Next
पहिल्या स्त्री संपादक तानुबाई बिर्जे
BOI
Tuesday, October 16 | 08:00 AM
15 0 0
Share this story

पतिनिधनानंतर ‘दीनबंधू’ हे वृत्तपत्र बंद पडू न देता ते स्वतः अत्यंत उत्तम पद्धतीनं चालवून तानुबाई बिर्जे यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांचं कर्तृत्व सिद्ध केलं. ‘नवरत्ने’ मालिकेत आज माहिती घेऊ या पहिल्या स्त्री संपादक तानुबाई बिर्जे यांच्याबद्दल...
...........
जन्मानं पुणेकर असलेल्या तानुबाईंना लहानपणापासूनच आपले शेजारी असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अगदी जवळून सहवास मिळाला. आपले शालेय शिक्षणही त्यांनी महात्मा फुलेंच्या शाळेतूनच पूर्ण केलं. १८७६ साली जन्माला आलेल्या तानुबाईंचा वयाच्या १७व्या वर्षी म्हणजेच १८९३ साली वासुदेव बिर्जे यांच्याशी विवाह झाला. 

त्या काळी बहुजन समाजात स्तुत्य मानल्या गेलेल्या सत्याशोधकीय पद्धतीने हा विवाह पार पडला आणि त्या ‘ठोसर’च्या ‘बिर्जे’ झाल्या. श्री. बिर्जे बडोदा सरकारमध्ये ग्रंथपाल म्हणून नोकरीस होते. १८७७ साली म्हणजेच तानुबाईंच्या जन्मानंतर अवघ्या एका वर्षानं कृष्णाजी भालेकर यांनी सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून सुरू केलेलं ‘दीनबंधू’ हे वृत्तपत्र आर्थिक अडचणीमुळे बंद पडलं होतं. १८८०मध्ये परत सुरू झालेल्या त्या वृत्तपत्राची जबाबदारी १८९७पासून श्री. बिर्जे यांनी घेतली. त्यासाठी त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. दुर्दैवानं त्यानंतर नऊच वर्षांनी त्यांचं निधन झालं. आता हे वृत्तपत्र परत बंद पडणार असंच सगळ्यांना वाटलं; पण तसं झालं नाही. ‘तानुबाईंनी’ संपादकपदाची सगळी सूत्रं आपल्या हातात घेतली आणि त्या दिवशी त्या बहुजन समाजातल्याच किंवा महाराष्ट्रातल्याच नव्हे, तर भारतातल्या पहिल्या महिला संपादक झाल्या. 

त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव नव्हता, पण शिक्षण होतं. शिवाय वडिलांचे, फुले दाम्पत्याचे आणि पतीचे सामाजिक कामाचे संस्कारही जोडीला होते. त्या शिदोरीवर ३२ वर्षांच्या तानुबाईंनी संपादकपदाची ही जबाबदारी समर्थपणे पेलली. हे करताना त्यांना अनेक आर्थिक अडचणी आल्या. आर्थिक अडचणीमुळे वृत्तपत्र बंद पडणार अशीही वेळ आली; पण आपले दागिने विकून तानुबाईंनी ती अडचणही दूर केली. १९०६ ते १९१२ अशी एकूण सहा वर्षं त्यांनी या वृत्तपत्राचं संपादन केलं. त्यांच्या या सहा वर्षांच्या कारकिर्दीत वृत्तपत्राचा बदललेला चेहरामोहरा सगळ्यांनी बघितला. सत्यशोधक चळवळीच्या बातम्यांवर त्या अधिक भर देत होत्या, तरीही बातम्यांमध्ये वैविध्य असावं, याकडे तानुबाईंचा कटाक्ष असे. 

समकालीन वृत्तपत्रांपेक्षा वेगळेपण जपत, समाजकारण-राजकारणाबरोबरच तानुबाईंनी शिक्षण, कृषी, संशोधन, कला यांसारख्या अनेकविध विषयांना आपल्या वृत्तपत्रात स्थान दिलं. ठराविक विषयांवर अभ्यासपूर्ण लेखमालाही प्रकाशित केल्या. वेळोवेळी होणारे समारंभ, दिले जाणारे पुरस्कार, तयार होणाऱ्या योजना यांचीही सविस्तर माहिती ‘दीनबंधू’मध्ये वाचायला मिळत असे. ठिकठिकाणी आयोजित केले गेलेले मेळावे, अधिवेशनं, संमेलनं या सगळ्याचा इत्थंभूत वृत्तांत त्या प्रकाशित करत असत. एखाद्या नव्याने प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या अथवा नाटकाच्या परीक्षणालाही त्यांनी नेहमीच स्थान दिलं. टायटॅनिक बोट बुडाल्याची बातमीही ‘दीनबंधू’त आली होती, असं वाचनात आलं.

वृत्तपत्रातल्या इतर मजकुराबरोबरच तानुबाईंचा संपादकीय लेख हे वाचकांसाठी मुख्य आकर्षण असे. त्यातही त्यांनी वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला. आपल्या लेखाची सुरुवात त्या नेहमी तुकारामांच्या अभंगाने करत असत. ‘लेजिस्लेटिव्ह कौन्सिल आणि बहुजन समाज’ या विषयावरचं जुलै १९१२मधलं त्यांचं संपादकीय बरंच गाजलं आणि चर्चिलं गेलं. तत्कालीन सामाजिक व राजकीय परिस्थितीची उत्तम जाण असलेल्या तानुबाईंनी आपल्या अग्रलेखांतून सामाजिक विषमतेवर प्रहार करून त्याची नेहमीच चिरफाड केली. आपल्या हातात असलेल्या वृत्तपत्रासारख्या शक्तिशाली शस्त्राचा त्यांनी समाज प्रबोधनासाठी पुरेपूर वापर केला. 

दुर्दैवानं त्यांची ही कारकीर्द अवघी सहा वर्षांचीच ठरली. १९१३ साली त्यांचा मृत्यू झाला; पण विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात बहुजन समाजाबरोबरच, महाराष्ट्रातल्या एकूणच समाजप्रबोधनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

- आरती आवटी
ई-मेल : aratiawati@gmail.com

(‘नवरत्ने’ मालिकेतील सर्व लेख https://goo.gl/T9ihBw या लिंकवर उपलब्ध आहेत. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
खूप छान माहिती About 43 Days ago
लेखआवडला
0
0

Select Language
Share Link