Next
वेगळ्या वाटांवरच्या प्रवासी
BOI
Saturday, March 10 | 12:30 PM
15 0 0
Share this story

शिक्षणामुळे ज्ञानाची नवी कवाडं खुली झाल्यानंतर महिलांनी रुळलेल्या वाटा सोडून, नव्या वाटा धुंडाळायला सुरुवात केली. ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ असं म्हणत कुढण्यापेक्षा, ‘माझी कहाणी मीच लिहिणार’ या जिद्दीनं त्यांनी वाटचाल सुरू केली. मग समाज, परंपरा, परिस्थिती, शारीरिक अपंगत्व यांसारखे अडथळेही त्यांची वाटचाल थोपवू शकले नाहीत. सर्वोच्च शिखर गाठण्याचा आपला मनसुबा त्यांनी मोठ्या जिद्दीनं पूर्ण केला. ‘पहिलं पाऊल टाकणाऱ्या तेजस्विनी’ या लेखमालेच्या चौथ्या भागात जाणून घेऊ या त्यांच्याबद्दल...

उपासना मकाती :
‘व्हाइट प्रिंट’ हे ब्रेल लिपीतलं भारतातलं पहिलं लाइफस्टाइल मासिक उपासना मकाती यांनी सुरू केलं आहे. अंध व्यक्तींना वाचण्यासाठी भारतात कुठल्याही प्रकारचं साहित्य उपलब्ध नाही, हे लक्षात आल्यावर २०१३मध्ये त्यांनी ‘व्हाइट प्रिंट’ मासिक सुरू केलं. देशातल्या अगदी दुर्गम भागातल्या शाळा, महाविद्यालयं, वृद्धाश्रम, रुग्णालयं, वाचनालयं आदी ठिकाणीदेखील हे मासिक पोहोचतं. त्यांच्या या कार्याची दखल फोर्ब्ज मासिक, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् यांनी घेतली आहे. त्यांना विज्ञान आणि कल्पकता क्षेत्रातला एका खासगी संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे. 

डॉ. आशा पांडे :
दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून फ्रेंच साहित्यात पीएचडी केलेल्या डॉ. आशा पांडे यांचा फ्रान्सच्या सरकारनं ‘लायन ऑफ ऑनर’ हा तिथला सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव केला आहे. हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय महिला आहेत. फ्रेंच भाषा आणि संस्कृती यांच्या प्रोत्साहनासाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. डॉ. पांडे या ‘भारतीय रंगमंच संशोधन समाज’ या संस्थेच्या अध्यक्षपदी निवडून येणारी पहिली महिला ठरल्या आहेत.

रजनी पंडित :
देशातली पहिली खासगी गुप्तहेर महिला असा नावलौकिक असलेल्या रजनी पंडित यांना आतापर्यंत विविध संस्थांचे ५७ पुरस्कार मिळाले आहेत. खासगी गुप्तहेर म्हणून त्यांनी ७५ हजार प्रकरणांचा छडा लावला आहे. ‘फेसेस बिहाइंड फेसेस’ आणि ‘मायाजाल’ या दोन पुस्तकांच्या त्या लेखिका आहेत.

भारुलता कांबळे :
अफाट जिद्द आणि साहस यांचं उत्तम उदाहरण म्हणजे भारुलता कांबळे. आर्क्टिक सर्कलसह तब्बल ३२ देशांमधून त्यांनी एकटीनं कारप्रवास करून दाखवला आहे. या प्रवासात त्यांनी मदतीसाठी कुठलीही साधनं किंवा पथक सोबत नेलं नव्हतं. नऊ पर्वतरांगा, तीन वाळवंटं यांतून मार्ग काढत, ३५ हजार तीनशे ८३ किलोमीटर अंतराचा प्रवास त्यांनी स्वतः केला. या प्रवासात त्यांनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. असा अनोखा प्रवास करणाऱ्या आणि आर्क्टिक सर्कलमधे भारताचा झेंडा फडकवणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय महिला आहेत. 

निकोल फारिया :
निकोल फारिया ही ‘मिस अर्थ’ किताब जिंकणारी पहिली भारतीय सौंदर्यवती आहे. बेंगळुरूच्या निकोलनं अनेक नामांकित ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं आहे. रवींद्र सरोवरावर होणाऱ्या प्रदूषणाच्या दुष्परिणामांविषयी जागरुकता निर्माण करण्याचं काम ती करते आहे. 


