Next
गरजू मुलींच्या शिक्षणाची सोय करणाऱ्या ‘भाऊबीज निधी’ची शताब्दी
BOI
Thursday, October 10, 2019 | 05:08 PM
15 0 0
Share this article:महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी १२३ वर्षांपूर्वी पुण्यात स्त्री शिक्षण संस्था सुरू केली. त्यांचे सहकारी गो. म. चिपळूणकर यांनी १९१९मध्ये भाऊबीज निधीची सुरुवात केली. पैशांअभावी ज्या मुलींचे शिक्षण अडते, त्यांच्यासाठी समाजातील व्यक्तींनी आपापल्या क्षमतेप्रमाणे आर्थिक मदत करायची, असे याचे स्वरूप. त्यातून आजपर्यंत हजारो मुली शिकल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या, उत्तुंग कामगिरी केली. या योजनेला आता १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने या योजनेची माहिती देणारा हा लेख...
....
आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो, ते आपलं अस्तित्व असतं...
आणि जे आपल्या माघारी चर्चिलं जातं, ते आपलं व्यक्तिमत्त्व असतं..
व्यक्तिमत्त्व स्वच्छ असेल, तर आपल्या कार्यरूपी अस्तित्वालासुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो.... 

वरील ओळींना साजेसे व्यक्तिमत्त्व म्हणजेच भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यांनी १२३ वर्षांपूर्वी रोवलेले बीज आज एखाद्या बहरलेल्या विस्तृत वटवृक्षाप्रमाणे ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था’ म्हणून नावारूपाला आले आहे. स्त्रियांच्या उन्नतीसाठी स्थापन केलेल्या या संस्थेचे कार्य आजही अविरत सुरू आहे. 

Painting By - Aditya Shinde Std - V, Div. - Venus, MKSSS's Vision English Medium School, Narhe,Pune

ही संस्था मुलींसाठी शैक्षणिक व सामाजिक कार्य करीत असून, संस्थेचा विस्तार पुणे, वाई, सातारा, कामशेत, रत्नागिरी, वसई, नागपूरपर्यंत पोहोचला आहे. आज संस्था ६४ शाखांच्या माध्यमातून ३५ हजार विद्यार्थिनींना शिक्षण व संस्कार देऊन स्वावलंबी बनविण्याचे कार्य सक्षमपणे करत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, तसेच दुर्गम व ग्रामीण भागातील हुशार, होतकरू विद्यार्थिनींचे शिक्षण पैशांअभावी थांबू नये याचा विचार संस्थेत करण्यात आला. अशा विद्यार्थिनींना शाळा व वसतिगृहात प्रवेश देऊन, समाजातील दानशूरांच्या मदतीने अशा मुलींचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी १९१९ साली संस्थेचे आजन्म सेवक गो. म. चिपळूणकर यांनी ‘भाऊबीज निधी’ योजनेची सुरुवात केली. 

Painting By - Nandita Gurav Std.-VIII, Div. - Mercury, MKSSS's Vision English Medium School

सध्याच्या सामाजिक असुरक्षित वातावरणात निराधार, एकल पालकत्व असलेल्या, मोलमजुरी करणाऱ्या मातांच्या मुलींना मदत करणे हा या योजनेचा उद्देश आजही कायम आहे. आतापर्यंत भाऊबीज निधीच्या साह्याने समाजातील हजारो विद्यार्थिनींनी शिक्षण घेतले असून, त्यातील अनेक विद्यार्थिनी आज समाजात विविध स्तरावर उच्च पदे भूषवित आहेत. स्त्री शिक्षणाच्या कार्याबरोबरच संस्था सामाजिक बांधिलकीलाही तेवढेच महत्त्व देते. संस्थेमध्ये मुलींना शैक्षणिक व वसतिगृहाच्या सोयी अतिशय माफक दरात व अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह उपलब्ध आहेत. 

संस्थेमध्ये अशा अनेक मुली आहेत ज्या शिक्षणासाठी पूर्णत: किंवा अंशत: संस्थेवर अवलंबून आहेत. संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहामध्ये बालकल्याण मंडळाने सांभाळण्यासाठी सोपविलेल्या मुलींचाही समावेश असतो. वयाच्या १८ वर्षापर्यंत या मुली शिक्षण व निवासासाठी पूर्णत: संस्थेवर अवलंबून असतात. 

