Next
माझी साहित्यिक भूमिका
BOI
Saturday, April 29 | 10:18 AM
15 7 0
Share this story

गेली सुमारे ४५ वर्षे साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ अनुवादक आणि लेखक रवींद्र वसंत गुर्जर आज, २९ एप्रिल रोजी ७२व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्या निमित्ताने त्यांनी व्यक्त केलेले हे मनोगत...  
.............
रवींद्र गुर्जरवयाची एकाहत्तरी बघता बघता उलटली. मानवी जीवनात अपरिहार्य असलेली सुखदु:खे आणि मानापमान अनुभवले. संगीत, चित्रपट, नाटक, प्रवास आणि लोकसंग्रहातून मिळालेल्या आनंदाने त्या सगळ्यांवर मात केली. त्या दृष्टीने मी कृतार्थ आहे. 

या कालावधीतील सुमारे ४५ वर्षे म्हणजे फार मोठा काळ साहित्य क्षेत्राशी या ना त्या नात्याने संबंध आला. वाचनाचे संस्कार लहानपणीच घरी झालेले होते. सर्व प्रकारची पुस्तके असोशीने वाचली जात होती. त्यातील चरित्रे, साहसकथा, चित्तथरारक कथानके आणि धडाडी विशेष आवडीची बनली. हळूहळू माझ्यातील लेखक घडत गेला. त्यातूनच ‘पॅपिलॉन’सारखी विलक्षण आत्मकथा अनुवादासाठी पुढे आली. या पुस्तकामुळे मी पूर्णवेळ लेखक झालो आणि त्याने इतिहास घडवला. अनुवादाच्या क्षेत्रात एक मानदंड निर्माण झाला. आजवर ३५ पुस्तके प्रकशित झाली. महाराष्ट्रात आणि मराठी लोकांचे वास्तव्य असलेल्या सर्व जगात लाखो वाचक मिळाले. त्यांनी दिलेले प्रेम अवर्णनीय आहे.

साहित्य क्षेत्राशी आलेला हा संबंध फक्त लिखाणापुरता मर्यादित राहिला नाही. स्वतःचे प्रकाशन, वितरण, वाचक चळवळ, ग्रंथालयांच्या विकासाची चळवळ, अनेक साहित्य संस्थांशी संबंध आणि स्वायत्त मराठी विद्यापीठाच्या कार्यात सहभाग होत राहिला. नवोदित लेखकांची अनेक पुस्तके स्वतः प्रकाशित केली आणि त्यांना स्वतंत्र प्रकाशनासाठी योग्य ते मार्गदर्शन केले. मुलाखती आणि व्याख्यानांसाठी महाराष्ट्रभर दौरे केले. साहित्यिक जगताशी संबंधित व्यक्ती आणि संस्था, तसेच त्यांचे उपक्रम यांपैकी अपरिचित असे काहीच राहिले नाही. अनेक मोठ्या लोकांचे प्रेम आणि सहवास लाभला.

सन १९७३पासून प्रकाशन व्यवसायात कसा कसा बदल होत गेला, याचा मी जागृत साक्षीदार आहे. पुस्तक विक्रीतील वाढत जाणारे कमिशन आणि घटत जाणारी विक्री, याचा आलेख स्पष्टपणे समोर आहे. वितरणाचे नवनवे उपक्रम, त्यांना मिळणारे कमी-जास्त यश, ‘ई-बुक्स’चा उदय आणि आता ‘प्रिंट ऑन डिमांड’ म्हणजे हव्या तेवढ्याच १००-२०० प्रती छापणे हे होत गेलेले बदल अभ्यासाचा विषय बनले. आघाडीचे लेखक, प्रकाशक, विक्रेते आणि पत्रकार यांच्याशी स्नेहसंबंध जुळले. हा सर्व प्रवास विलक्षण आनंदाचा ठरला.

लेखन हा मुख्य व्यवसाय निवडल्यानंतर साधे आणि गरिबीचे जीवन निश्चित झाले. याचा अर्थ, जगण्यातील किमान गरजा भागल्या गेल्या. परंतु भोवताली वाढत गेलेल्या आर्थिक समृद्धीचे वारे घरापर्यंत पोचले नाही. तथापि, लाखो वाचकांच्या हृदयात जे प्रेमाचे स्थान निर्माण झाले, त्या ‘श्रीमंती’ची तुलना कुबेराशीच करावी लागेल. यापरते भाग्य ते कोणते!

यापुढील नियोजित कार्ये म्हणजे ग्रंथ-वितरण व्यवस्थेसाठी नवे प्रयोग, ग्रंथालय चळवळीत सक्रिय सहभाग, स्वायत्त मराठी विद्यापीठाचा पाया भक्कम करणे आणि एका वर्षात किमान ५०० अनुवादक निर्माण करणे. अर्थात हे एकट्याचे कार्य नाही. त्यात अनेकांचा निश्चित सहभाग असेल.
तळागाळात प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात अत्युच्च पदावर जाऊन पोचतात. साहित्य क्षेत्रातील अत्युच्च पद म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. साहित्य जगतात साडेतीन तपे तळमळीने अखंड कार्य करणाऱ्या लेखकाच्या मनात ते प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होणे स्वाभाविक नाही काय?

- रवींद्र गुर्जर
ई-मेल : rvgurjar@gmail.com     

(रवींद्र गुर्जर यांची साहित्यसंपदा पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 7 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link