Next
हिमाचा महिमा!
BOI
Friday, July 13, 2018 | 05:21 PM
15 0 0
Share this story

हिमा दास

एकीकडे संपूर्ण देश जेव्हा भारतीय क्रिकेट संघानं इंग्लंडला त्यांच्याच मातीत धूळ चारल्याचा आनंद साजरा करत होता, तेव्हा तिकडे फिनलँडच्या टॅम्पेरे शहरात आसाममधली १८ वर्षांची धावपटू हिमा दास एक नवा इतिहास रचत होती. ‘आयएएफ वर्ल्ड-अंडर २० अॅथलेटिक्स चँपियनशिप’ (IAAF World U20 Championship) स्पर्धेत ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत हिमानं सुवर्णपदक मिळवलं. ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशन्स’च्या (आयएएफ) स्पर्धेत भारताच्या खात्यात नोंदवलं गेलेलं आजवरचं हे पहिलंच सुवर्णपदक आहे. तसंच, आजवर कोणतीही भारतीय महिला खेळाडू जागतिक चँपियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवू शकली नव्हती. त्यामुळे या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून हिमानं हा दुहेरी विक्रम करण्याचा पराक्रम गाजवला आहे. 

हिमानं ४०० मीटरचं अंतर केवळ ५१.४६ सेकंदांत पार केलं. रोमानियाच्या एंड्रिया मिकलोस हिने रौप्य, तर अमेरिकेच्या टेलर मेंसन हिने कास्यपदक मिळवलं. पहिल्या काही सेकंदांपर्यंत हिमा पहिल्या तीन स्पर्धकांमध्येही नव्हती. परंतु नंतर वेग पकडत तिने सुवर्णपदक काबीज केलं. बुधवारी (११ जुलै २०१८) झालेल्या उपांत्यपूर्व फेरीतही हिमाची कामगिरी उत्तम होती. त्यातही तिने ५२.१० सेकंदांचा वेळ घेऊन शर्यत पूर्ण केली होती आणि तिथेही ती पहिल्या क्रमांकावर होती. 

आसाममधल्या नागाव जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात जन्मलेली हिमा म्हणजे रोंजित दास आणि जोमाली या दांपत्याचे सहावे अपत्य. शाळेत असल्यापासूनच हिमा भाताच्या शेतात चिखलात फुटबॉल खेळायची. त्यानंतर तिने अॅथलेटिक्स खेळाडू होण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला तिला काही जणांनी दिला. क्रीडा आणि युवा कल्याण संचालनालयाचे त्या वेळचे आंतर-जिल्हा स्पर्धेचे प्रशिक्षक निपॉन यांच्याशी तिच्या वडिलांची गाठ पडली आणि तिथून हिमाच्या खेळातल्या प्रवासाला प्रारंभ झाला. अॅथलेटिक्सच्या प्रशिक्षकाने हिमाला घरापासून दूर, गुवाहाटीला जाऊन शिकण्याचा दिलेला सल्ला, त्याला हिमाच्या आई-वडिलांनी केलेला विरोध, प्रशिक्षकांनी त्यांची केलेली मनधरणी आणि त्यानंतर हिमाचा राज्य अकादमीत झालेला प्रवेश या घटना हिमाच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या ठरल्या. 

हिमाच्या या असीम कामगिरीने सोशल मीडियावरचे ट्रेंड्सही लगेचच बदललेले पाहायला मिळाले. भारत-इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट मालिकेच्या संदर्भातले ट्रेंड्स ट्विटरवर सुरू होते. हिमाला सुवर्णपदक मिळाल्यानंतर ते ट्रेंड्स बदलून काही मिनिटांत हिमा दासच्या नावाचे ट्रेंड्स पहिल्या क्रमांकावर आल्याचं दिसलं. अर्थातच संपूर्ण भारतवर्षासाठी हा एक गौरवाचा, आनंदाचा क्षण होता.  

स्पर्धेच्या शेवटी सुवर्णपदक स्वीकारताना राष्ट्रगीत सुरू झाले तेव्हा हिमाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले. ‘याच क्षणासाठी केला होता अट्टहास...’ अशाच भावना तेव्हा तिच्या मनात आल्या असतील... या जिद्दी हिमाला सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link