Next
‘मोबाइल हॅंडवॉशचा उपक्रम उपयुक्त’
BOI
Tuesday, July 17, 2018 | 10:17 AM
15 0 0
Share this storyसोलापूर : ‘जिल्हा परिषदेने आषाढी वारीत वारकऱ्यांना हात धुण्यासाठी राबविलेला मोबाइल हॅंडवॉश (हात धुणे रथ) उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. असे उपक्रम राज्यात विविध ठिकाणी भरणाऱ्या मोठ्या यात्रांमध्ये राबविल्यास त्याचा लाभ भाविकांच्या आरोग्यासाठी होईल,’ असे मत पालकमंत्री विजय देशमुख यांनी व्यक्त केले.

आषाढी वारी सोहळ्यासाठी १७ जुलैपासून संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल होत आहेत. यानिमित्ताने भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री देशमुख यांनी वारीच्या तयारीचा आढावा घेतला. यानंतर त्यांच्या हस्ते मोबाइल हॅंडवॉश स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उप विभागीय अधिकारी सचिन ढोले, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय आदी मान्यवर उपस्थित होते.

‘आषाढी वारी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना मूलभूत सेवा सुविधा प्राधान्याने मिळाव्यात यासाठी संबंधित विभागांनी पुन्हा एकदा आपल्याकडील कामांचा व सेवांचा आढावा घ्यावा. वारी कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. शहरात मुबलक पाणी, अखंडीत वीज पुरवठा यावर लक्ष केंद्रीत करावे. मंदिर समिती, पोलिस यंत्रणा, नगरपालिका, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागांसह संबंधित विभागांनी वारकऱ्यांना सुविधा देण्यात दक्ष रहावे. पालखी तळ व शहरात उभारण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात सर्व सुविधा प्राधान्याने उपलब्ध ठेवाव्यात,’ असा सूचना या वेळी देशमुख यांनी दिल्या.

‘शासन स्वच्छतेबाबत तसेच वारकऱ्यांच्या आरोग्याबाबत गंभीर आहे. जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालखी मार्ग, पालखी तळ आणि पंढरपुरात आषाढी वारी कालावधीत भाविकांसाठी हात धुणे रथ तयार करण्यात आला आहे. वारकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले.

आषाढी वारीत येणाऱ्या भाविकांची स्वच्छतेबाबत जिल्हा प्रशासन घेत असलेली काळजी हे राज्यात स्वच्छतेचे संस्कार गतिमान होत असलेचे प्रतिक आहे, स्वच्छतेबाबत प्रशासनाने केलेले काम कौतुकास्पद असल्याचे देशमुख यांनी या वेळी नमूद केले.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, ‘वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी आणि त्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावे या दोन्ही हेतूंनी जिल्हा परिषदेचा हात धुणे उपक्रम स्तुत्य आहे.’

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी हात धुणे उपक्रमाबाबत माहिती दिली. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील आपत्कालीन निवारण कक्ष, पत्राशेड, ६५ एकर येथील वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली.

बैठकीस अकलूजच्या उपविभागीय अधिकारी शमा पवार, तहसीलदार मधुसूदन बर्गे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी विशाल बडे उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
एस. एम . पाढरे About 251 Days ago
असे उपक्रम राज्यभरातील यात्रांमध्ये राबवले पाहिजेत . जोतीबा यात्रेत किंवा नेहमीच तिथे असा उपक्रम राबवण्याची गरज आहे .
0
0

Select Language
Share Link