Next
श्वसनाच्या आजारासाठी रुग्णावर तब्बल ५५ शस्त्रक्रिया
प्रेस रिलीज
Friday, June 14, 2019 | 05:31 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : पुणे येथील एका २४ वर्षीय रुग्णाला लहानपणापासून रिकरंट रेस्पिरेटरी पॅपिलोमेटोसिस (आरआरपी) या श्वसनाच्या आजाराने ग्रासले असून, त्यामुळे त्याला श्वास घेणे आणि बोलणे जिकरीचे झाले होते. या रुग्णावर आतापर्यंत ५४ शस्त्रक्रिया झाल्या असून, ५५वी यशस्वी शस्त्रक्रिया कोहिनूर हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. अमोल भवरी असे या रुग्णाचे नाव आहे. 

‘आरआरपी’ हा एक दुर्मीळ आजार असून, या आजारात श्वासनलिकेत चामखीळासारखा (पॅपिलोमास) प्रकार उगवतो. हे काढून घेण्यासाठी अमोलला दर चार महिन्यांनी शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागत होती. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून तो या समस्येशी लढा देत होता. अमोलची प्रकृती आता सामान्य आहे असून, तो आता व्यवस्थित बोलू आणि श्वास घेऊ शकतो.

अमोलची तपासणी केल्यानंतर लक्षात आले की, त्याला दुर्मीळ प्रकारचा श्वासनलिकेचा विकार झाला आहे. यात श्वासनलिकेत चामखीळासारख्या प्रकाराची वाढ होते. यांना पॅपिलोमास असे म्हणतात. ते अघातक ट्युमर असतात. त्यांची सुरुवात नाक आणि तोंडापासून होते आणि ते फुफ्फुसापर्यंत असतात. हे ट्युमर श्वासनलिकेत कुठेही होऊ शकतात, पण सामान्यपणे त्यांची वाढ स्वरयंत्रात होते. याला लॅरिन्गिअल पॅपिलोमेटॉसिस म्हणतात. पॅपिलोमास वेगवेगळ्या आकाराचे असतात आणि ते पटकन वाढतात. ते काढल्यावर त्यांची वाढ पुन्हा होते. ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही, हवेवाटे होणारा संसर्ग, मातेला जेनिटल पॅपिलोमा असेल, धुळ श्वासावाटे नाकात जाणे या कारणांमुळे हा आजार होतो.

अमोलचा आवाज घोगरा होता, श्वास घेणे व बोलणे कठीण जात होते आणि त्याला खोकलाही झाला होता. श्वासनलिकेतील पॅपिलोमा काढून टाकण्यासाठी त्याला दर चार महिन्यांनी पुण्यात शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागत होती. त्याला व्यवस्थित श्वास घेता यावा यासाठी त्याच्यावर ट्रॅकेओस्टॉमी (शस्त्रक्रिया करून हे छिद्र मानेच्या पुढील भागातून श्वासनलिकेमध्ये तयार करण्यात येते) शस्त्रक्रिया करण्यात आली होती; पण पॅपिलोमांना दूर ठेवण्यासाठी त्याचा काहीही फायदा झाला नाही. आतापर्यंत अमोलवर मायक्रोब्राडयरच्या साह्याने ५४ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मे २०१९मध्ये त्याला कोहिनूर हॉस्पिटलमध्ये जाण्यास सुचविण्यात आले आणि सहा जून रोजी त्याच्यावर ५५ वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

या विषयी बोलताना कोहिनूर हॉस्पिटलमधील ईएनटी विशेषज्ञ आणि विभाग प्रमुख डॉ. संजय हेलाले म्हणाले, ‘त्याच्यात दमेकऱ्यासारखी लक्षणे दिसत होती आणि सुरुवातील त्याला दमा असल्याचे चुकीचे निदान करण्यात आले. ‘आरआरपी’ हा दुर्मिळ आजार असून, पाच हजार व्यक्तींमध्ये एकाला हा आजार होतो. ‘कोहिनूर’मध्ये अमोलवर एंडोस्कोपी करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर कॉब्लेशनच्या (ही एक नवी पद्धत असून, यात सर्जन एका विद्युतभारीत हँडपीसचा वापर करून कमी तापमानावर ऊती जाळतो) आणि लेझर थेरपीच्या साह्याने उपचार करण्यात आले. ही शस्त्रक्रिया अॅप्नोइया तंत्राचा वापर करून करण्यात आली.’

‘हे तंत्र म्हणजे अल्टरनेट इन्ट्युबेशन आणि एक्सट्युबेशन, आणि त्या दरम्यान करण्यात येणारी शस्त्रक्रिया. त्याचप्रमाणे सिडोफोव्हिर हे औषध इंजेक्ट करण्यात आले. पॅपिलोमास पुन्हा उगवू नयेत यासाठी अँटिव्हायरल एजंट म्हणून हे औषध काम करते. रुग्णाला आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याला मोठ्याने बोलण्यास मनाई करण्यात आली आहे आणि विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे. त्याच्यावर वेळेवर उपचार झाले नसते, तर त्याचा गुदमरून मृत्यूही झाला असता,’ असे डॉ. हेलाले यांनी सांगितले.

‘अशा रुग्णांसाठी मदत गट असणे आवश्यक आहे. कारण ते शारीरिक ताणाप्रमाणेच आर्थिक ताणालाही सामोरे जात असतात. ईएनटी सर्जन्सनी असा रुग्णांना साह्य करावे आणि हा आजार हाताळण्यासाठी मदत करावी, असे मी आवाहन करतो. त्याचप्रमाणे रुग्णांनीही सुसज्ज हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करून घेण्याची काळजी घ्यावी. कारण अनेक प्रकरणांमध्ये श्वासनलिकेचा आकार बदलतो आणि मानेमध्ये कायमचे छित्र होऊन बसते,’ अशी माहिती डॉ. हेलालले यांनी दिली.

रुग्ण अमोल भवरी म्हणाले, ‘मला वयाच्या तिसऱ्या वर्षी ‘आरआरपी’ असल्याचे निदान झाले आणि माझी अवस्था दयनीय झाली. परिणामकारकपणे संवाद साधणे हे अत्यंत महत्त्वाचे जीवनकौशल्य आहे; पण मला बोलता आणि श्वास घेता येत नव्हते. शाळेत, कॉलेजमध्ये आणि माझ्या आजुबाजूला असलेला प्रत्येक जण मला काय झाले आहे, ते विचारत असे. मी नीट का बोलू शकत नाही, हा प्रश्न त्यांना पडत असे. माझ्याकडे या प्रश्नाचे काहीच उत्तर नव्हते. या आजारामुळे माझे शारीरिक, मानसिक आणि भावनिक खच्चीकरण झाले होते. मला सतत खोकला येत असे. त्यामुळे माझे आवडते आइस्क्रीमही मी खाऊ शकत नव्हतो. कोहिनूर हॉस्पिटलमध्ये माझ्यावरील ५५वी शस्त्रक्रिया झाली. आता मला खूप बरे वाटत आहे आणि मला सुरळीत संवाद साधण्यास हॉस्पिटलने केलेल्या मदतीबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि पॅपिलोमास पुन्हा उगवणार नाहीत, अशी मी आशा करतो.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search