Next
‘डासांपासून बचावासाठी मच्छरदाणी वापरावी’
प्रेस रिलीज
Saturday, September 15, 2018 | 05:17 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘परिसरात, घरात साठलेल्या पाण्यामध्ये, अस्वच्छ्तेच्या ठिकाणी, भाताच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर डास वाढतात. कळत नकळत ते आपल्याला चावतात. यातून हिवताप, हत्तीरोग, डेंगी, चिकनगुणिया, झीका अशा गंभीर रोगांचा प्रसार होतो. डास हा माणसाचा मोठा शत्रू असून, या जीवघेण्या आजारांवर नियंत्रण आणायचे असेल, तर डासांपासून बचाव करता आला पाहिजे. यासाठी मच्छरदाणी, कीटकनाशक फवारणी उपयुक्त ठरते,’ असे मत राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेतील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र सोमण यांनी व्यक्त केले.

मराठी विज्ञान परिषद आणि फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगप्पा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात ‘डासांच्या विश्वात एक फेरफटका’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र, कार्यवाह संजय मालती कमलाकर, ज्येष्ठ सदस्य डॉ. विद्याधर बोरकर आदी विज्ञानप्रेमी उपस्थित होते.   

डॉ. सोमण म्हणाले, ‘साधारणत: २५ मीटर अंतरावरून डासाला आपल्या भक्ष्याची जाणीव होते. शरीरातील उष्णता, घाम, लॅक्टिक ऍसिड, कपड्याचा रंग याद्वारे डास आपले भक्ष्य शोधत असतात. माणसाच्या श्वासातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. त्यामुळे डास माणसाच्या चेहऱ्याभोवती गुणगुणत असतात. आपल्याकडे मॅनसोनिया, टॉक्सोरिन्काइट्स, युरेनोटेनिया, क्युलेक्स, एडिस कोची, लिनॅटोपेनिस आदी प्रकारचे डास आढळून येतात. यात मॅनसोनिया हा डास जलपर्णीमध्ये वाढतो. टॉक्सोरिंकाइट्स हा डास शाकाहारी असतो; त्याच्या अळ्या मात्र मांसाहारी असतात.’

‘रक्त प्यायल्यानंतर मादीच्या शरीरात लगेच अंडी तयार व्हायला लागतात. तीन दिवसांत मादी अंडी देण्यास सक्षम होते व साधारण १०० ते ३०० अंडी घालते. पाण्यावरून उडताना मादी एकेक अंडे फेकत चालते. डासांचा उडण्याचा वेग ताशी सुमारे एक ते दीड किलोमीटर इतका लांब असून, खाडीच्या खाऱ्या पाण्यातील काही डास २० ते ५० किलोमीटर उडतात. काही डास हवेत स्वार होऊन मुक्तसंचार करीत भक्ष्य शोधतात,’ असेही डॉ. सोमण यांनी नमूद केले.

डॉ. सोमण यांनी डासांच्या आयुष्याचा आढावा घेतला. डासांचे नमुने गोळा करून त्यांवर कशाप्रकारे संशोधन केले जाते, याविषयी त्यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. विद्याधर बोरकर यांनी केले. आभार विनय र. र. यांनी मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search