Next
ठाणे शहराची सहल...
BOI
Saturday, July 20, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

तलाव पाळी

‘करू या देशाटन’
सदराच्या मागील १० भागांत आपण रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती घेतली. आजपासून पाहू या ठाणे जिल्ह्यातील ठिकाणे. सुरुवात ठाणे शहरापासून...
...........
ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यावर ठाणे, मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ एवढे तालुके या जिल्ह्यात आहेत. मीरा-भाईंदर वगळता पश्चिम किनारपट्टी पालघर जिल्ह्यात समाविष्ट झाली. मुंबईला लागून असलेला भाग व कल्याण, भिवंडी, अंबरनाथ हे औद्योगिक नागरी वस्ती असलेले भाग व शहापूर व मुरबाड हे डोंगराळ भाग या जिल्ह्यात आहेत. साधारण इ. स. ८०० ते १२६०पर्यंत शिलाहार, त्यानंतर निजाम, त्यानंतर १४८०मध्ये गुजरातचा सुलतान मेहमूद याने ठाणे घेतले. सोळाव्या शतकानंतर पोर्तुगीज, मराठे व अखेर इंग्रज अशा राजवटी ठाण्याने पाहिल्या. ठाण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये शिलाहारकालीन मंदिरे व किल्ले आहेत. जवळच मुंबई असल्याने या भागाचे नागरीकरण व औद्योगिकीकरण झपाट्याने झाले. ठाण्याचा पूर्व भाग सह्याद्रीमुळे निसर्गाने नटलेला आहे. सुरुवात करू या ठाणे शहरापासून. 

ठाणे शहर : ठाणे शहर इ. स. ९००मध्ये ‘श्रीस्थान’ म्हणून ओळखले जायचे. १८५०नंतर इंग्रज राजवटीत ज्या नगरपालिका स्थापन झाल्या, त्यात ठाणे नगरपालिकेचाही (१८६३) समावेश होता. ठाणे महानगरपालिका १९८२ साली स्थापन झाली. शहराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. इसवी सनापूर्वी ३०० वर्षे चंद्रगुप्त मौर्य यांचे काळात टॉलेमी नावाचा ग्रीक इतिहासकार कोकणात येऊन गेला. त्याच्या वर्णनात ठाण्याचा उल्लेख आहे. शिलाहारांनी तेथे असलेल्या वस्त्यांना ‘पाडा’ हे नाव दिले. त्यामुळे नौपाडा, आगरीपाडा अशा नावाने वस्त्या ओळखल्या जाऊ लागल्या. इटालियन प्रवासी मार्को पोलो याने सन १२९०मध्ये ठाण्याला भेट दिली. ठाणे हे मोठे बंदर असून, विकसित झालेले सुंदर शहर असल्याचा उल्लेख त्याच्या नोंदीमध्ये आहे. तेथील व्यापारी कापूस, ताग आणि चामडे विकतात व बाहेरच्या देशातून आलेले घोडे खरेदी करतात, असेही त्याने लिहिले आहे. साधारण इ. स. १५३० ते १७३० या कालावधीत येथे पोर्तुगीज राजवट होती. त्यानंतर चिमाजीअप्पांनी हा भाग स्वराज्याला जोडला. त्यानंतर १७४४मध्ये ठाणे पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात गेले. 

ठाण्याचा किल्ला : पोर्तुगीजांनी शहराच्या खाडीकडील भागात किल्ला बांधला होता. आता किल्ला अस्तित्वात नाही. थोडेफार अवशेष आहेत. सध्या या ठिकाणी ठाणे तुरुंग आहे. मूळ किल्ला पूर्ण स्वरूपात शिल्ल्क नाही. या भागात मराठे आणि पोर्तुगीज यांची सतत लढाई होत असे. म्हणून किल्ला बांधला होता. काळाच्या ओघात तो नष्ट झाला. तथापि आज जिल्हाधिकारी कार्यालयावरून सरळ पुढे जाणाऱ्या रस्त्यावर जी कारागृहाची इमारत आहे, ती मूळ किल्ल्याचा भाग होती. हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे, विनायक नारायण देशपांडे, यांना ठाणे तुरुंगात फाशी देण्यात आले. 

भारतातील पहिली रेल्वे इ. स. १८५३मध्ये बोरीबंदर ते ठाणे अशी सुरू झाली. भारतातील रेल्वेच्या इतिहासात त्यामुळे ठाणे शहराला महत्त्वाचे स्थान आहे. ठाणे येथे भारतातून येणाऱ्या सर्व गाड्या थांबतात व आता टर्मिनसही होत आहे. 

