Next
हवे आहेत मराठी भाषेचे मेकॅनिक!
BOI
Monday, September 09, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

मराठी भाषेतील संशोधन आणि संवर्धनासाठी मराठी विद्यापीठाची स्थापना करण्याच्या बाबतीत अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला. प्रस्तावित विद्यापीठ स्थापन झालेच, तर तेथे उपयोजित मराठीबद्दल संशोधन व्हायला हवे. भाषेचा अभ्यास म्हणजे तिच्या प्रत्यक्ष वापराचा अभ्यास, हे सूत्र अंगीकारायला हवे.
..........
‘पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी’ ही समस्त मराठी जनांची जुनी आणि भळभळती जखम. ‘महाराष्ट्रातच मराठी भाषा मागे पडत आहे’, ‘मराठी नष्ट होत आहे’ अशा विविध चिंता मराठी भाषकांना नेहमीच भेडसावतात. यावर विविध प्रकारे उपायही सुचवले जातात. त्यात मराठी उत्कृष्टता केंद्र, मराठीसाठी संशोधन केंद्र आणि मराठी भाषा विद्यापीठ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. यातील मराठी भाषा विद्यापीठाचे स्वप्न आता साकार होण्याच्या दिशेने सरकत आहे.

मराठी भाषेतील संशोधन आणि संवर्धनासाठी मराठी विद्यापीठाची स्थापना करण्याच्या बाबतीत अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे वृत्त नुकतेच आले आहे. राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा अभ्यास गट देशभरातील भाषांसंदर्भात असलेली विद्यापीठे आणि संस्थांना भेटी देऊन अहवाल सादर करील आणि तो अहवाल समितीतर्फे राज्य शासनाला सादर केला जाणार आहे. अशा रीतीने केवळ मायमराठीची म्हणून एक संस्था अस्तित्वात येणार असेल, तर ती स्वागत करण्यासारखीच गोष्ट आहे.

तसे पाहायला गेले, तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विद्यापीठांतून वेगवेगळ्या पातळ्यांवर मराठी भाषेतील संशोधन होतच असते; मात्र राज्यात मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावे, ही मागणी गेल्या ८० वर्षांपासून म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून होत आहे. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार आणि वि. भि. कोलते यांच्यासारख्या तज्ज्ञांनी ही मागणी पुढे रेटली होती. राज्याची स्थापना झाल्याननंतर मराठी विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी अखिल भारतीय साहित्य मराठी संमेलनाच्या व्यासपीठावरून अनेक वेळा करण्यातत आली; मात्र तिला मूर्त स्वरूप येऊ शकलेले नाही. पुणे विद्यापीठाची स्थापना १९४८मध्ये झाली, तेव्हा त्यामागचा एक उद्देश हाही होता; मात्र नंतर त्या विद्यापीठाचा शाखा विस्तार होत गेला आणि मूळ उद्देश बाजूला पडला.

दरम्यान, शिक्षणासोबतच अन्य क्षेत्रांतही इंग्रजीचा दबदबा वाढत गेला. आता तर इंग्रजीच्या जोडीला मराठी भाषकांना हिंदीच्या भयानेही पछाडले आहे. यासोबतच अन्य प्रांतांनीही आपापल्या भाषेसाठी विद्यापीठे काढली आहेत. आंध्र प्रदेशात आंतरराष्ट्रीय तेलुगू विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. तमिळनाडू, केरळ या राज्यांनीही आपापल्या भाषांची विद्यापीठे काढली आहेत. संस्कृतची अनेक विद्यापीठे आहेत. हिंदी प्रसाराचे उत्तम काम करणारे महात्मा गांधी हिंदी विद्यापीठ हे तर आपल्याच राज्यात, वर्ध्याला आहे. त्यामुळे त्यांची देखादेखी आपल्या मराठी भाषेसाठी आपले स्वतःचे हक्काचे घर असावे, अशा संकल्पनेतून या विद्यापीठाचे स्वप्न पुन्हा पाहिले जात आहे.

...मात्र ज्ञानाच्या या नव्या केंद्रातही जुन्या विद्यापीठांप्रमाणेच साहित्य, कविता, लेख आणि लेखक असेच संशोधन होत राहिले, तर त्याला काही अर्थ राहणार नाही. याचे कारण म्हणजे आतापर्यंत मराठी विषयाचा अभ्यास म्हणजे मराठी साहित्य आणि मराठी भाषा एवढाच भाग आपण लक्षात घेतला आहे. प्रस्थापित विद्यापीठांमध्ये साहित्याचा इतिहास, साहित्याचे तत्त्वज्ञान, व्याकरण, भाषाशास्त्र, महिला साहित्य, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य असे संशोधन केले जात आहे. ते काही वाईट नाही; मात्र भाषा तेवढ्यापुरती मर्यादित नसते. भाषा विषयाचा अभ्यास म्हणजे साहित्याचा अभ्यास असे समीकरणच रूढ झाले आहे. बीए मराठी किंवा एमए मराठी या पदव्यांचा मान कमी होण्याचे हे एक कारण आहे.