Painting By - Parth Kapade Std-II, Div. - Earth. MKSSS's Vision English Medium School

गरुडाइतके उडता येत नाही, म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही. तसेच, सत्कार्यासाठी दिलेली लहान सेवाही मोठीच असते. स्त्री-शिक्षणाच्या या महान कार्याशी आपले भावनिक नाते जोडण्यासाठी अगदी सर्वसामान्य नागरिकही भाऊबीज स्वयंसेवक म्हणून व्यक्तिश: समाजातून मदत जमा करू शकतात किंवा क्षमतेनुसार जास्तीत जास्त भाऊबीज निधी देऊन मानवतेच्या या कार्यात सहभागी होऊ शकतात. मंगलकार्य, सण, समारंभाच्या निमित्ताने किंवा आप्तस्वकीयांच्या स्मृतिप्रीत्यर्थही भाऊबीज निधी देता येऊ शकतो. संस्थेवर असणारा समाजाचा विश्वास, भाऊबीज स्वयंसेवकांचा नि:स्वार्थीपणा, समाजाचे दातृत्व, संस्थेचा पारदर्शी कारभार, भाऊबीज निधी संकलनाच्या योजनेचा सामाजिक आशय व विनम्र आवाहन यांमुळे ही योजना गेली १०० वर्षे अव्याहतपणे चालू आहे. हा निधी संकलित करण्यासाठी संस्थेने विविध योजना राबविल्या आहेत. त्यापैकी काही योजना अशा – 

Painting By - Shaista Sayyed, Std - V, Div. - Mercury. MKSSS's Vision English Medium School

आर्थिक पालकत्व योजना :
शालेय विद्यार्थिनींसाठी आर्थिक पालकत्वाची वार्षिक रक्कम शालेय शुल्क व वसतिगृह शुल्क मिळून ४० हजार रुपये एवढी आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी आर्थिक पालकत्वाची वार्षिक रक्कम ५० हजार रुपये वसतिगृह शुल्क आणि ७० हजार रुपये महाविद्यालयीन शुल्क एवढी आहे. ज्या विद्यार्थिनीचे आर्थिक पालकत्व घ्यायचे आहे, त्या विद्यार्थिनीचे नाव, पत्ता, इयत्ता/वर्ष, कौटुंबिक पार्श्वभूमी, शैक्षणिक प्रगती इत्यादी बाबींची माहिती कळविली जाते. 

दाननिधी योजना : या योजनेअंतर्गत तुम्ही एखादी ठराविक रक्कम संस्थेकडे ठेव म्हणून ठेवू शकता. १० हजार ते ४९ हजार इतकी देणगी ठेवल्यास पुढील पाच वर्षे आणि ५० हजार रुपयांवरील रक्कम ठेवल्यास पुढील १० वर्षे त्यावरील व्याजाचा विनियोग दात्याच्या इच्छेप्रमाणे केला जातो. उदाहरणार्थ - वृद्धाश्रमासाठी, गरजू व होतकरू मुलींना शिष्यवृत्ती, पारितोषिके, भोजन व्यवस्था इत्यादींसाठी. मुदत संपल्यानंतर मूळ रक्कम संस्थेच्या अक्षयनिधीत जमा होते. हा अक्षयनिधी संस्थेच्या इतर विकास योजनांकरिता वापरला जातो. 

Painting By - Sarth Dhumal, Std - V, Div. - Mercury. MKSSS's Vision English Medium School

शैक्षणिक साहित्य साह्य योजना :
या योजनेअंतर्गत गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक संच उपलब्ध करून दिले जातात. या संचामध्ये दोन शालेय गणवेश, बूट-मोजे, शाळेचे दप्तर, पुस्तके, वह्या, कंपासपेटी, स्वेटर, परीक्षेचे पॅड, चित्रकला-हस्तकला साहित्य इत्यादींचा समावेश आहे. या शैक्षणिक संचाची किंमत प्रत्येकी ३५०० रुपये आहे. अशा एका किंवा अनेक संचांसाठी देणगी देता येऊ शकते. 

अशा सर्व योजनांची माहिती मिळवण्यासाठी आणि संस्थेचे कार्य अधिक जवळून पाहण्यासाठी सर्वांनी संस्थेला एकदा अवश्य भेट द्यावी ही कळकळीची विनंती. 

- वैशाली बोरनारकर

अधिक माहितीसाठी संपर्क : 
महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्था, कर्वेनगर, पुणे – ४११०५२
फोन : (०२०) २५३१३०००, २५३१३२००
ई-मेल : administrator@maharshikarve.org
वेबसाइट : https://maharshikarve.ac.in/

(To read this article in English, please click here.)

(अभिनेते आनंद इंगळे यांनी केलेल्या आवाहनाचा सोबतचा व्हिडिओ जरूर पाहा.)BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
जयश्री दलाल About 7 Days ago
ह्या उपक्रमात सर्वांनी भाग घेतला पाहिजे असा हा छान उपक्रम आहे कारण आपण सर्वच ह्या समाजाचे बांधिल आहोत. देणेकरी आहोत.माझा नक्कीच यात सहभाग आहे.
1
0
Dilip Dalal About 7 Days ago
Khup chan upakram aahe.mahit asalelya Sarva group la forward karato.upakramas mazya shubhechya.
0
0

Select Language
Share Link
 
Search