Next
रत्नदुर्ग किल्ल्यावर मुलांनी गिरवले धाडसाचे धडे
‘रत्नदुर्ग माउंटेनीअर्स’च्या रौप्यमहोत्सवानिमित्त संस्थेतर्फे आयोजन
BOI
Monday, November 26, 2018 | 11:16 AM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
गिर्यारोहण क्षेत्रात रत्नागिरीत कार्यरत असलेल्या रत्नदुर्ग माउंटेनीअर्स या संस्थेने नुकतेच रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने संस्थेने मुला-मुलींसाठी रत्नदुर्ग किल्ल्यावर तीन दिवसांच्या साहसी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या प्रशिक्षण शिबिरात स्थानिक मुला-मुलींसह मुंबई, पुणे, नाशिक, चिपळूण येथील १० ते १८ वयोगटातील ५६ मुले सहभागी झाली होती. शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित, ‘एमटीडीसी’चे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी, ‘रत्नागिरी खबरदार’चे  हेमंत वणजू आणि भगवती किल्ल्याचे श्री. मोंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिरात बेसिक रॉक क्लायंबिंग, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, नॉट मेकिंग, ट्रेकिंग, झिपलाइन, बोटिंग, बर्ड वॉचिंग, रोप वॉकिंग, केव्हिंग, लॅडर क्लायंबिंग, टेंट पिचिंग, रायफल शूटिंग, टीम बिल्डिंग ग्रुप गेम्स आणि फनी गेम्स आदी अनेक प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. गिर्यारोहण म्हणजे काय, ते करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. साहसी उपकरणांचा उपयोग कसा करायचा या संदर्भात शिबिरामध्ये प्रदीप केळकर यांनी मार्गदर्शन केले. केळकर यांनी १५०पेक्षा जास्त सुळके सर केले असून, महाराष्ट्र राज्याचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च असा शिवछत्रपती पुरस्कार त्यांना मिळालेला आहे.

शरीर आणि मनाचा समतोल साधणारी, एकाग्रता वाढवणारी नेमबाजी किंवा रायफल शूटिंग या प्रकारचे प्रशिक्षण शाळा, तसेच अन्य प्रशिक्षण वर्गांमध्ये सहसा दिले जात नाही. हे प्रशिक्षण रत्नदुर्ग शूटिंग क्लबचे विनय देसाई आणि त्यांच्या टीमने मुलांना दिले. देसाई हे स्टेट लेव्हल गोल्ड मेडलिस्ट आहेत. ‘सुशेगाद जलविहार’ने मुलांना भाट्ये खाडीमध्ये बोटिंग घडवून आणले. 

‘उद्घाटन सोहळ्यापासून समारोपापर्यंत तीन दिवसांचे उपक्रम पाहून मन भारावून गेले. आई भगवतीच्या कुशीत, छत्रपती शिवरायांच्या स्पर्शाने पावन झालेल्या रत्नदुर्ग किल्ल्यावर साहसी शिबिरात सहभागी झालो, याचा सार्थ अभिमान वाटतो. निसर्गाची ओळख, जेवणाची उत्तम सोय, टेंटमध्ये राहण्याची सुविधा यामुळे सर्व शिबिरार्थी आनंदले. साहसी उपक्रमांमुळे मनातली भीती गेली. मुलांना नवे मित्र, मैत्रिणी मिळाले,’ अशी प्रतिक्रिया शिबिरात सहभागी झालेली सारा सुर्वे हिचे आजोबा बाळकृष्ण कदम यांनी व्यक्त केली. या शिबिरात संस्थेचे अध्यक्ष शेखर मुकादम व साहसी क्रीडा प्रशिक्षक प्रदीप केळकर, उपाध्यक्ष वीरेंद्र वणजू , कॅम्प लीडर जितेंद्र शिंदे, गणेश चौघुले आणि संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते. सर्व सहभागी शिबिरार्थींना शेवटच्या दिवशी रत्नदुर्ग माउंटेनीअर्सच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाच्या सहभागी झालेल्या मुलांचे पालकही उपस्थित होते.

(‘रत्नदुर्ग माउंटेनीअर्स’च्या विविध उपक्रमांबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search