Next
तिरंदाजीत ईशाचे यश
BOI
Friday, November 29, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


कोकणभूमीतील खेळाडू आज मुंबई-पुण्यातच नव्हे, तर राज्य पातळीवर विविध क्रीडा क्षेत्रांत आपला दबदबा निर्माण करताना दिसत आहेत. यातच सध्या गाजत असलेले एक नाव म्हणजे तिरंदाज ईशा पवार. या मुलीने खुप कमी काळात यश मिळविले आहे. ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या तिरंदाज ‘ईशा पवार’बद्दल...
.....................................
सातव्या इयत्तेत असताना ईशाला तिरंदाजीची गोडी लागली आणि आज वयाच्या १६व्या वर्षी ती आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाजवत आहे. त्यात सायत्याने यशस्वीही होत आहे. चिपळूनजवळील सावड्रे या गावात लहानाची मोठी झालेल्या ईशाने डेरवण येथील ‘एसयूपीसीटी’ शाळेतून दहावीची परीक्षा दिली असून आता ती पुण्यातील महाविद्यालयात प्रवेश घेणार आहे. १० एप्रिल २००३मध्ये जन्मलेल्या ईशाने पहिल्या इनडोअर स्पर्धेतच सुवर्णपदक मिळवले आणि तेव्हापासूनच तिची यशस्वी घोडदौड सुरू झाली.  

पहिल्या सुवर्णपदकाबरोबरच इनडोअरला तिने दोन रौप्य व दोन कांस्य पदके मिळवली. ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवरची होती. कोणताही अनुभव गाठीशी नसताना ईशाने हे यश मिळवले, म्हणुनच त्याचे महत्त्व जास्त आहे. छोट्या गटात, राष्ट्रीय स्तरावर पहिल्या आउटडोअर स्पधेत खेळताना सबज्युनिअर गटातही तिने सुवर्ण पदकासह एक रौप्य पदकदेखील मिळवले. राष्ट्रीय स्तरावर एकुण ६७ पदके तिच्या नावावर असून आजवर एकूण शंभरपेक्षा अधिक पदके तिने मिळवली आहेत. इतक्या लहान वयात तिने मिळवलेले हे यश खरोखरच आचंबित करणारे आहे. तालुका पातळीवरून सुरुवात केलेल्या ईशाने आंतरराष्ट्रीय स्तरावरही चार पदके मिळविली आहेत. त्यात दोन सुवर्ण व दोन रौप्य पदकांचा समावेश आहे. जिल्हा स्तरावर ५०पेक्षा अधिक पदके मिळवली असून राज्य स्तरावरही तिने पदकांची कमाई केली आहे. 

ईशा पवारखेळाला सुरुवात केल्यानंतर जेमतेम दुसऱ्या वर्षीच तिने राष्ट्रीय सबज्युनिअर गटात अविस्मरणीय कामगिरी करत कांस्य पदक प्राप्त केले. खरेतर पहिल्या प्रयत्नात तिला अपयश आले होते व ती १०व्या स्थानावर गेली होती, मात्र दुसऱ्याच प्रयत्नांत हे अपयश पुसून काढत तिने खेलो इंडिया स्पर्धेत दोन गटांत सुवर्ण पदक मिळवत जाणकारांना आपल्या कामगिरीची दखल घ्यायला लावली. यादरम्यान भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी तिची निवड झाली. केवळ आत्मविश्वास व तंदुरुस्ती यांच्या जोरावर ती सातत्याने यश मिळवताना दिसत असून जागतिक स्पधेतही तिने आशियाई पात्रता मिळवत उपस्थितांना आचंबित केले. एकूण ६५ राष्ट्रीय स्पर्धा खेळताना तिने पदकांची शंभरी गाठली असून असेच सातत्य राहिले, तर येत्या काळात ती भारताची सर्वांत यशस्वी खेळाडू ठरेल यात शंका नाही. 

आशियाई स्पर्धेत तर भारताची अव्वल खेळाडू स्वाती दुधवाल, ईशासमोर खेळताना चक्क घाबरली होती. हेच ईशाचे यश आहे. या स्पर्धेत स्वाती अग्रक्रमी होती, तर ईशा सोळाव्या स्थानावर. मात्र ईशाने प्रत्येक पातळी पूर्ण करत स्वातीला आश्चयार्चा धक्का दिला व पदक जिंकले. तिथेच ती केवळ स्वातीपेक्षाच नव्हे, तर भारताच्या इतर मान्यवर खेळाडूंपेक्षाही अग्रेसर ठरली. या स्पर्धेसाठी पात्र होताना ईशा कॅडेट गटात खेळत होती आणि स्वाती आंतरराष्ट्रीय स्तरावर, मात्र खेळताना ईशाने कोणतेही दडपण घेतले नाही व खेळ केला. 

बांग्लादेशमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ईशाने चार पदकांना गवसणी घालताना रणजीत चामले या आपल्या प्रशिक्षकांचा विश्वास सार्थ ठरवला. ‘खेलो इंडिया’ काय किंवा राष्ट्रीय स्पर्धा काय, ईशाला कोणत्याच स्पर्धेचे दडपण येत नाही याचेच सगळ्यांना आश्चर्य वाटते. तिची तंदुरुस्तीदेखील कमालीची असून मानसिक पातळीवरदेखील ती अत्यंत कणखर आहे. ‘मोठे व्हायचे, तर लढले पाहिजे’ हे सूत्र तिने आत्मसात केले असून भारताच्या सवोत्तम दहा खेळाडूंमध्ये आज तिची गणना होते. 

‘आज वयाच्या १६व्या वर्षी ती राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पाय रोवत असताना पुढेही खेळात तिला सातत्य राखता आले पाहिजे’, असे मत तिचे प्रशिक्षक रणजीत चामले यांनी मांडले आहे. ‘बाहेर जाऊन देशासाठी खेळणे, पदकांची कमाई करणे, त्याच वेळी मिळालेले यश आणि अपयश असे दोन्ही पचवणे हा तिहेरी संगम साधण्यात जर ईशा यशस्वी ठरली, तरच ती अन्य खेळाडूंपेक्षा निराळी ठरेल. जसे जिंकत असताना आनंद होत असतो, तसेच हारदेखील पचवता आली पाहिजे व त्यातूनच अनुभव प्राप्त होत असतो व त्याचा लाभ पुढील स्पर्धेत जिंकण्यासाठी होत असतो हे ईशाला समजले आहे. म्हणुनच तिच्या खेळात सातत्य टिकून आहे’, असेही ते म्हणाले आहेत.

येत्या काळात तिला अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये खेळायचे असून त्यात युवा पातळीवरची विश्वकरंडक स्पर्धा मानाची समजली जाते. या स्पर्धेत जर ईशाने पदक जिंकले, तर पुन्हा एकदा भारताकडून खेळण्यासाठी तिची निवड होईल. सध्या तरी ईशाचे वडीलच तिचे प्रायोजक असून हे नक्कीच पुरेसे होणार नाही. तिला सरकारी पातळीवर तसेच खासगी क्षेत्रांकडून प्रायोजकत्व मिळाले, तर तिचा खेळ आणखी बहरेल. येत्या काळात भारतीय संघाचे सराव शिबिर होणार असून त्यासाठी ईशाची निवड झाली आहे. ईशाच्या रुपाने देशाला एक गुणवान खेळाडू गवसली असून तीच देशाला अनेकानेक पदके जिंकून देत राहील असा विश्वास वाटतो.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search