Next
शब्द अन् चित्रांत रमवणारी कार्यशाळा
BOI
Tuesday, November 14 | 02:36 PM
15 0 0
Share this story


इंटरनॅशनल थिएटर फेस्टिव्हल वगैरे म्हटल्यावर आपल्या डोळ्यांपुढे बोजड गोष्टी येतात; पण पुण्यात नुकत्याच झालेल्या ‘आयपार’ थिएटर फेस्टिव्हलने ही चौकट मोडत चक्क लहान मुलांसाठीदेखील एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. ‘शब्दचित्र’ असे त्या कार्यशाळेचे नाव होते. ती कार्यशाळा घेणाऱ्या मृणालिनी आणि मधुरा वनारसे यांच्याशी आकाश गुळाणकर यांनी साधलेला हा संवाद आजच्या बालदिनानिमित्ताने प्रसिद्ध करत आहोत. 
................
हा नक्की कशा प्रकारचा वर्कशॉप होता? त्याच्या आयोजनामागे काय उद्देश होता?
- ‘शब्दचित्र’ या नावात आहे त्याप्रमाणेच या वर्कशॉपमध्येदेखील शब्द आणि चित्रे या दोन्हींचा समावेश होता. लहान मुलांच्या मनात शब्द किंवा चित्रे या बाबतीत जो काही न्यूनगंड निर्माण होतो, तो होऊ नये, या दोन्ही माध्यमांशी त्यांची तितकीच ओळख असावी, हा या वर्कशॉपचा मुख्य हेतू होता. एखाद्याला चित्र काढायचं म्हटलं, की भीती वाटते. ‘हे मला जमणार नाही’ अशी भावना त्याच्यात निर्माण होते. याउलट काही मुले शब्दांना आपलेसे करू शकत नाहीत. त्यांना शब्द लक्षात ठेवणे किंवा लिहिणे हे अवघड काम वाटते. याचे कारण असे आहे, की शब्द आणि चित्र या परस्परविरोधी गोष्टी आहेत असे आपल्या मनावर पहिल्यापासून बिंबविण्यात आले आहे; पण खरे पाहायला गेले तर या एकमेकांना पूरक गोष्टी आहेत. म्हणजे जिथे चित्र आहे तिथे शब्द आहे व जिथे शब्द आहेत तिथे चित्र. हीच गोष्ट या वर्कशॉपच्या माध्यमातून लहान मुलांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आम्ही करतो. 

या वर्कशॉपची रचना कशी होती?
- जिथे कुठे शब्द आणि चित्रे एकत्र येतात त्या गोष्टी आम्ही लक्षात घेतल्या. यात आम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज मुलांकडून करून घेतल्या. त्यातून त्यांना शब्दांची आणि चित्रांची ओळख करून दिली. उदाहरण सांगायचे झाल्यास आपले नाव सांगताना एखादी विशिष्ट हालचाल (ॲक्शन) करून ते सांगणे व त्यातून ‘व्हिज्युअल’मधून ते कसे नीट लक्षात राहते, याचे प्रात्यक्षिकच मुलांनी पाहिले. शिवाय चित्रे पाहून गोष्ट लिहिणे व गोष्टीवरून चित्रे काढणे यांसारख्या ॲक्टिव्हिटीज आम्ही घेतल्या. गंमत म्हणजे यातील प्रत्येक मुलाचे चित्र वेगळे होते आणि गोष्टदेखील. जिब्रिश भाषेतसुद्धा मुलांनी प्रयोग केले. महत्त्वाचे म्हणजे त्या मुलांवर आम्ही कोणतेही बंधन घातलं नाही. त्यामुळे हे चूक की बरोबर असे प्रश्न पुढे आले नाहीत. परिणामी मुलांनी मुक्तपणे यात सहभाग घेतला व ती व्यक्त झाली. 

यादरम्यान आलेला एखादा वेगळा अनुभव कोणता?
-  लहान मुलांचे एक वेगळे विश्व असते. त्यांच्या या विश्वामध्ये त्यांच्या पद्धतीनेच प्रवेश केला आणि एखादी गोष्ट सांगितली, तर ती गोष्ट मुले लगेचच आत्मसात करू शकतात. एक अनुभव सांगायचा, तर आम्ही सगळ्या मुलांना चित्रावरून निबंध तयार करण्यास सांगितले. तेव्हा एका मुलाने लिहिताना आम्हाला विचारलं, की मी यात चित्र काढू शकतो का? असा प्रश्न त्याला पडला याचे आम्हाला बरे वाटले व कुठेतरी आपला कार्यशाळेचा हेतू पूर्णत्वास जातो आहे, याचेही समाधान मिळाले. शाळेमध्ये किंवा आपल्या शिक्षणव्यवस्थेत त्याने जर असा प्रयत्न केला, तर त्याला चुकीचेच ठरवले जाईल. किंबहुना अगदीच सोप्या शब्दांत सांगायचे तर त्याला याचे कोणतेच गुण मिळणार नाहीत; पण त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये जो बदल घडेल तो खरेच कौतुकास्पद असेल. 

अशा प्रकारच्या वर्कशॉपबाबत पालकांची भूमिका काय आहे?
-  गेल्या अनेक वर्षांत आम्हाला अनेक चांगले अनुभव मिळाले. काही पालक अपेक्षेने मुलांना पाठववितात, तर काही जण मुक्तपणे सोडताना दिसतात. आपलं मूल इथे आल्यानंतर खूश आहे, हा एक दिलासा त्यांना मिळत असतो. शिवाय ही मुलं घरी जाऊन सतत वर्कशॉपबाबतीत बोलत असतात व पुढच्या दिवशी ती उत्साहाने स्वतःहून इथे येण्यास तयार होतात असाही अनेकांचा अनुभव आहे. मुलांना स्वतःला इथे पुन्हा येण्याची इच्छा होणे हे आमच्याकरिता फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे पालकांची एकंदरीत भूमिका सकारात्मक असल्याचे दिसून येते. 

गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही लहान मुलांसोबत काम करत आहात. त्यांच्या बाबतचा तुमचा अनुभव कसा आहे?
- योगायोगाने आम्हाला शहरी व ग्रामीण भागात असे दोन्हीकडे काम करायला मिळाले. यादरम्यान दोन्हीकडच्या मुलांमध्ये एक फरक आम्हाला प्रकर्षाने जाणवला. शहरी भागातील मुले जास्त ॲग्रेसिव्ह असतात, तर ग्रामीण भागातील मुले तुलनेने शांत वाटतात. शहरांमधील मुलांना इंटरनेट, पुस्तके व इतर तंत्रज्ञान यांसारखी साधने हातात असल्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी वाचून, बघून माहिती असतात. याउलट ग्रामीण भागातील मुलांना असे ‘एक्सपोजर’ कमी मिळते. ग्रामीण भागातील मुलांच्या एकूण पार्श्वभूमीमध्ये सारखेपणा असल्यामुळे त्यांना काही गोष्टी समजावणे सोपे जाते. शहरी भागात यासाठी आम्हाला थोडेसे जास्त कष्ट घ्यावे लागतात. शिवाय सतत प्रश्न विचारण्याच्या नादात या मुलांचा गोष्टी प्रत्यक्षात अनुभवण्याचा कल काहीसा कमी झाल्याचे दिसून येते. तसे होणे अपेक्षित नाही. त्यासाठीच आम्ही या वर्कशॉपच्या माध्यमातून प्रयत्न करतो. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Kprakash chandra About 328 Days ago
Nice work
0
0

Select Language
Share Link