Next
एव्हरेस्टवीर मनीषा
BOI
Friday, November 23, 2018 | 06:45 AM
15 0 1
Share this article:

मनीषा वाघमारे

शिखरांचा राजा माउंट एव्हरेस्ट सर करण्याचे जगातील प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. भारतातही असे अनेक गिर्यारोहक आहेत, ज्यांनी ही अशक्यप्राय मोहीम यशस्वी केली आहे. त्यातच आता मराठवाड्यातील एका मुलीच्या नावाची भर पडली आहे. मनीषा वाघमारे असे तिचे नाव... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या गिर्यारोहक मनीषा वाघमारेबद्दल...
..........................
मूळची परभणीची असलेली मनीषा वाघमारे सध्या औरंगाबाद येथील इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालयात क्रीडा विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहे. एव्हरेस्ट शिखर सर करणारी ती मराठवाड्यातील पहिलीच महिला गिर्यारोहक ठरली आहे. तसेच पहिलीच क्रीडा विभाग प्रमुखही ठरली आहे. या तिच्या कामगिरीबद्दल राज्य शासनाने ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ देऊन तिचा गौरव केला आहे.

मागील वर्षीदेखील मनीषाने या मोहिमेची सुरुवात उत्तम प्रकारे केली होती; मात्र खराब हवामानामुळे अवघे १७० मीटर अंतर बाकी असताना तिला माघारी परतावे लागले होते. परंतु हार न मानता तिने यंदा पुन्हा एकदा ही मोहीम हाती घेतली. १७ मे रोजी तिने बेसकँपवरून चढाई करण्यास सुरुवात केली व रात्रीपर्यंत कँप चार पर्यंत पोहोचली. थोडीशी विश्रांती घेऊन लगेचच मध्यरात्री तिने कँप चारवरून एव्हरेस्टच्या सगरमाथ्याकडे चढाईस सुरुवात केली आणि सकाळी आठ वाजून १० मिनिटांनी तिने सगरमाथ्यावर पाऊल ठेवून जगातील सर्वांत उंच असलेले माउंट एव्हरेस्ट हे शिखर सर केले व भारताचा तिरंगा फडकावला. या मोहिमेत तिला शेर्पा दावा चिरिंग यांनी बहुमोल सहकार्य केले. गत वर्षी पाहिलेले स्वप्न मनीषाने यंदा थाटात पूर्ण केले. 

जगभरातील गिर्यारोहक माउंट एव्हरेस्ट शिखराकडे कारकिर्दीतील सर्वोच्च आव्हान म्हणून पाहतात. कारण कोणत्याही क्षणी बदलणारे हवामान, प्रचंड वेगाने वाहणारे वारे यामुळे अनेक गिर्यारोहकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर कित्येकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे. इतकेच नव्हे, तर शेकडो गिर्यारोहकांना मनीषाप्रमाणे थोड्या अंतरासाठी मोहीम सोडून परत फिरावे लागले आहे.

‘इंडियन कॅडेट फोर्स’ची कॅडेट असल्यामुळे मनीषाने सैनिकी प्रशिक्षण, प्रस्तरारोहण, गिर्यारोहण आधीच आत्मसात केले होते. त्यामुळेच एकीकडे क्रीडा शिक्षिका म्हणून नोकरी करत असतानाच तिला एव्हरेस्ट मोहीम खुणावत होती. ती यंदा तिने पूर्ण केली. यापूर्वीही तिने अशा खडतर मोहिमा पूर्ण केल्या आहेत. ‘शेतकरी वाचवा, देश वाचवा’ आणि ‘मुलींचे शिक्षण म्हणजेच उज्ज्वल भविष्य’, हे घोषवाक्य घेऊन तिने या मोहिमा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या.

नोव्हेंबर २०१५मध्ये तिने ‘माउंट किलिमांजारो’ हे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर सर केले. हे शिखर जगातील कठीण अशा शिखरांपैकी एक समजले जाते. कारण या शिखराला ज्वालामुखीचे शिखर म्हणतात. अत्यंत कठीण चढ आणि त्यातून प्रचंड उष्ण भाग यामुळे गिर्यारोहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मनीषाने मात्र न डगमगता ही मोहीम फत्ते केली. या मोहिमेत एकूण सहा गिर्यारोहक होते. त्यात मनीषा एकटीच भारतीय होती. सोबत चिलीचे चार आणि टर्कीचा एक गिर्यारोहक होता. एकूण दहा दिवसांत पूर्ण होणारी ही मोहीम मनीषा व तिच्या सहकाऱ्यांनी केवळ सहा दिवसांत पूर्ण करत एक प्रकारे विक्रमच केला. यातूनच तिला एव्हरेस्टची प्रेरणा मिळाली.

आफ्रिकेतील मोहीम यशस्वी झाल्यानंतर मनीषाने ‘कोसीओश्रको’ हे ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर पादाक्रांत केले.  त्यानंतर युरोपातील ‘माउंट एलबर्स’ शिखरही सर केले. या मोहिमा म्हणजे तर तिची केवळ सुरुवात होती. कारण तेव्हा तिला एव्हरेस्ट खुणावत होते. एक एक टप्पा पार करत अखेर तिने जगातील सर्वोच्च शिखरावर भारताचा तिरंगा फडकावला. शेर्पाचे सहकार्य आणि मनीषाची जिद्द यामुळे ही मोहीम फत्ते झाली. शेर्पाचे महत्त्व हे, की ते एव्हरेस्टच्याच वातावरणात आणि हिमालयाच्याच कुशीत वाढलेले असतात, त्यामुळे त्यांना तिथले वातावरण आणि हवामान यांचा अचूक अंदाज असतो. ते प्रत्येक क्षणाची तिथली परिस्थिती समजावून सांगत असतात. शिवाय कधी चढाई करावी, कधी करू नये याचे संकेतही देत असतात. 

मनीषाने आफ्रिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियातील शिखरे विक्रमी वेळेत सर केली. त्यामुळे तिच्या कामगिरीची नोंद ‘लिम्का बुक’मध्ये, तसेच राष्ट्रीय विक्रमांतही झाली आहे. ती केवळ एक गिर्यारोहकच नाही, तर एक उत्तम स्कायडायव्हरदेखील आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मनीषाला लहानपणापासूनच साहसी क्रीडाप्रकारांची आवड निर्माण झाली होती. जगातील सातही खंडातील सर्वोच्च शिखरे सर करण्याचे स्वप्न तिने पाहिले आणि ते पूर्ण केलेदेखील. प्रत्येक गिर्यारोहकासाठी तिची कामगिरी निश्चितच प्रेरणादायी ठरेल अशीच आहे.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(एव्हरेस्ट शिखर सर करण्याची नागरी मोहीम यशस्वी करणारे ‘गिरिप्रेमी’ संस्थेचे उमेश झिरपे यांची मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search