Next
कादंबरी, कवितासंग्रहाचे प्रकाशन
BOI
Wednesday, January 03, 2018 | 02:39 PM
15 0 0
Share this article:

पुस्तकांचे प्रकाशन करताना मान्यवरमुंबई : पार पब्लिकेशनतर्फे प्रसाद कुमठेकर लिखित ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या कादंबरीचे आणि महेश लीला पंडित लिखित ‘चष्मांतरे’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.

ज्येष्ठ चरित्रकार वीणा गवाणकर, डॉ. आशुतोष पाटील, गणेश वसाईकर प्रा. विवेक कुडू आणि वर्जेश सोलंकी यांच्या हस्ते विरार येथील वि. वा. कॉलेजमध्ये हा प्रकाशन सोहळा झाला. या वेळी नाटककार, कथालेखक जयंत पवार यांच्या मनोगताचे वाचन कवी इग्नेशियस डायस यांनी केले.

जयंत पवार म्हणाले, ‘‘चष्मांतरे’ आणि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ ही दोन्ही पुस्तके आजची आहेत आणि आजच्या संदर्भात महत्त्वाची आहेत. ‘सत्यमेव जयते’ हे जपलेले ब्रीद कोसळून बघताना आपण पाहत आहोत या काळात नाकासमोर जगणाऱ्या माणसाची होणारी गोची, त्यांच्या शोकांतिका होताना पाहणाऱ्यांची होणारी गोची आणि बदलेले जगण्याचे निकष-नॉर्म्स महेश लीला पंडित आणि प्रसाद कुमठेकर या दोन युवकांनी त्यांच्या अनवट शैलीत शब्दबद्ध केले आहेत.’

पुस्तक प्रकाशनावेळी बोलताना ज्येष्ठ चरित्रकार वीणा गवाणकरप्रा. कुडू यांनी ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या कादंबरीचे मर्म उलगडून सांगितले. कादंबरीत अगदी वेगळ्या शैलीत लिहिलेले उदगीरे आणि बोली या प्रकरणामुळे कादंबरी अतिशय वाचनीय झाली आहे. या प्रकरणामुळे आणि बोलीतील शब्दाची अर्थसूची दिल्यामुळे आशयाची दारे किलकिले झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘इतक्या लवकर म्हणजेच ‘बगळा’नंतर दुसरे पाऊल इतके दमदार टाकले याचा आनंद वाटतो. ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ ही कादंबरी म्हणजे बोलीचा समर्थ आविष्कार आहे. ही कादंबरी म्हणजे उदगीर गावाचे चरित्र आहे. गावची परिस्थिती हीच हा कादंबरीचा नायक आहे. या परिस्थितीचे लेखकाने केलेले निरीक्षण आणि त्याचे लेखकाला झालेले आकलन बारकाईने नोंदवत लेखकाचा कॅमेरा नुसता दर्शन करवत नाही, तर गावाच्या एकूण जगण्यात तळ गाठतो. यातील भाषिक आणि गोष्ट सांगण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे वाचक या कादंबरीच्या अधिक जवळ पोहोचतो,’ असे विवेचन जेष्ठ चरित्रकार वीणा गवाणकर यांनी केले.

महेश लीला पंडित लिखित ‘चष्मांतरे’ या कवितासंग्रहावर बोलताना कवी गणेश वसईकर म्हणाले, ‘महेशची कविता ही भाषेविषयी कमालीची आस्था व्यक्त करते. वर्तमानात जगताना माणसाची होणारी दमछाक, नातेसंबंधातील कुरूपता व स्वतःविषयी वाटणारा संशय, माणसाचा संकोच, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे दबलेपण ही कविता प्रकट करते.’

डॉ. पाटील म्हणाले, ‘समकाळातील औपचारिक, पण मुळात ढोंगी, दिखाऊ अशा मानवी जीवनव्यवहाराचा सामना कसा करावा, याने अस्वस्थ असलेले हे कविमन आशय, अभिव्यक्ती आणि त्यांच्या मुळाशी असणारी भाषा अशा सगळ्याच स्तरांवरून तिरसटपणे व्यक्त होते. माणूस म्हणून आपल्या अस्तित्वाच्या खुणा सांभाळू पाहणारे हे कविमन संवेदना, विचारांपासून स्वत:ला दूर नेऊन जगू शकत नाही. त्यामुळेच वैयक्तिक ते सामाजिक अशा सर्व स्तरांवरून गोची झालेल्या समकालीन माणसाचे म्हणणे अगदी त्याच्या मराठी-इंग्लिश शब्दांच्या मिश्रणातून अभिव्यक्त करणारी ही रचना आहे.’

कवी फेलिक्स डिसोजा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शैलेश साळवी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.


(‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या पुस्तकाबद्दलच्या कार्यक्रमाची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search