Next
‘एकच प्याला’वर आधारित ‘कथामय नाट्यसंगीत’
दिवाळी पाडव्यानिमित्त रत्नागिरीतील खल्वायन संस्थेतर्फे आयोजन
BOI
Tuesday, November 06, 2018 | 03:33 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
रत्नागिरीतील खल्वायन संस्थेने दिवाळी पाडव्यानिमित्त ‘कथामय नाट्यसंगीत’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम ‘संगीत एकच प्याला’ या शतकमहोत्सवी नाटकावर आधारित आहे. आठ नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी पाच वाजता रत्नागिरीतील पऱ्याच्या आळीतील गुरुकृपा मंगल कार्यालयात ही मैफल रंगणार आहे. खल्वायन संस्थेचे अध्यक्ष मनोहर जोशी, सचिव प्रदीप तेंडुलकर आणि खजिनदार श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली.

१९९७मध्ये स्थापन झालेल्या खल्वायन संस्थेची ही ४१वी विशेष मैफल आहे. संगीत एकच प्याला या नाटकाचे शताब्दी वर्ष, राम गणेश गडकरी यांचे स्मृतिशताब्दी वर्ष, नटसम्राट बालगंधर्व यांची ५१वी पुण्यतिथी आणि संगीतसूर्य डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या ३५व्या पुण्यतिथीनिमित्ताने संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटिडेने ही मैफल प्रायोजित केली आहे.

कथामय नाट्यसंगीतामध्ये पं. जयराम पोतदार, वामन जोग, पौर्णिमा साठे, अजिंक्य पोंक्षे व हिमानी भागवत हे कलाकार सादरीकरण करणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन व ऑर्गनसाथ अशा भूमिका पं. जयराम पोतदार भूषवणार आहेत. त्यांनी मराठी साहित्यात एमए केले असून, पत्रकारिता आणि ग्रंथालय शास्त्र पदवीधर आहेत. त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण वडील डॉ. पांडुरंग यांच्याकडे घेतले. त्यानंतर पं. मनोहर बर्वे, डॉ. वसंतराव देशपांडे यांच्याकडूनही धडे घेतले. त्यांना ऑर्गनचे मार्गदर्शन पं. विष्णुपंत वष्ठ यांच्याकडून मिळाले. वयाच्या १५व्या वर्षापासून आजतागायत स्वयंवर, मानापमान, कट्यार काळजात घुसली, सौभद्र, शारदा, विद्याहरण, संशयकल्लोळ, सुवर्णतुला या नाटकांना त्यांनी ऑर्गनची साथसंगत केली आहे. डॉ. वसंतराव देशपांडे, पं. राम मराठे, स्वरराज छोटा गंधर्व इत्यादी दिग्गज गायक अभिनेत्यांना त्यांनी संगीत नाटकांत ऑर्गनची साथ केली आहे. विदुषी किशोरी आमोणकर, गंगूबाई हंगल, माणिक वर्मा, डॉ. प्रभा अत्रे, पं. जसराज, पं. कुमार गंधर्व, पं. सी. आर. व्यास आदी गायकांना त्यांनी देश-विदेशात हार्मोनियमची साथसंगत केली आहे. ते १९७५पासून आकाशवाणी व दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कलावंत आहेत. भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागात उच्चपदस्थ अधिकारी म्हणून १९८०पासून ते कार्यरत आहेत. नवी दिल्लीतील संगीत नाटक अकादमीकडून त्यांना मराठी नाट्यसंगीतावर संशोधन करण्यासाठी २००३मध्ये सीनिअर फेलोशिप प्राप्त झाली आहे. अनेक संस्थांचे मानाचे पुरस्कार प्राप्त त्यांना मिळाले आहेत.

कलाकार वामन जोग हे सूत्रधाराच्या भूमिकेत असून, प्रायोगिक रंगभूमीवर ते ४० वर्षे कार्यरत आहेत. ते आकाशवाणीचे ए ग्रेड कलाकार आहेत. स्थापत्य अभियंता म्हणून त्यांनी एसटी महामंडळामध्ये ३६ वर्षे नोकरी केली. ते विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करतात. पौर्णिमा साठे या अभिनेत्रीच्या भूमिकेत असून, त्या आकाशवाणीच्या बी ग्रेड कलाकार आहेत. गेली १५ वर्षे त्या आकाशवाणीवर निवेदिका आहेत. त्यासुद्धा विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करतात. अनेक नाटकांमधून त्यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत.

गायक अजिंक्य पोंक्षे याने ‘खल्वायन’च्या संशयकल्लोळ नाटकाद्वारे संगीत रंगभूमीवर पदार्पण व गायनासाठी रौप्यपदक प्राप्त केले. त्यानंतर प्रीतिसंगम, सौभद्र या नाटकांमधून प्रमुख गायक नट म्हणून त्याने राज्य नाट्य स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. डॉ. कविता गाडगीळ, प्रसाद गुळवणी यांच्याकडून त्याने शास्त्रीय संगीताचे मार्गदर्शन घेतले व अनेक ठिकाणी गायनाचे कार्यक्रम केले आहेत. 

हिमानी भागवत हिने शास्त्रीय संगीताचे सुरुवातीचे मार्गदर्शन वडील योगेश भागवत व डॉ. कविता गाडगीळ, त्यानंतर पुण्याच्या अश्विनी चांदेकर यांच्याकडून घेतले. सुगम संगीताचे शिक्षण तिने चिपळूणच्या स्मिता करंदीकर यांच्याकडे घेतले. ती एमएस्सी (फिजिक्स) असून, अनेक ठिकाणच्या शास्त्रीय व सुगम संगीत स्पर्धांमध्ये तिने उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. तबला - प्रथमेश शहाणे, ऑर्गन - पं. जयराम पोतदार, हार्मोनियम - मधुसूदन लेले हे कार्यक्रमात साथसंगत करणार आहेत.

‘एकच प्याला’चे शताब्दी वर्ष
मर्मभेदक विनोदी लेखक, प्रतिभासंपन्न नाटककार आणि अभिजात कवी असलेल्या गडकरी यांचा करुण आणि हास्य हे परस्परविरोधी रस सारख्याच सफाईने खेळवण्यात गडकऱ्यांचा हातखंडा होता. एकच प्याला, पुण्यप्रभाव, भावबंधन, प्रेमसन्यास ही चार नाटके त्यांनी लिहिली. राजसंन्यास व वेड्यांचा बाजार ही त्यांची अपूर्ण नाटके. या श्रेष्ठ साहित्यिकाचे देहावसान २३ जानेवारी १९१९ रोजी झाले. ‘एकच प्याला’चा पहिला प्रयोग २० फेब्रुवारी १९१९ रोजी बडोद्यात झाला. त्यामुळे या नाटकाचे हे शताब्दी वर्ष आहे.

‘खल्वायन’ची २१ वर्षे
खल्वायन संस्थेने २१ वर्षे रत्नागिरीच्या सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी संस्थेतर्फे विनाशुल्क मासिक संगीत मैफल होते. तसेच गुढीपाडवा व दिवाळी पाडव्याला (सशुल्क) विशेष संगीत मैफली होतात. आतापर्यंत २५२ मासिक व ४० मोठ्या संगीत मैफलींचे यशस्वी आयोजन संस्थेने केले आहे. तसेच संस्थेने पाच नवीन व सहा जुन्या संगीत नाटकांची यशस्वी निर्मिती करून राज्य नाट्य स्पर्धा व अनेक ठिकाणच्या संगीत नाट्य महोत्सवांत यश मिळवले आहे. दर वर्षी संस्थेतर्फे संगीत प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search