Next
‘भाषेकडे पाहण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन शिकला पाहिजे...’
BOI
Wednesday, February 28 | 10:15 AM
15 0 0
Share this storyमराठी राजभाषा दिनानिमित्ताने, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्याशी ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या स्नेहा कोंडलकर यांनी संवाद साधला. ‘भाषेकडे पाहण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन अद्याप आपल्याला शिकवला गेलेला नाही,’ असं मत त्यांनी यात व्यक्त केलं. त्यांच्याशी साधलेल्या संवादाचा काही भाग येथे देत आहोत.

.............
डॉ. श्रीपाद जोशी- आजच्या जागतिकीकरणाच्या रेट्यात मराठी भाषा टिकवण्यासाठी काय करता येईल, असं वाटतं?
- जागतिकीकरण ही संकल्पना भाषेच्या दृष्टीने मांडत असताना नेमकं कशाचं जागतिकीकरण झालंय ते लक्षात घेतलं पाहिजे. नीतिमूल्यांचं, मानवतेचं, अहिंसेचं, शांततेचं, विवेकाचं, असहिष्णुतेचं का आपल्या विचारांचं जागतिकीकरण झालंय, यापैकी आपल्याला काय म्हणायचं आहे, ते लक्षात घेतलं पाहिजे. साहित्याचं, तत्त्वज्ञानाचं, कलेचं काय प्रयोजन आहे, तर हे जग सुंदर करणं. मानव, निसर्ग, इतर छोटे-मोठे जीवजंतू यांना एकमेकांच्या सहवासात सुंदर, सुरक्षित आयुष्य जगता येणं हे यामागचं प्रयोजन आहे. हे असं होत नसेल किंवा असं न होणं म्हणजे जागतिकीकरण. ‘ग्रंथाचं प्रयोजन हे समाजसुख आहे,’ असं राजवाडेंनी म्हटलं होतं आणि अत्यंत निर्भय, निरोगी, स्वच्छ, पारदर्शी असा मूल्याधिष्ठित आणि मानवतेला कुठेही काळिमा फासला जाणार नाही, अशा वृत्तीचं सुख निर्माण करणारा समाज म्हणजे समाजसुख, अशी व्याख्याही त्यांनी केली होती. आजचं जागतिकीकरण याच्या पूर्ण विरोधात उभं आहे. अशा या जागतिकीकरणाकडे आजकाल अतिशय उथळपणे पाहिलं जातं. भारतीय परंपरेनुसार लेखक, कवी हा एक तत्त्वज्ञ आहे. आजकाल असं होताना दिसत नाही. यामुळे प्रभावी साहित्याचा मुद्दा मागे पडताना दिसत आहे. तो लोप पावत असल्याचं दिसत आहे. पूर्वीसारखं प्रभावी साहित्य पुन्हा निर्माण करायचं असेल, तर लेखक, कवी हे पूर्वीसारखेच आधी विचारवंत, तत्त्वज्ञ झाले पाहिजेत, तरच त्यांच्या लिखाणात ती प्रतिभा दिसेल. या सगळ्याचं आकलन कमी होत आहे आणि यातूनच एक प्रकारचा तोकडेपणा निर्माण होतो. या तोकडेपणातून जोपर्यंत शब्द सुटत नाहीत, लेखक बाहेर पडत नाहीत आणि लेखक जोपर्यंत जाती, धर्म, वर्ण, झेंडे या सगळ्यांतून बाहेर पडत नाहीत, तोपर्यंत या जागतिकीकरणाच्या रेट्यातून आपण बाहेर पडणं शक्य नाही. बाहेर पडणं तर दूरच, उलट दिवसेंदिवस आपण या रेट्याला शरण जात आहोत, असंच वाटतंय.

-    इतर भाषांमधल्या शब्दांच्या मराठी प्रवेशाबद्दल काय सांगाल?
-    एखादी गोष्ट बदलली आहे, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या गोष्टीचं एक रूप आपल्या मनात तयार असतं. भाषेचं कधीही असं एक निश्चित रूप नसतं. ती काळानुसार बदलत जाते आणि तरच ती प्रवाही राहू शकते. इतर भाषेची संस्कृती, वेशभूषा, मूल्य हे सगळं स्वीकारायचं आणि त्या भाषेतील शब्द नाकारायचे, हे चुकीचं आहे. असं केलं तर, ते भाषेचं शुद्धीकरण न होता विकृतीकरण होईल. भाषा ही अत्यंत लवचिक बाब आहे. या भाषेत माणसांच्या बोलीतून शब्द येत गेले नाहीत, तर ती मूकवत होते. म्हणूनच मर्ढेकरांसारख्या एखाद्यांना नवीन भाषा निर्माण करावी लागते. आजही बरेचसे समाजवर्ग भाषेच्या शुद्धीकरणावरून, व्याकरणावरून, ऱ्हस्व-दीर्घावरून बहुतांश समाजाला बोल लावत असतात. परिणामी अनेक बोलींमधून, संस्कृतीमधून भाषेचा जो विकास अपेक्षित असतो, तो होत नाही. भाषा ही प्रत्येक पिढीत, प्रत्येक काळात, प्रत्येक माध्यमात वाढलेल्या जीवन व्यवहाराला सामोरी जात असते. गरजांना सामोरी जात असते. शेवटी भाषा ही मनातून, मेंदूतून येत असते. त्यामुळे आधी मनाला, भावनांना, मेंदूला शुद्ध केलं पाहिजे, जेणेकरून आपली भाषा आपोआप शुद्ध होईल.

-    आजच्या काळातील कवितांबद्दल काय वाटते?
-    काव्यनिर्मितीच्या मागे असलेल्या प्रेरणा काव्य घडवत असतात. यानुसार मग, तुमच्या मनात असलेल्या भावना, काव्य घडवण्यास कारणीभूत ठरतात.

-    सोशल मीडियावरील भाषेबद्दल काय वाटतं?
-    भाषा म्हणजे आपण केवळ साहित्य याच प्रकारचा विचार करतो. भाषाकेंद्री विचार न करता आपण साहित्यकेंद्री विचार करतो. भाषिक व्यवहाराच्या एकूण १०० टक्के व्यवहारांपैकी केवळ १५ ते २० टक्के व्यवहार हा साहित्याच्या बाबतीत केला जातो. तेव्हा हा उर्वरित ८० ते ८५ टक्के भाषिक व्यवहार आपण या साहित्य प्रकाराने नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असतो. भाषेकडे पाहण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन अद्याप आपल्याला शिकवला गेलेला नाही. आपण भाषा शिकवतच नाही. भाषेच्या नावाखाली आपण साहित्य शिकवतो. अभिव्यक्तीचा अर्थही केवळ साहित्य निर्माण करणे होत नाही. आज प्रत्येकाला काहीतरी सांगायचं असतं. व्यक्त व्हायचं असतं. यातून मग लिखाण केलं जातं. म्हणून आज लिहिणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
 
(शब्दांकन, व्हिडिओ : स्नेहा कोंडलकर) 

(मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेले सर्व लेख, कविता आणि व्हिडिओ https://goo.gl/qgDdWU या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link