Next
डीपी
BOI
Sunday, January 14 | 09:45 AM
15 0 0
Share this story


मी मात्र माझ्याच धुंदीत होतो. तुला न-का-र देण्याचा अहंकारही होता. तुझ्यामुळे नकार देण्याची पहिली आणि शेवटची संधी जी मिळाली होती. मी खूश होतो. सुदैव की दुर्दैव कळेना आत्ता. कारण आत्ता तुझा डीपी पाहता पाहता एकदम आकर्षण वाटलं.. ‘आकर्षणाशिवाय प्रेम होत नसतं रे..’ तूच एका कथेत लिहिलेलं सहज आठवलं आत्ता.! बरं ते जाऊ दे! ‘डीपी’चं लक्षात ठेव तेवढं. पाहू नंतर आकर्षणाचं आणि...!! वाचा ‘हॅशटॅग (##)कोलाज’मध्ये...
..........
तुझा ‘डीपी’वरचा फोटो पाहत होतो. पाय मुडपून बसलीस न्.. कुठलंस पुस्तक मांडीवर ठेवून वाचतेयस असा. तू दिसतच नाहीयेस मुळी. मान खाली असल्याने चेहरा झाकोळलाय; पण एकूण तुझी ती मुद्रा खूपच आकर्षक आहे. मला तो डीपी पाहता पाहता तुझं आकर्षणच वाटलं. मग एकदम वाटून गेलं, बरं झालं मी तुला नाकारलं ते. मला नसता झेपला तुझा हा ऑरा.. तुझी ग्रेस.. तुझा रुबाब.. तुझी लिहिण्यासाठीची धडपड, वाचनासाठीचा आटापिटा, तुझं फिरणं, भटकंती असं काहीच जमवून घेता आलं नसतं. माझ्या सुट्टीच्या दिवशी तू तुझ्या कुठल्यातरी मित्राच्या घरी काय -कसल्या चर्चेसाठी जाऊन निवांत बसावं, हे तर खपलंच नसतं. फसलं असतं सगळं ते. मी जाम घाबरलो असतो. बायकोनं हे असं वागावं..? छ्या.. माझी कंडिशनिंगच नाहीये तशी..

त्यामुळे एकदम बरं वाटून गेलं, मी तुला नाकारलं ते. हां.. म्हणजे मी तुला नाकारलं तेव्हा हा असा काही विचार नव्हता केला. आत्ता आठवल्यावर लक्षात येतं, ती कारणं फारच वरवरची होती. एक तर तू मला दिसायलाच आवडली नव्हतीस. दिसणं तसं ठाकठीक आहे तुझं; पण तुझा रंग! काळा सावळा. माझ्या डोळ्यात तो चटकन ठसठशीत व्हायचा आणि दुसरं म्हणजे तुझं सतत मित्रांमध्ये असणं. मित्रांविषयी बोलणं. ही दोन प्रमुख कारणं होती, तुला नाही म्हणताना. मी तुला तसा झटक्यात नकार कळवला. तसा तूही तितकाच अलगद तो हातावेगळा केलास. नदीपात्रातल्या जाण्या-येण्याच्या वेळी तो नकार विसर्जितही केला असणार बहुदा. म्हणून तर त्यानंतर तू पुन्हा कधी हा विषय काढला नाहीस, की राग मानला नाहीस.

मी मात्र माझ्याच धुंदीत होतो. तुला न-का-र देण्याचा अहंकारही होता. तुझ्यामुळे नकार देण्याची पहिली आणि शेवटची संधी जी मिळाली होती. मी खूश होतो. च्यामारी सुदैव की दुर्दैव कळेना आत्ता. कारण आत्ता तुझा डीपी पाहता पाहता एकदम आकर्षण वाटलं. हां.! नसता झेपला तुझा रुबाब, तरी तू असायला हवी होतीस माझ्या घरात, असंही वाटून गेलं. तू आत लॅपटॉप घेऊन तंद्री लावून बसली असतीस आणि बाहेर दूध उतू गेलं असतं, तर एवढं काय बिघडणारं नव्हतं..! तू पुस्तक वाचता वाचता हळूच माझ्याकडे डोकावून पाहिलं असतंस, तर तुझ्या त्या नजरेनं मी किती वेडावलो असतो...! मग कुठल्या कुठल्या विषयांवर तुझ्याशी चर्चा करता आल्या असत्या आणि...आणि गेली असतीस सुट्टीच्या दिवशी मित्रा-बित्राच्या घरी तर जळून कोळसा झाला असता.. तरी तू परत माझ्याकडेच येणार या विचारानेही कसला सुखावलो असतो. 

एनी वे, तुला सांगितलं नाही ना मी कधी, तसं सांगणारही नाही की तू लिहिलेलं सारं काही मी वाचतो. कुठंही छापून आलेलं. अगदी फेसबुकवरची तुझी एखादी ओळसुद्धा. फक्त गुपचूप वाचतो. गुपचूप वाचावं असं काही तू लिहीत नाहीस; पण मी तू लिहिलेलं वाचतो हे मला कुण्णाकुणाला कळू द्यायचं नसतं. हे असंही का, तर ठाऊक नाही. किंवा गंड असेल मला कसला तरी. लोकं तुझं कौतुक किंवा टीका करत असले तरी मी अगदी तटस्थ राहतो. जणू मला तूच माहीत नाहीस. मला उगीच बरं वाटतं त्यामुळे आणि पुन्हा जाणवून जातं, बरं झालं मी तुला नाकारलं ते. तसंही तुझ्या कौतुकाच्या आलापात मला काही सूर मिसळता नसता आला. आपल्या सखी-सोबतिणीचा असा रुबाब सांभाळायलाही यावा लागतो गं.. त्यासाठी एकतर तसं ‘कंडिशनिंग’ हवं किंवा भाबडेपणा तरी हवा किंवा तुम्ही अगदी सच्चा दिलवाला प्रेमी.. हं.., तर त्यामुळेच बरं झालं मी तुला नाकारलं ते.

बरं! ऐक, तुझा डीपी खरंच खास आहे हा. पुढच्या वेळेस समोर बघतानाचा असा फोटो ठेव आणि हो, आता तू मला अजिबात अरूप वाटत नाहीयेस हां.., काळा-सावळा रंग तर दिसतच नाही. कसं काय ते कळेना... अं.. आकर्षण..?  ‘आकर्षणाशिवाय प्रेम होत नसतं रे, टवळ्या..’ तूच एका कथेत लिहिलेलं सहज आठवलं आत्ता.! बरं ते जाऊ दे! ‘डीपी’चं लक्षात ठेव तेवढं. पाहू नंतर आकर्षणाचं आणि...!!

- हिनाकौसर खान-पिंजार
ई-मेल : greenheena@gmail.com

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link