ठाण्याला तलावांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. येथे निरनिराळ्या भागात ३०हून अधिक तलाव आहेत. 

मासुंदा तलाव

मासुंदा तलाव
(तलाव पाळी) येथे मध्यावर असलेल्या बेटावर शिवमंदिर बांधले आहे. येथे दिवाळीत मोठी रोषणाई केली जाते. तलावात बोटिंगची व्यवस्था आहे. 

उपवन तलाव

पोखरण झील/उपवन :
उपवन तलावाजवळ संस्कृती कला महोत्सव साजरा करण्यात येतो. उपवन तलाव हे ठाण्यातील एक सुंदर ठिकाण आहे. या तलावाच्या पश्चिमेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. निसर्गरम्य परिसरात सकाळी आणि संध्याकाळी लोक येत असतात. सिंघानिया ग्रुपमार्फत येथे श्री गणेश मंदिरही बांधण्यात आले आहे. 

कचराळी तलाव : हे एकच वृक्ष असलेले बेट आहे. पाचपाखाडी/पंचपाखाडी भागातील या तलावाचा परीघ ५०० मीटर आहे. जॉगिंग ट्रॅक, मुलांच्या खेळाच्या सरावासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. येथे बदके सोडलेली आहेत. त्यामुळे तळ्याचे सौंदर्य वाढले आहे. 

ब्रह्माळा, दातिवली, डावला, देवसर, डायघर, दिवा, आंबेघोसाळे, गोकुळनगर, हरियाली, जेल, जोगिला, देसाई, कासारवडवली, कौसा, कावेसर खर्डी, खारेगाव, खिडकाळी, कोलवाड, कोलशेत, मखमली, मासुंदा, फडकेपाडा, नार, रायलादेवी, रेवाळे, श्रीनगर बाळकूम, सिद्धेश्वर, तुर्भेपाडा हे तलाव ठाण्यात आहेत.

चिखलाईदेवी मंदिरचिखलाईदेवी मंदिर : कोपरी भागात रेल्वे स्थानक परिसरानजीक आई चिखलाईदेवी अर्थात गावदेवीचे भव्य मंदिर आहे. हे ठाणे शहरामधील स्वयंभू देवस्थानांपैकी एक म्हणून ओळखले जाते. पूर्वापार चिखलाईदेवी ही आगरी-कोळी, तसेच भंडारी समाजाची ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते. ठाणे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांचे काम सुरू असताना देवीच्या मूर्ती चिखलात सापडल्या, म्हणून चिखलाईदेवी असे संबोधले जाते. ठाणे पूर्वेला कोपरी भागात हे मंदिर आहे. मंदिराचा गाभारा चांदीने मढविण्यात आला असून, आतील भागात गणपती, साईबाबा, दत्त या देवतांच्या मूर्ती आहेत. देवीचे भव्यदिव्य मंदिर बघण्यासारखे आहे. 

कौपिनेश्वर मंदिर : शिलाहार राजवटीत साधारण ८०० ते ९०० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले गेले असावे. शिलाहार शिवभक्त असल्याने त्यांनी हे मंदिर बांधले. त्यानंतर १७६०मध्ये त्याचे पुनर्निर्माण करण्यात आले. त्यानंतर १८९७मध्ये व १९९६मध्ये त्याचे पुन्हा नूतनीकरण करण्यात आले. नंतर गर्भागृहासमोर हॉल बांधण्यात आला. हे मंदिर मासुंदा तलावाच्या काठावर आहे. 

घंटाळी देवीघंटाळी देवीचे मंदिर : ठाण्याच्या ‘घंटाळी पथ’ या प्रमुख रस्त्यावर घंटाळी देवीचे २५० वर्षांपूर्वीचे पुरातन मंदिर आहे इ. स. १८८२च्या ठाणे जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये घंटाळी देवीचा उल्लेख आहे. पेशव्यांकडून या मंदिराला दर वर्षी चार रुपये वर्षासन मिळत असल्याचा उल्लेखही सापडतो. नादाचे प्रतीक असलेल्या घंटा आणि टाळी या दोन शब्दांपासून ‘घंटाळी’ हे नाव बनले आहे. या मंदिरावरूनच ‘घंटाळी पथ’ नाव रूढ झाले. या ठिकाणी देवीला नवस बोलताना काम झाले तर घंटा बांधेन, असा नवस बोलण्याची प्रथा आहे. घंटाळी देवी कोळी आणि पाठारे प्रभू समाजाची कुलदेवता असल्याचे सांगण्यात येते. येथे घंटाळी देवी, महिषासुरमर्दिनी आणि दुर्गा, तसेच शंकर, राम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या मूर्ती आहेत. 