आजच्या गरजा वेगळ्या आहेत. कुठल्याही भाषेचा खरा उपयोग हा तिच्या वापरात असतो. आज जीवनाची क्षेत्रे एवढी वाढली आहेत, की एकच एक भाषा त्या क्षेत्रांमध्ये वापरणे शक्य नाही. अशा वेळेस प्रत्येक क्षेत्राची स्वतःची एक भाषा विकसित होत असते आणि ही प्रक्रिया मराठीबाबतही होत आहे, घडत आहे. अशा ठिकाणी वापरण्यासाठी मराठीची वेगवेगळी रूपे विकसित होणे ही तातडीची गरज आहे. राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाने एके काळी परिभाषा कोश तयार करून हे काम चोख बजावले होते. वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी वेगवेगळे परिभाषा कोश तयार झाले - अर्थशास्त्र, औषधशास्त्र, कृषिशास्त्र, गणितशास्त्र ग्रंथालयशास्त्र इत्यादी अनेक. अगदी सरकारी कार्यालयांमध्ये वापरायची शब्दावलीही तयार करण्यात आली. ती जनतेच्या मनीमानसी रुळलीसुद्धा; मात्र तो उपक्रम होऊनही आता चार-पाच दशके उलटली. या काळात अनेक नवीन गोष्टींची भर पडली. उदाहरणार्थ, मोबाइल, संगणक इत्यादी क्षेत्रे. ती तशी दुर्लक्षितच राहिली.
यावर उपाय आहे तो उपयोजित मराठीचा. प्रस्तावित विद्यापीठ स्थापन झालेच, तर तेथे उपयोजित मराठीला वाव देण्याची उत्तम संधी चालून आली आहे. याचा अर्थ भाषेचा अभ्यास म्हणजे तिच्या प्रत्यक्ष वापराचा अभ्यास, हे सूत्र अंगीकारायला हवे. साहित्यासोबतच प्रसारमाध्यमे, सामान्य जनव्यवहार (खासगी व्यक्ती, संस्था व स्वयंसेवी संस्था, जाहिरात क्षेत्र) आणि शासन-प्रशासन या क्षेत्रांमध्ये मराठी भाषा कशी वापरली जाते, कशी वापरावी याचा अभ्यास करून त्यांचा मार्ग आखणे हेही काम असे विद्यापीठ करू शकते.

प्रत्येक क्षेत्राची भाषेकडून वेगळी अपेक्षा असते. प्रत्येक क्षेत्राच्या गरजा वेगळ्या असतात. नवीन क्षेत्रानुसार तयार होणारी भाषा पूर्वी कीर्तनकार, फिरते साधू-संत आणि मुलुखगिरी करणारे सैनिक यांच्यामार्फत प्रसारित होत असे. आता त्यासाठी वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे आणि नवीन तंत्रज्ञान आहे. त्यांचा वापर करून भाषेची निरनिराळी रूपे विकसित करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांची भाषा वेगळी, पोलिसांची वेगळी, वकिलांची वेगळी आणि खेळाडूंची वेगळी. ते सगळेच मराठी बोलत असले तरी त्यांची ढब वेगळी, शैली वेगळी आणि शब्दावलीही वेगळी.

आजची परिस्थिती अशी आहे, की या प्रत्येक भाषांचा वापर होतो; मात्र त्या-त्या भाषांमध्ये समस्या आली तर त्यावर उपाय काय, ती समस्या दूर कशी करायची याची हस्तपुस्तिका (मॅन्युअल) आपल्याकडे नाही. म्हणजे भाषांचे तज्ज्ञ आहेत, भाषेचे जाणकार आहेत; मात्र भाषेचे चालक नाहीत. एखाद्या कारखान्यात केवळ अभियंते भरले आणि एकही मेकॅनिक नसेल तर जशी परिस्थिती उद्भवेल तशी ही परिस्थिती आहे. अभियंता तुम्हाला यंत्राची कार्यप्रणाली समजावून सांगेल, त्यामागचे तत्त्व सांगेल आणि त्याची सर्व वैशिष्ट्येही समजावून सांगेल; मात्र त्या यंत्रात बिघाड झाला तर तो अभियंता सर्वांत आधी मेकॅनिकला हाक मारतो! आपल्याकडे तीच स्थिती आहे. मराठीतील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेली व्यक्ती ज्ञानेश्वरकालीन मराठीचा विकास, माडगूळकरांच्या कादंबरीतील पात्रांची भाषा, जी. ए. कुलकर्णींच्या कथांचे भावविश्व अशा विषयांवर अनेक तास बोलू शकते; मात्र मोबाइल संदेशांचा भाषेवर परिणाम, न्यायालयीन कामकाजात मराठी अशांसारखे विषय आले, की त्यांच्या तज्ज्ञतेला मर्यादा पडते. 

ही स्थिती उपयोजित मराठीचा अभ्यास केल्याने दूर होऊ शकेल. जनसंपर्काची मराठी भाषा, व्यवहारातील मराठी भाषा आणि व्यापार-उदिमाला लागणारी मराठी भाषा अशा मराठींच्या वेगवेगळ्या रूपांचा अभ्यास तिथे प्रकर्षाने व्हायला हवा. अभियंते बनवणाऱ्या संस्था तशाही आहेतच. तेव्हा मराठी भाषेचे नवीन विद्यापीठ होणारच असेल, तर तिथे असे मेकॅनिक घडावेत.

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@didichyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
देविदास देशपांडे About 7 Days ago
कृपयाdevidas@dididchyaduniyet.com ऐवजी devidas@didichyaduniyet.com असे वाचावे.
1
0
Pallavi About 7 Days ago
Devidas email id shows not found. Please send the correct email address.
0
0

Select Language
Share Link
 
Search