Next
गुरुदत्त, संजीवकुमार, टॉम हँक्स
BOI
Monday, July 09, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

असामान्य दिग्दर्शक, दूरदृष्टीचा निर्माता आणि संवेदनशील अभिनेता गुरुदत्त, ऑल टाईम ग्रेट अभिनेता संजीवकुमार आणि लागोपाठ दोन वर्षं ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार खिशात घालणारा टॉम हँक्स यांचा नऊ जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
..... 
गुरुदत्त 

नऊ जुलै १९२५ रोजी बेंगळुरूमध्ये जन्मलेला वसंतकुमार शिवशंकर पदुकोन ऊर्फ गुरुदत्त हा हिंदी चित्रपटसृष्टीतला असामान्य दिग्दर्शक, दूरदृष्टीचा निर्माता आणि संवेदनशील अभिनेता म्हणून विख्यात आहे. त्याला नृत्याची उत्तम जाण होती आणि संगीताचा उत्तम कानसुद्धा. ओ. पी. नय्यर, सचिनदेव बर्मन, हेमंतकुमार, रवी यांसारख्या मातब्बर संगीतकारांकडून त्याने अजरामर गाणी आपल्या सिनेमांसाठी मिळवली. अवघ्या ३९ वर्षांच्या आयुष्यात त्याने जी कामगिरी करून ठेवली आहे, त्याला तोड नाही. १९५१सालच्या ‘बाझी’पासून ते १९५९च्या ‘कागज के फूल’पर्यंतच्या आठ अफलातून कलाकृतींचं दिग्दर्शन, १९५४च्या ‘आरपार’पासून ते १९६६च्या ‘बहारें फिर भी आएगी’पर्यंतच्या आठ उत्तम सिनेमांची निर्मिती आणि १९४४च्या ‘चांद’पासून ते १९६४च्या ‘सांज और सवेरा’पर्यंतच्या १६ बहारदार सिनेमांतला अभिनय ही कामगिरी अचंबित करणारी अशीच म्हणावी लागेल! त्याने दिग्दर्शित केलेले सर्वच सिनेमे म्हणजे आदर्श दिग्दर्शनाचा वस्तुपाठ ठरले असले, तरी खास उल्लेख करावाच लागतो तो ‘प्यासा’ आणि ‘कागज के फूल’ या दोन सिनेमांचा! जगभर घेतल्या गेलेल्या बहुतेक सर्वच सर्वेक्षणांमध्ये जगभरातल्या समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी या दोन सिनेमांना १०० सार्वकालिक उत्कृष्ट सिनेमांच्या यादीत आदराचं स्थान दिलं आहे. एकीकडे प्यासा, कागज के फूल, साहिब बीबी और गुलाम यांसारखे आशयघन, तरल, संवेदनशील सिनेमे बनवणाऱ्या गुरुदत्तने प्रेक्षकांची नाडी अचूक ओळखून बाझी, जाल, आरपार, मिस्टर अँड मिसेस ५५, सीआयडी, चौदहवी का चांद यांसारखे संगीतप्रधान आणि निखळ मनोरंजन करणारे सिनेमेही दिले आणि त्याचबरोबर ट्वेल्व्ह ओ क्लॉक, भरोसा, बहुरानी, सुहागन, सांज और सवेरा यांसारख्या इतर निर्मात्यांच्या सिनेमांत काम करून आपल्या अभिनयाची छापसुद्धा पाडली. दहा ऑक्टोबर १९६४ रोजी त्याचा मृत्यू झाला. 

(गुरुदत्तच्या ‘प्यासा’ सिनेमाबद्दलचा विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. त्याच्या ‘कागज के फूल’ सिनेमातील ‘वक्त ने किया क्या हसीं सितम’ या गीताबद्दलचा विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
......   

