Next
अनोख्या भक्तिमार्गाचा परिचय करून देणारं पुस्तक
प्रसन्न पेठे
Monday, June 25, 2018 | 05:24 PM
15 0 0
Share this story

तब्बल १०७ वर्षांपूर्वी बंगाली भाषेत प्रसिद्ध झालेलं आणि नंतर उडिया भाषेत प्रचंड गाजलेलं, प्रेमभक्ती आणि साधनापद्धतीची विस्तृत माहिती देणारं ‘प्रेमिकगुरू’ हे पुस्तक नीलाचल सारस्वत संघाने मराठीत आणलंय. अपरंपार भक्तिभावाने ओथंबलेलं हे पुस्तक वाचकांना एका अनोख्या भक्तिमार्गाचा परिचय करून देणारं आहे. त्या पुस्तकाबद्दल...
.............
‘ज्ञान-कर्म, कामना-वासना, सुख-दु:ख, धर्म-अधर्म, धन-संपत्ती, बायको-मुलं इतकंच नव्हे, तर स्वतःला विसरून परमेश्वराच्या प्रति जी दृढ श्रद्धा आणि अनुरक्ती आहे, तिला भक्ती असे म्हणतात,’ - अशी भक्तीची नवीन व्याख्या समोर मांडत प्रेमिकगुरू ग्रंथाची सुरुवात होते. भगवद्गीता, भक्तिरसान्मृतसिन्धु, नारदपुराण, दोहावली, स्कंदपुराण, श्रीचैतन्यचरितामृत, पंचदशी, श्वेताश्वतरश्रुति वेदान्तसार, योगवाशिष्ठ, कामाख्यातंत्र, मणिरत्नमाला, पातंजलदर्शन समाधिपाद, मुक्तिकोपनिषद, अशा अनेक ठिकाणचे अत्यंत योग्य असे श्लोक घेऊन त्याआधारे या ग्रंथातून विचार मांडले आहेत. 

हा ग्रंथ मुख्यतः दोन भागांत विभागला आहे. पूर्वस्कंध - प्रेमभक्ती आणि उत्तरस्कंध - जीवमुक्ती! प्रेमभक्ती या स्कंधामध्ये एकूण १७ प्रकरणं आहेत, तर जीवमुक्ती स्कंधामध्ये १५ प्रकरणं आहेत. याशिवाय शेवटच्या ‘उपसंहारा’तून परमहंस निगमानंद सरस्वती यांनी वाचकांशी थेट संवाद साधला आहे. चित्तशुद्धीसंदर्भात त्यांनी मांडलेले विचार लक्ष देऊन वाचण्यासारखे!

पहिल्या विभागात भक्ती, साधनभक्ती, भावभक्ती, प्रेमभक्ती, भक्तीलाभाचे उपाय, भक्तीच्या चौसष्ट प्रकारच्या साधना, चैतन्योक्त साधनपंचक, शांतभाव, दास्यभाव, सख्यभाव, वात्सल्यभाव, मधुरभाव , गोपिभाव, प्रेमसाधना आणि राधाकृष्ण आणि अचिंत्यभेदाभेद तत्त्व अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर विवेचन आहे.

दुसऱ्या विभागात मुक्ती, मुक्ती-स्वरूप आणि लक्षणं, वैराग्याचा अभ्यास, हरगौरी मूर्ती, संन्यास - आश्रम ग्रहण, अवधूतादि संन्यास, भगवान शंकराचार्य आणि त्यांचा धर्म, प्रकृत संन्यास, हरिहर मूर्ती, आचार्य शंकर आणि गौरांग देव, भगवान रामकृष्ण, जीवमुक्ती अवस्था - अशा अनेक मुद्द्यांची चर्चा आहे.

प्रथमदर्शनी समजायला थोडी कठीण भाषा वाटू शकणारं हे पुस्तक जसजसं वाचत जावं तसतसे त्यातले भक्ती-प्रेम-शृंगार-मुक्ती यांच्या वर्णनाचे दाखले आपल्याला आकळून पुस्तकाचं ईप्सित साध्य होतं.

हे पुस्तक जरूर वाचावं असं आहे.

पुस्तक : प्रेमिकगुरू
लेखक : परमहंस श्रीमत् स्वामी निगमानंद सरस्वती देव       
प्रकाशक : नीलाचल सरस्वत संघ, पुरी (पुणे शाखा)    
संपर्क : ७८७५७ ९५१०२
पृष्ठे : २६०
मूल्य : २५० ₹ 

(‘प्रेमिकगुरू’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link