Next
वटवृक्षाच्या छायेत...
BOI
Sunday, June 18, 2017 | 10:00 AM
15 1 0
Share this article:

आज जून महिन्याचा तिसरा रविवार, अर्थात फादर्स डे. आपल्या वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. याची सुरुवात प्रामुख्याने पाश्चात्य देशांत झाली असली, तरी आज जगभरात अनेक ठिकाणी तो साजरा केला जातो आणि त्याला भारतही अपवाद नाही. या दिनाचे औचित्य साधून ‘वटवृक्षाच्या छायेत’ ही विशेष लेखमाला ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर सुरू करत आहोत. प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असलेले वडील आणि त्यांची मुले, अशा काही जोड्यांतील नातेसंबंध उलगडण्याचा प्रयत्न स्वाती महाळंक यांनी या लेखमालेतून केला आहे. ‘समाज प्रतिबिंब’ नावाच्या पुण्यातून प्रसिद्ध होणाऱ्या दिवाळी अंकात २०११मध्ये ही लेखमाला प्रसिद्ध झाली होती. ती लेखमाला इथे प्रसिद्ध केली जाणार आहे आणि त्यात काही नव्या लेखांचाही समावेश असणार आहे. दर रविवारी ही लेखमाला प्रसिद्ध होईल. या लेखमालेची पार्श्वभूमी मांडणारा हा लेख....
............
आई ही आपल्या जीवनाची शिल्पकार असते, असं म्हणतात. आणि ते खरंही आहे. मुलाला जीवनात त्याचं अस्तित्व मिळवून देण्यासाठी, त्याच्या पायात बळ निर्माण करण्यासाठी तिची अविरत धडपड सुरू असते; पण ही धडपड खऱ्या अर्थानं यशस्वी होते, तिला वडिलांचा हातभार लागतो तेव्हा! भविष्यात मुलांच्या वाट्याला सुखाचे चार क्षण यावेत, यासाठी रात्रीचा दिवस करून राबणारे वडील हा प्रत्येकाच्याच जीवनातील एक हळुवार कोपरा असतो. लहानपणी त्यांच्याविषयी मनात भीतियुक्त आदर असला, त्यांचा धाक वाटत असला, तरी कळायला लागल्यावर त्यांचं ‘फणस’ असणं जाणवायला लागतं आणि त्यांच्या झिजण्यातील चंदनी सुगंध आपण पदोपदी अनुभवत राहतो. मुलांवर संस्कार करीत त्यांचा भावनिक विकास, मानसिक जडणघडण करणारी आई आणि व्यावहारिक जगातले टक्केटोणपे खाण्यासाठी, परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी लौकिकार्थानं ‘जगणं’ शिकविणारे वडीलही म्हणूनच जीवनातली दोन अत्युच्च शिखरं! एखाद्या यशाच्या, आनंदाच्या क्षणी आई चटकन मिठीत घेऊन मोकळी होते अन् वडील जवळ घेऊन बराच वेळ पाठीवर थोपटत राहतात; पण त्याही वेळी त्यांच्या डोळ्यांच्या कोपऱ्यात तरळलेलं पाणी लपता लपत नाही. आयुष्यभर कुटुंबाच्या सुखासाठी जिवाचं रान करणाऱ्या वडिलांना अनेकदा मन मोकळं करण्यासाठीही जागा नसते. कुटुंबाचा भार पेलताना त्यांना तशी मुभा नसते. किंबहुना पालनकर्त्याच्या जबाबदारीनं वाकलेले खांदे त्यांना तशी मुभा देतच नाहीत. काल शेतात राबणाऱ्या कष्टकरी बापापासून, आज मुबलक आर्थिक लाभाच्या बदल्यात आयुष्य गहाण पडल्यागत राबणाऱ्या ‘आयटी’तल्या दमलेल्या बाबापर्यंत... पिढ्या बदलल्या... परिस्थिती बदलली... जीवनाची चाकोरी तीच आहे... आणि व्यथाही तशीच...!