सेंट जेम्स चर्च

सेंट जेम्स चर्च १८२५मध्ये बांधण्यात आले. आता या चर्चला १९४ वर्षे होतील. ठाणे मुख्य पोस्ट कार्यालयाजवळ हे चर्च आहे. जेल तलावाशेजारी गॉथिक शैलीच्या वास्तुकलेसाठी हे प्रसिद्ध आहे. याचे पोर्च व प्रार्थना सभागृह भव्य आहे. ९० फूट लांब व ६० फूट भव्य इमारत आहे. आतील हॉल ५५ फूट लांब, ३३ फूट रुंद व २४ फूट उंच आहे. 

सेंट अँथनी चर्चसेंट अँथनी चर्चला मराठ्यांनी कार्य करण्याची अनुमती दिली होती; पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यास मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची आवश्यकता होती. नवीन व्यवस्थापनाने सेंट अँथनी हे नाव बदलून सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च असे ठेवले. १७३७मध्ये मध्ये मराठ्यांनी ठाणे येथील सेंट अँथनी वगळता सर्व चर्चेस नष्ट केली. (ठाण्याबाहेर घोरमल आणि पोखरण चर्चचे अवशेष अद्याप अस्तित्वात आहेत. घोरमल चर्चचे पुनर्निर्माण चार-पाच वर्षांपूर्वी झाले.) 

दहीहंडी : ठाणे शहरामध्ये दहीहंडी हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. काळजाचा ठोका चुकविणारा हा थरारक कार्यक्रम बघण्यासाठी बाहेरगावाहून, तसेच परदेशातून पर्यटक येतात. दहीहंडीला बक्षिसाच्या रकमेबरोबर हंडी फोडण्यासाठी लावलेल्या मानवी थरांचीही स्पर्धा लागते. राजकीय नेते, सेलेब्रिटी या ठिकाणी उपस्थित असतात. 

ठाणे हे खवय्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. भारतातील अनेक भागांतील लोक कामधंद्याच्या निमित्ताने ठाणेकर झाले आहेत. त्यामुळे निरनिराळ्या प्रांतांतील खाद्यपदार्थ येथे सहज उपलब्ध होतात. तरीही मराठी संस्कृती या शहराने जपली आहे. 

कौपिनेश्वर मंदिरठाणे ही सांस्कृतिक नगरी म्हणूनही प्रसिद्ध आहे. १८६६मध्ये पहिले वृत्तपत्र येथे सुरू झाले. येथे सतत संमेलने, नाट्य स्पर्धा, गाण्याचे कार्यक्रम, नाटके सुरू असतात. कै. पी. सावळाराम (निवृत्तीनाथ रावजी पाटील) हे ठाण्याचे नगराध्यक्ष होते. हा बहुमान मिळविणारे ते एकमेव कवी होते. त्यांची भाव, भक्तिगीते प्रत्येक मराठी माणसाच्या ओठावर आहेत. 

ठाण्यातील थोर व्यक्तिमत्त्वे : माधवराव हेगडे, भगवंत शृंगारपुरे, वामनराव ओक, शंकरराव कारखानीस, भास्करराव दामले, सी. म. अभ्यंकर, सी. टी. रणदिवे, माजी खासदार रामभाऊ म्हाळगी, क्रिकेटपटू खंडू रांगणेकर, आमदार विमलताई रांगणेकर, जयंतीलाल ठाणावाला असे अनेक अभिनेते, खेळाडू, लेखक, कवी, साहित्यिक, सेलेब्रिटी, आमदार, खासदार अशा कितीतरी व्यक्तिमत्त्वांचा या गावाशी संबंध आहे. क्रिकेटपटू खंडू रांगणेकर हे ठाण्याचेच. पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा जन्म ठाण्यातीलच.

डॉ. मूस रोड : गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या समोरच्या रस्त्यालाच डॉ. मूस रोड नाव आहे. खानबहादूर डॉ. एफ. ए. मूस हे त्यांचे संपूर्ण नाव. त्यांचे कार्य लक्षात ठेवण्यासारखे आहे. ते ठाण्याचे १८ वर्षे नगराध्यक्ष होते व ३० वर्षे नगरसेवक होते. सन १९१८मध्ये ठाण्यात आलेल्या प्लेगच्या साथीवेळी त्यांनी फार महत्त्वाची कामगिरी बजावली होती. 