सुनलिनी मेनन :
कॉफी टेस्टिंगच्या दुनियेतलं भारतातलं अग्रणी नाव म्हणजे सुनलिनी मेनन. ‘अन्न आणि पोषण’ विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या सुनलिनी कॉफी मंडळाच्या सदस्या आहेत. विविध उत्पादकांनी बनवलेल्या कॉफीची चव पाहून त्याचा दर्जा ठरवणं, हे त्यांचं काम. कॉफी मंडळाच्या अधिकारी वर्गात निवड झालेल्या त्या पहिल्याच महिला सदस्य आहेत. १९७८मध्ये त्यांनी कॉफी मंडळाच्या संचालिका म्हणूनही काम केलं. २००५मध्ये त्यांना ‘इंटरनॅशनल वुमेन्स कॉफी अलायन्स’चा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शत्भी बसू :
शत्भी बसू या अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड आणि बार्सच्या ‘बार अँड बेव्हरेज अॅडव्हायझर’ म्हणून काम करतात. त्या मुक्त पत्रकारदेखील आहेत. एसटीआयआर ही बारटेंडिंगचं प्रशिक्षण देणारी संस्था सुरू करण्यामध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. विद्यार्थ्यांना बारटेंडिंगचं सर्व प्रकारचं प्रशिक्षण देणाऱ्या शत्भी ‘ड्रिंक लेस ड्रिंक बेटर’ असा सल्ला सर्वांना देतात.

मंजू :
अत्यंत खडतर प्रसंगांतून मार्ग काढण्यासाठी, उत्तर पश्चिम रेल्वे क्षेत्रात हमाल म्हणून काम करण्यास सुरुवात केलेल्या मंजू या परिस्थितीपुढं हार न मानणाऱ्या महिलांचं प्रतिनिधित्व करतात. पुरुषांचंच समजलं जाणाऱ्या या क्षेत्रात काम करताना, त्यांनी जयपूर रेल्वे स्थानकात सगळ्यांना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे. 

शिरीन मर्चंट :
पाळीव कुत्र्यांना प्रशिक्षण देण्याचं आव्हानात्मक काम शिरीन मर्चंट गेली वीस वर्षं करत आहेत. ‘शीरोज’ या नावानं त्या केनाइन ट्रेनिंग क्षेत्रात ओळखल्या जातात. १९९५मध्ये त्यांनी या क्षेत्रातले तज्ज्ञ जॉन राजर्सन यांच्याकडून केनाइन ट्रेनर आणि बिहेविअरिस्ट होण्यासाठी प्रशिक्षण घेतलं. अमेरिकेत लास वेगास इथं २०१६मध्ये झालेल्या ‘प्रोफेशनल डॉग ट्रेनर्स असोसिएशन’च्या वार्षिक परिषदेसाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. या परिषदेत सहभागी होण्याचा मान मिळवलेल्या त्या पहिल्याच भारतीय आहेत.

पंकज भदोरिया :
१६ वर्षांपासून करत असलेला शिक्षकी पेशा सोडून, पंकज भदोरिया यांनी भारतातल्या पहिल्या मास्टर शेफ स्पर्धेत भाग घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात ही स्पर्धा जिंकण्यात त्या यशस्वी ठरल्या. आता त्या लोकप्रिय टीव्ही शोच्या निवेदिका, स्तंभलेखिका, व्याख्यात्या आणि काही अन्नप्रक्रिया उद्योगांच्या सल्लागार म्हणून काम करतात. त्यांनी लखनौमध्ये ‘पंकज भदोरिया कलिनरी अॅकॅडमी’ आणि ‘ट्रॅम्प ट्री कॅफे’ सुरू केला आहे.

प्रवीणा सोलोमन :
सामान्य माणूस ज्याची कल्पनाही करू शकणार नाही, असं काम प्रवीणा सोलोमन प्रत्यक्षात करत आहेत. चेन्नईतल्या सर्वांत जुन्या दफनभूमीच्या व्यवस्थापक म्हणून त्या काम करतात. दफनभूमीतल्या सर्व व्यवस्थेची देखरेख करण्याचं काम त्यांच्याकडे आहे. हे काम करत असतानाच दफनभूमी आणि परिसरातलं पर्यावरण जपण्यासाठी इतर महिलांना प्रोत्साहन देण्याचं काम त्या करतात. 