या पार्श्वभूमीवर जीवनात विजयाची ध्वजा फडकावणाऱ्या आणि यशाचे कर्तृत्वकैलास निर्माण करणाऱ्या शिल्पकारांच्या पुढच्या पिढीला त्यांच्याबद्दल काय वाटतं? आज विविध क्षेत्रांमध्ये स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलेल्या या पुढच्या पिढीतल्या मान्यवरांनी आपल्या पित्याच्या वाटचालीकडे कोणत्या दृष्टीनं बघितलं? त्यांच्याकडून कळत-नकळत कोणते संस्कार घेतले? त्या संचिताचा त्यांना काय लाभ झाला, अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं ‘वटवृक्षाच्या छायेत’ या लेखमालेद्वारे शोधण्याचा प्रयत्न आहे. या संचिताचं मोल सांगताना त्यांनी खुला केलेल्या आठवणींचा खजिना भारावून टाकणारा नि बरंच काही शिकविणाराही आहे. 

वडाचं विस्तीर्ण, घनदाट झाड अनेकांना सावली देतं. त्याच्या छायेत विसावणाऱ्यांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत नाहीत. त्याच्याखाली गवत, रोपटी तर वाढतच नाहीत; पण त्याच्या पारंब्या मात्र जोमानं जमिनीकडे झेपावतात आणि चिवटपणे मातीमध्ये मुळं रोवतात. अगदी भक्कमपणे! सुरुवात असते वृक्ष म्हणून त्यांच्या स्वतंत्र जगण्याची! हे जगणं, भक्कमपणे मूळ धरणं त्या झाडानंच शिकवलेलं! मग हळूहळू पर्णसंभार वाढतो, जगणं बहरायला लागतं आणि पारंबी म्हणून रुजलेलं झाड आता स्वतंत्र वृक्ष व्हायला लागतो... विस्तीर्ण पित्यांच्या या लेखमालेतील पुढच्या पिढीनंही याच जीवनचक्रात आपलं जगणं शोधलेलं आहे आणि सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी जोमानं वाढणंही स्वीकारलेलं आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या पित्याच्या आठवणींना दिलेला उजाळा रंजक, तसंच उद्बोधकही ठरावा!

दोन पिढ्यांच्या या जगण्याचा वेध घेताना नकळत कुठेतरी माझ्या मनात होते माझे वडील! घरची परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही मनात जागी असलेली शिकण्याची तळमळ... शिक्षणासाठी अहोरात्र केलेले कष्ट...पडतील ती कामं करून मिळणाऱ्या चार पैशांतून हिमतीनं सुरू केलेली वाटचाल... त्यातून निर्धारानं साध्य केलेलं ध्येय... आणि हे सगळं करताना मनात चुकूनही डोकावू न दिलेला परिस्थितीबद्दलचा कडवटपणा...! जो त्रास आपल्या वाट्याला आला तो इतरांना भोगावा लागू नये यासाठी आजही विविध मार्गांनी सुरू असलेली धडपड... असंख्य लोकांना पोटापाण्याला लावणं.. कुठल्याही चांगल्या कामात आपला खारीचा वाटा उचलणं... सहृदयतेची दिसणारी कितीतरी रूपं आणि ‘मुलं कर्तृत्वानं माझ्यापेक्षा पुढं गेली’ असं भरभरून चार-चौघांजवळ कौतुक करण्याचा उदार भाबडेपणा...! त्यांचं हे जगणं डोळ्यापुढून हलत नाही आणि त्या जगण्याचा संस्कार मनावरून पुसट होत नाही. हे ऋण कधीच न फिटणारं...! आजतागायत मला आपल्या शीतल छायेमध्ये विसावण्याचं सुख देणाऱ्या या वटवृक्षाबद्दलची अपार कृतज्ञता म्हणूनच हा प्रपंच.!

- स्वाती महाळंक
संपर्क : ८८८८१ ०२२०७

(लेखिका पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार, लेखिका आहेत.)

(या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search