Next
पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय वाघमारे यांचा कार्यगौरव
BOI
Wednesday, April 03, 2019 | 04:31 PM
15 0 0
Share this article:

पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय वाघमारे यांचा कार्यगौरव सोहळ्यात सत्कार करताना सुनील वणजू, सुधीर शिंदे. सौ. मनीषा वाघमारे यांचा सत्कार करताना प्राजक्ता कदम. शेजारी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका.

रत्नागिरी :
रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय वाघमारे यांच्या बहुमोल कार्यानिमित्त त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. त्यांनी ११ वर्षे मुख्याध्यापक पद भूषवून शाळा, संस्थेला प्रगतिपथावर नेले, अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.

दहावीमध्ये राज्यात प्रथम आलेली विद्यार्थिनी, कला, क्रीडा स्पर्धांमध्ये यश, नवनवीन उपक्रम, शालाबाह्य स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचे यश अशा अनेक गोष्टी त्यांच्या कार्यकाळात घडल्या. त्या निमित्ताने वाघमारे यांचा कार्यगौरव सोहळ्यात सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम सुमारे चार तास सुरू होता. या वेळी सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळजवळील खुरशिंगी या वाघमारे यांच्या गावातील ग्रामस्थ, नातेवाईक, कुटुंबीय आणि जिल्ह्यातील अनेक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

या वेळी भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी म्हणाले, ‘गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन यांना साजेसे कामकाज त्यांनी केले. कप्तानपद भूषवताना त्यांनी शाळेला सर्व दृष्टीने प्रगतिपथावर नेले.’ सत्काराला उत्तर देताना वाघमारे सर भावुक झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. 

मुख्याध्यापक संघातर्फे मुख्याध्यापक विजय वाघमारे यांचा सत्कार करताना संघाचे अध्यक्ष विजय पाटील.

‘खुरशिंगी हे माझे मूळ गाव. आई गेल्यामुळे लहानपणीच घरची जबाबदारी अंगावर आली. बहिणीने सांभाळले. चांगले शिक्षण घेऊन पटवर्धन हायस्कूलमध्ये नोकरीला सुरुवात केली. संस्थेने माझ्यावर दाखविलेल्या विश्वाासाला मी तडा जाऊ दिला नाही. आज शाळेची खूप प्रगती झाली, यात सर्व शिक्षकांचे योगदान आहे. मला या शाळेत शिकता आले नाही; पण शिकवता आले हे माझे मोठे भाग्य आहे,’ असे वाघमारे सरांनी सांगितले.

स्वेच्छानिवृत्ती घेतलेले ग्रंथपाल मंदार खेर आणि सौ. शैला खेर यांचाही या वेळी नंदकुमार साळवी यांनी सत्कार केला. वाघमारे यांनी शाळेला देणगी म्हणून धनादेश सुपूर्द केले. खुरशिंगीमधील ग्रामस्थ, वाघमारे कुटुंबीय आणि रोटरी क्लब, मुख्याध्यापक संघ, तसेच विविध संस्थांतर्फे वाघमारे यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. मनीषा वाघमारे, मंडळाचे उपाध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाह सुनील वणजू, उपकार्याध्यक्ष नमिता कीर, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, जि. प. वेतन विभागाचे पी. बी. पाटील, विनायक हातखंबकर, पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष सोनाली सावंत, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका प्रमोदिनी शेट्ये, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य नीलोफर बन्नीकोप आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. सहकार्यवाह विनय परांजपे यांनी प्रास्ताविक केले. हेमलता गुरव व कौस्तुभ पालकर यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्याध्यापक मिलिंद कदम यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search