दीपा मलिक :
दिव्यांगांसाठीच्या अनेक क्रीडा स्पर्धा गाजवणाऱ्या दीपा मलिक या पॅरालिंपिक्समधे पदक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू आहेत. आशियाई स्पर्धेत सलग पाच वर्षं त्यांनी भालाफेकीत विक्रम नोंदवला आहे. पॅराप्लेजिक असूनही ‘ओपन वॉटर स्विमिंग’ करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत. यमुना नदीत पोहणाऱ्या दीपा यांनी बाइक आणि कार रॅलीतसुद्धा भाग घेतला आहे. कार रॅलीसाठी परवाना मिळवणाऱ्या आणि जगातल्या सर्वांत जास्त उंचीवरच्या ‘हिमालय राइड’ नावाच्या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्यादेखील त्या पहिल्याच भारतीय आहेत. साहसी खेळात चार वेळा उत्तम यश मिळवणाऱ्या दीपा मलिक यांच्या विक्रमांची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये झाली आहे. 

अरुणिमा सिन्हा :
२०११मध्ये चोरट्यांनी धावत्या रेल्वेतून बाहेर फेकल्यामुळे अरुणिमाला आपला डावा पाय गमवावा लागला. एवढा मोठा आघात पचवून ती पुन्हा जिद्दीनं उभी राहिली आणि माउंट एव्हरेस्टवर चढाई करण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास तिनं घेतला. आपल्या आत्मबळाच्या जोरावर एव्हरेस्ट सर करणारी ती पहिली दिव्यांग महिला ठरली. एव्हरेस्टसह आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिनातील सर्वोच्च शिखरांवर तिरंगा फडकवण्याचा विक्रम तिनं केला आहे. 

इरा सिंघल :
भारतीय नागरी सेवा परीक्षेत देशात प्रथम येण्याचा मान इरा सिंघल या दिव्यांग युवतीनं मिळवला आहे. हे यश मिळवणारी ती पहिलीच दिव्यांग युवती आहे. अभियांत्रिकीची पदवी घेऊन तिनं एमबीए ही पदव्युत्तर पदवी मिळवली. ‘कॅडबरी इंडिया लिमिटेड’मध्ये धोरण व्यवस्थापक म्हणून तिनं काम केलं आहे.

बेनो झिफाइन :
बेनो झिफाइन ही भारतीय परराष्ट्र सेवा कार्यालयात अधिकारी पदावर निवड झालेली पहिलीच अंध युवती आहे. सध्या ती पॅरिसमधल्या भारतीय दूतावासात काम करत आहे. २००८मध्ये अमेरिकेत झालेल्या जागतिक युवा नेतृत्व परिषदेत बेनोनं भाग घेतला आणि त्यानंतर तिचा आत्मविश्वास दुणावला. वक्तृत्वकलेसाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. डेक्कन क्रॉनिकलचा ‘वुमन ऑफ दी इयर’ आणि रिट्झ मासिकाचा ‘बेस्ट वुमन’ हे पुरस्कारदेखील तिला मिळाले आहेत. 

रजनी गोपालकृष्ण :
सनदी लेखापाल झालेल्या पहिल्या अंध महिला म्हणजे रजनी गोपालकृष्ण. नऊ वर्षांच्या असताना वैद्यकीय दुर्लक्षामुळे त्यांना अंधत्वाला सामोरं जावं लागलं. चिकाटी, सकारात्मकता आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी आयुष्यातल्या आव्हानांचा सामना केला. सध्याचं त्यांचं काम त्यांना व्यावसायिक समाधानाबरोबरच, समाजासाठी काही करण्याचं समाधान मिळवून देत आहे. सर्व घटकांना सामावून घेणारा, अडथळेविरहित समाज हे त्यांचं स्वप्न आहे.

निवेदिता जोशी :
स्लिप डिस्क, सर्व्हायकल स्पाँडिलायसिस आणि प्रथम स्तरावरील स्कोलिऑसिस यांमुळे आठ वर्षं अंथरुणाला खिळून असलेल्या निवेदिता यांनी योगोपचार घ्यायला सुरुवात केली आणि त्या बऱ्या झाल्या. आपल्याला मिळालेलं हे योगशास्त्राचं ज्ञान इतरांना देण्यासाठी त्यांनी २००७मध्ये दिल्लीत ‘अय्यंगार योग केंद्र’ सुरू केलं. २०१४पासून त्या अंध व्यक्तींना योग शिकवत आहेत. अंधांसाठी ब्रेल लिपीत योगशास्त्रावर पुस्तक लिहिणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत. आंतरराष्ट्रीय योगदिनी पॅरिसमधल्या ‘युनेस्को’च्या मुख्यालयात ‘योगिकास्पर्श’ या त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. 


(महिला दिनाबद्दलचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील सर्व विशेष लेख https://goo.gl/zuvB57या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत. या महिलांबद्दलचा सोबतचा व्हिडिओ जरूर पाहा. 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link