘सॅमसन अँड डिलायला’ हा १९४९मधला अतिभव्य पौराणिक चित्रपट होता. त्यात सॅमसनची भूमिका व्हिक्टर मॅच्युअर आणि डिलायलाच्या भूमिकेत हेडी लमार होती. सॅमसन हा प्रचंड शक्तिमान होता आणि त्या शक्तीचे गुपित जाणून घेण्यासाठी डिलायला त्याला फशी पाडते. परंतु अखेरीस तो जुलमी राजवटीचा नाश करतो, असे थोडक्यात कथानक आहे. लमारला या चित्रपटाने विलक्षण प्रसिद्धी मिळाली.

हॉलिवूडमध्ये एमजीएम आणि कोलंबिया इत्यादी कंपन्यांचा जो सुवर्णकाळ मानला जातो, त्याची ती एक भागीदार होती. सुरुवातीच्या काळात ती ‘पिनअप’ कलाकार म्हणून अतोनात लोकप्रिय ठरली होती. आपल्या अप्रतिम लावण्याचे आणि आकर्षक स्त्रीदेहाचे छायाचित्रांद्वारे प्रदर्शन, असा ‘पिनअप’चा अर्थ आहे. अशा अनेक नट्या त्या वेळी गाजलेल्या होत्या. हेडीने एकूण सहा विवाह केले; पण ते टिकले नाहीत. तिची अलोट संपत्ती मात्र त्यात उधळली गेली. क्लार्क गेबल आणि स्पेन्सर ट्रेसीसारख्या कलाकारांबरोबर तिने कामे केली.

‘एक्स्टसी’ या झेक चित्रपटाद्वारे ती प्रथम प्रेक्षकांसमोर आली. आपल्या ‘सेक्स अपील’मुळे तिने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. हेडविग इव्हा मारिया कीस्लर हे तिचे मूळ नाव. हॉलिवूडला आल्यावर तिने आपले नाव हेडी लमार असे केले. ‘एमजीएम’बरोबर केलेल्या ‘अल्जिअर्स’ या पहिल्याच चित्रपटाने ‘बॉक्स ऑफिस’वर सनसनाटी निर्माण केली. मनी ऑन दी स्ट्रीट, स्टॉर्म इन दी वॉटर ग्लास, नो मनी नीडेड, एक्स्टसी, अल्जिअर्स, लेडी ऑफ दी ट्रॉपिक्स, आय टेक धिस वूमन, बूम टाउन, कम लिव्ह विथ मी, क्रॉसरोड्‌स, दी हेवनली बॉडी, दी स्ट्रेंज वूमन, सॅमसन अँड डिलायला, ए लेडी विदाउट पासपोर्ट, माय फेव्हरिट स्पाय, लव्हर्स ऑफ थ्री क्वीन्स, दी स्टोरी ऑफ मॅनकाइंड, दी फीमेल अॅनिमल हे तिचे काही निवडक चित्रपट. सन १९३० ते १९५८ असा त्याचा कालखंड होता.

सन १९४१ मध्ये तिने रेडिओवरही कार्यक्रम केले. प्रसिद्धी आणि ऐश्वर्याच्या शिखरावर असूनही तिला समाधान वाटत नव्हते. विज्ञानात तिला गती आणि ओढ होती. १९४२मध्ये तिने आपला संगीतकार मित्र जॉर्ज अँटहील याच्या मदतीसह रेडिओ ध्वनिलहरी प्रक्षेपित करणाऱ्या उपकरणासाठी तिने पेटंट मिळवले. ‘गुप्त संपर्क यंत्रणा’ म्हणून तो शोध ओळखला गेला. सुरुवातीला युद्धकाळात जर्मन नाझींविरुद्ध त्याचा वापर झाला. रेडिओ लहरींमध्ये बदल करून शत्रूला गुप्त संदेशांचे अर्थ लावता येणे त्यामुळे अशक्य होई. युद्धरोखे मोठ्या प्रमाणात विकण्यासाठी सरकारने तिचा उपयोग करून घेतला. लष्करी वापराबरोबरच त्या तंत्रज्ञानाचा सेल्युलर फोनच्या सुधारणेसाठीही (ब्लू टूथ, वाय-फाय इत्यादींसाठी) उपयोग झाला. हेडी लमारला त्या संशोधनामुळे लगेच प्रसिद्धी मिळाली नाही. कारण लोकांना त्याचे महत्त्व त्या वेळी कळण्यासारखे नव्हते. तथापि, सन १९९७मध्ये म्हणजे कित्येक दशकानंतर हेडी आणि जॉर्ज यांना त्यांच्या कामाबद्दल दोन मानाचे पुरस्कार देण्यात आले.

१९५०नंतर तिच्या चित्रपट कारकीर्दीला उतरती कळा लागली. १९५८मध्ये ‘दी फीमेल अॅनिमल’ हा तिचा अखेरचा चित्रपट प्रदर्शित झाला. पुढे १९६६ साली ‘एक्स्टसी अँड मी’ हे तिचे खळबळजनक आणि ‘बेस्टसेलर’ आत्मचरित्र विलक्षण गाजले. तिची सहा लग्ने झाली आणि जास्त काळ टिकली नाहीत. तिसऱ्या नवऱ्यापासून तिला एक मुलगा आणि एक मुलगी झाली. जेम्स नावाच्या एका मुलाला तिने दत्तक घेतले. ५३ साली ती रीतसर अमेरिकेची नागरिक झाली. काही चित्रपटांची निर्मिती तिने स्वत: केली; पण ते चालले नाहीत. त्यात बरीच आर्थिक हानी झाली. तिने आपले उत्तरायुष्य कॅसल बेरीमध्ये (फ्लोरिडा) एकाकीपणात घालवले. १९ जानेवारी २००० रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी तिची इहलोकाची यात्रा संपली.

गेल्या वर्षी, सन २०१७ मध्ये दिग्दर्शक अलेक्झांड्रा डीन हिने ही उपेक्षित कलाकार आणि संशोधिकेच्या जीवनावर ‘बॉम्बशेल : दी हेडी लमार स्टोरी’ या नावाने माहितीपट काढला. अलौकिक सौंदर्य असलेली, उच्च दर्जाचा अभिनय करणारी तारका, तसेच काळाच्या पुढे जाऊन जागतिक पातळीवर महत्त्वाचे संशोधन करणाऱ्या एका स्त्रीला न्याय देण्याचा प्रयत्न त्यात केलेला आहे.

तिच्या संशोधनाबद्दल घेतलेल्या पेटंटची मुदत फारच अल्प होती. त्याचे नूतनीकरण तिने करून घेतले असते, तर ती जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरली असती. त्या अलौकिक प्रतिभासंपन्न विदुषीला/अभिनेत्रीला उतारवयात किती मनस्ताप होत असेल! तिच्या हयातीत जरी तिचा पुरेसा सन्मान झाला नसला, तरी ‘डिलायला’सह तिने केलेल्या असंख्य अविस्मरणीय भूमिका प्रेक्षकांच्या हृदयात कोरलेल्या आहेत.

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link