कला भवन

कला भवन :
ही ठाणे शहरातील आर्ट गॅलरी आहे. ठाणे महानगरपालिकेने तीन मजली कला गॅलरीची स्थापना २६ फेब्रुवारी २००९ रोजी केली. येथे कलाकारांना त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी दालन दिले जाते. याचे बांधकाम क्षेत्र १६ हजार चौरस फूट आहे. गॅलरी गोलाकार आकारात तयार केली आहे. परंतु बाहेरून शंकूच्या स्वरूपात दिसते. आर्किटेक्ट प्रवीण जाधव यांनी याचे डिझाइन केलेले आहे. एकूण चार कलादालने आहेत. चित्रकला, हस्तकला, वस्त्रप्रावरणे, ग्रंथ अशी अनेक प्रकारची प्रदर्शने येथे भरविली जात असतात. सभागृह, कार्यशाळेसाठी येथे जागा उपलब्ध करून दिली जाते. 

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय : ठाणे शहरात विनायक लक्ष्मण भावे आणि विष्णू भास्कर पटवर्धन यांनी या मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना एक जून १८९३ रोजी केली. सुरुवातीला वि. ल. भावे यांनी मराठी कवींचे काव्यसंग्रह आणि इतर ग्रंथ संस्थेला देऊन हे ग्रंथसंग्रहालय चालू केले. सुरुवातीस फक्त ७६ पुस्तके असलेल्या ग्रंथालयात आजमितीला एक लाखाच्यावर पुस्तके आहेत. संदर्भग्रंथांची संख्या ४७३४ आणि अतिदुर्मीळ ग्रंथ १७१० आहेत. सर्व संदर्भ ग्रंथ इ. स. १९००पूर्वीचे आहेत. संस्था स्थापन झाली, तेव्हा संस्थेचे वर्गणीदार १७२ होते. आता सभासदांची संख्या १७००च्या वर पोहोचली आहे. संस्थेची नौपाडा येथेही शाखा आहे. 

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयामार्फत सांस्कृतिक आणि संघटनात्मक कार्यक्रम राबवले जातात. दर वर्षी किमान १५ ते २० व्याख्याने आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रम होतात. हे ग्रंथालय ठाणे शहराचा सांस्कृतिक मानबिंदू आहे. हे संग्रहालय सरस्वती मंदिर, सुभाष पथ, स्टेशन रोड येथे आहे. 

गडकरी रंगायतनठाणे शहरातील उद्याने : ठाणे शहरात सुमारे ७० उद्याने आहेत. लवकरच फुलपाखरू उद्यान, जैवविविधता पार्कही येथे होत आहे. बहुतेक तलावांच्या जवळ उद्यानेही आहेत. तसेच काठावर जॉगिंग ट्रॅक केले आहेत. त्यापैकी काही ठळक उद्याने अशी - रवींद्र राऊत आजी आजोबा उद्यान, निरंजन दालमिया उद्यान, पंडित राम मराठे उद्यान, तारापोरवाला उद्यान, सर्वोदय उद्यान, रमाबाई आंबेडकर उद्यान, गोदाताई परुळेकर उद्यान, निसर्गमित्र सलीम अली ऋतुचक्र उद्यान, महात्मा गांधी उद्यान, आनंद दिघे उद्यान, प्रबोधनकार ठाकरे उद्यान, जनकवी पी. सावळाराम उद्यान. 

नाट्यगृहे : गडकरी रंगायतन, विष्णुदास भावे, काशिनाथ घाणेकर यांच्या नावाची नाट्यगृहे, तसेच अनेक चित्रपटगृहे ठाणे येथे आहेत. 

कसे जाल ठाणे येथे?
ठाणे हे रेल्वेने सर्व भारताशी जोडलेले आहे. राष्ट्रीय महामार्गाने मुंबई-कोलकाता-दिल्ली-बेंगळुरू येथे जोडलेले आहे. जवळचा विमानतळ मुंबई. ठाणे येथे मध्यम ते पंचतारांकित हॉटेल्स उपलब्ध आहेत.

(या भागातील माहितीसाठी ठाणे येथील आनंद मयेकर यांचे सहकार्य झाले.)

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 77 Days ago
So , the public library is older than that in Pune . Interesting .
0
0
BDGramopadhye About 77 Days ago
So. Thane has a known history of about 800/ years , much more than that of Pune . This is understandable. Its location on the trade route route connecting the harbours on the Arabian Sea to the interior . was the reason . So was tha case of Junnar , and Nashik . In fact , the histories of the latter two , cover much longer periods .
0
0
Parashuram Babar About 88 Days ago
Thanks Farch Chan mahiti milali
0
0
Sameer Bapat About 88 Days ago
मस्त
0
0

Select Language
Share Link
 
Search