संजीवकुमार 

नऊ जुलै १९३८ रोजी सुरतमध्ये जन्मलेला हरिहर जेठालाल जरीवाला ऊर्फ संजीवकुमार हा हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अत्यंत दर्जेदार अभिनयासाठी नावाजल्या गेलेल्या मोजक्या बिनीच्या कलावंतांपैकी एक! इप्टा आणि आयएनटी यांसारख्या ठिकाणी ‘थिएटर’ करून आल्यामुळे त्याने नेहमीच भूमिकेच्या लांबीला महत्त्व न देता खोलीला महत्त्व दिलं आणि साचेबद्ध हिरोच्या भूमिका न करता अभिनयाचा कस लागणाऱ्या एकाहून एक भूमिका स्वीकारल्या आणि अजरामर केल्या. चित्रपट गंभीर असो वा विनोदी, हाणामारीचा असो वा अत्यंत संवेदनशील, त्याच्या अभिनयाने त्या चित्रपटाला एक वेगळंच परिणाम लाभून जायचं. १९६० सालापासून पुढची सातेक वर्षं काही देमार आणि सुमार चित्रपट करून झाल्यावर त्याला संघर्ष, आशीर्वाद, अनोखी रात, सत्यकाम यांसारख्या चित्रपटांत भूमिका मिळत गेल्या आणि त्याच्यातला अभिनेता लोकांना जाणवला. मग १९७० साली त्याचा  ‘खिलौना’ आला आणि त्यातला वेडा लोकांना भावला. त्याच वर्षीच्या ‘दस्तक’मुळे त्याला अभिनयाचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढच्याच दोन वर्षांत त्याने एकीकडे ‘अनुभव’सारखा गंभीर सिनेमा करत असताना ‘सीता और गीता’सारखा धमाल मनोरंजक सिनेमा केला आणि त्यानंतर आलेला ‘कोशिश’ त्याला अभिनयाचा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गेला. नऊ वेळा फिल्मफेअरचं नॉमिनेशन मिळून त्यांपैकी तीन वेळा हा मानाचा पुरस्कार आंधी, शिकार आणि अर्जुन पंडित या सिनेमांसाठी मिळाला. इतरही छोटेमोठे १३ पुरस्कार त्याला मिळाले. गुलझार (कोशिश, परिचय, मौसम, आंधी, नमकीन, अंगूर) यांनी त्याच्यामधला अभिनेता हेरून त्याला नेहमीच न्याय दिला. सहा नोव्हेंबर १९८५ रोजी वयाच्या अवघ्या ४७व्या वर्षी हृदयक्रिया बंद पडल्याने त्याचा मृत्यू झाला. अन्यथा त्याने आणखीही कितीतरी भूमिका अजरामर केल्या असत्या. 
.......

टॉम हँक्स

नऊ जुलै १९५६ रोजी कॅलिफोर्नियामध्ये जन्मलेला टॉम हँक्स हा उत्कृष्ट अभिनयासाठी नावाजला गेलेला अभिनेता! गोल्डन ग्लोब आणि ऑस्कर पुरस्कार लागोपाठ सलग दोन वेळा मिळवणाऱ्या टॉम हँक्सने कारकिर्दीत अनेक आव्हानात्मक भूमिका स्वीकारून त्यांना पूर्णपणे न्याय दिला. त्याने सुरुवातीच्या काळात डॅरील हॅनाबरोबर ‘स्प्लॅश’ आणि मेग रायनबरोबर ‘यू हॅव गॉट मेल’ आणि ‘स्लीपलेस इन सिअॅटल’ यांसारख्या रोमँटिक फिल्म्स गाजवल्या होत्या; पण फिलाडेल्फिया, फोरेस्ट गम्प, कास्ट अवे, टर्मिनल, सेव्हिंग प्रायव्हेट रायन, दी पोस्ट यांसारख्या सिनेमांतील भूमिकांमुळे त्याच्यामधला सशक्त अभिनेता खऱ्या अर्थाने जगासमोर आला. बाफ्टा अवर्स, केनेडी सेंटर ऑनर, प्रेसिडेन्श्यल मेडल आणि फ्रेंच लिजन ऑफ ऑनर यांसारखे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केला गेला आहे. 
..........

‘इंग्लिश रोमँटिक कादंबऱ्यांची सम्राज्ञी’ बार्बारा कार्टलँड हिचाही आज जन्मदिन. तिच्याबद्दल सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search