Next
‘समाजसेवा व्यक्तिसापेक्ष असता कामा नये’
डॉ. विकास आमटे यांच्या ‘आनंदवनाचा विकास’चे प्रकाशन
प्रेस रिलीज
Monday, October 01, 2018 | 03:28 PM
15 0 0
Share this story

‘आनंदवनाचा विकास’ पुस्तक प्रकाशनावेळी डावीकडून विशाल सोनी, भरत अगरवाल, डॉ. चित्रलेखा पुरंदरे, डॉ. शीतल आमटे, डॉ. विकास आमटे, मनोहर सोनावणे व डॉ. मंदार परांजपे.

पुणे : ‘समाजासाठी काम करण्याच्या भावनेतून आज अनेक तरुण पुढे येतात; मात्र बऱ्याचदा प्रसिद्धी आणि स्वार्थ यावर भर दिला जातो. बाबा आमटे यांनी शिकवलेली नि:स्वार्थी समाजसेवा आपण अंगिकारली पाहिजे. समाजातील वंचितांना सन्मानाचे आयुष्य जगण्यासाठी आपली सेवा उपयोगी पडावी. समाजहिताचे विधायक काम उभारायचे असेल, तर समाजसेवा व्यक्तिसापेक्ष असता कामा नये,’ असे प्रतिपादन वरोरा येथील महारोगी सेवा समितीचे विश्वस्त डॉ. विकास आमटे यांनी केले.

विश्वकर्मा पब्लिकेशन्स प्रकाशित आणि डॉ. चित्रलेखा पुरंदरे लिखित ‘आनंदवनाचा विकास’ या पुस्तकाचे प्रकाशन यशदा येथे आयोजिलेल्या सहाव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलमध्ये झाले. त्या वेळी साधलेल्या संवादात ते बोलत होते. व्यक्ती, समूह आणि क्षेत्र या घटकांचा विकास यावर भर देण्याची गरज असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.

या प्रसंगी आनंदवन स्मार्ट व्हिलेजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक भरत अगरवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, संपादक मनोहर सोनावणे, पुस्तकाच्या लेखिका डॉ. चित्रलेखा पुरंदरे, संवादक डॉ. मंदार परांजपे आदी उपस्थित होते. डॉ. मंदार परांजपे यांनी डॉ. विकास व शीतल आमटे यांची मुलाखत घेतली.

डॉ. आमटे म्हणाले, ‘बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी उभारलेल्या ‘आनंदवना’ला पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. आतापर्यंत जवळपास ११ लाख कुष्ठरोग्यांना ‘आनंदवना’ने आधार दिला. ‘आनंदवन’ हे एक कुटुंब आहे. इथल्या कोणालाही जातपात नाही की धर्मही नाही. प्रत्येकजण स्वयंशिस्तीने आणि स्वयंप्रेरणेने तनमनधन अर्पूण काम करतो. ‘आनंदवन’ हे खऱ्या अर्थाने स्मार्ट व्हिलेज आहे. तशी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली खेडी निर्माण व्हावीत. ‘आनंदवना’तला कुष्ठरोगी सर्वच बाबतीत सक्षम आहे; मात्र अजूनही समाजाकडून कुष्ठरोग्यांना पाहिजे तसा सन्मान दिला जात नाही.’

डॉ. शीतल आमटे म्हणाल्या, ‘लहानपणापासून आम्ही ‘आनंदवना’त वाढल्याने त्याच कुटुंबवत्सल वातावरणात आम्ही घडलो. बाबा आमटे, डॉ. विकास आमटे यांनी घालून दिलेली सर्व तत्वे अंगिकारली म्हणूनच आज लोकांचे प्रेम आम्हाला मिळत आहे. वैद्यकीय व्यवसायाच्या पलीकडे जाऊन लोकांचे प्रश्न जाणून त्यांना मदत करणे, लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे हे ‘आनंदवना’चे महत्त्वपूर्ण काम आहे. आमच्या पुढल्या पिढीनेही तेच स्वीकारून पूर्णवेळ याच कार्यात झोकून दिले आहे.’

डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी पुस्तक लेखनामागील भावना मांडल्या. सूत्रसंचालन कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link