Next
रिलायन्स आता व्हिडिओ स्ट्रीमिंगच्या क्षेत्रात येण्याच्या तयारीत
BOI
Friday, January 25, 2019 | 06:44 PM
15 0 0
Share this story

मुंबई : मोफत डेटा, कॉल्स देत रिलायन्स जिओने मोबाईल सेवा क्षेत्रात धुमाकूळ घातला. आता व्हिडिओ स्ट्रीमिंग क्षेत्रात धमाका घडविण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज सज्ज असल्याची चर्चा आहे. गुगल, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, स्पॉटीफाय आदी व्हिडिओ कंटेंट पुरविणाऱ्या कंपन्यांच्या स्पर्धेत रिलायन्स उतरणार आहे. 

एका परदेशी मासिकातील लेखानुसार, २८ कोटी जिओ ग्राहकांचा पाया पक्का केल्यानंतर मुकेश अंबानी यांचा मोबाइल सेवा क्षेत्रानंतरचा दुसरा टप्पा अधिक महत्त्वाकांक्षी आहे. त्यांची नजर आता गुगल, नेटफ्लिक्स, फेसबुक यांच्या इंटरनेटआधारीत व्हिडिओ कंटेंट पुरवठा व्यवासायावर आहे. आता जिओद्वारे शेकडो वाहिन्यांवरील भारतीय भाषांमधील व्हिडिओ कंटेंट घरबसल्या ग्राहकांच्या मोबाइलवर उपलब्ध होईल. त्यामुळे त्याची व्याप्ती अनेकपटीने वाढेल. 

रिलायन्स जिओ इन्फोकॉमने ऑक्टोबर ते डिसेंबर २०१८ या तिमाहीत ६५ टक्के निव्वळ नफा नोंदवला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ५०४ कोटी रुपये इतका असणारा नफा आता ८३१ कोटींवर गेला आहे. ‘जिओची ही प्रगती उल्लेखनीय असून, अपेक्षेपेक्षा अधिक वेगवान आहे. जिओ हे सध्या जगातील सर्वात मोठे नेटवर्क असून, अत्यंत वेगाने वाढत आहे. प्रत्येकाला उच्च दर्जाची सेवा अत्यंत वाजवी दरात देण्याच्या आमच्या दृष्टीकोनानुसार ही प्रगती होत आहे,’ असे अंबानी यांनी म्हटले आहे. 

जिओचा प्रत्येक ग्राहक दर महिन्याला किमान १०.८ जीबी डेटा आणि ७९४ मिनिटे व्हॉइसकॉल वापरतात. व्हिडिओ बघण्याचे प्रमाण दर महिना ४६० कोटी तास असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. 

याबाबतीत नुकत्याच जागतिक पातळीवर करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, भारतात ऑनलाइन व्हिडिओ कंटेंट पाहण्याचे प्रमाण प्रत्येक व्यक्तीमागे आठवड्याला किमान आठ तास २८ मिनिटे आहे. जे आठवड्याला टीव्ही पाहण्याच्या प्रमाणापेक्षा कमी आहे. ऑनलाइन व्हिडिओ कंटेंट पाहण्याच्या जागतिक प्रमाणापेक्षाही भारतीयांचे प्रमाण अधिक आहे. 

जागतिक सरासरी आठवड्याला सहा तास ४५ मिनिटे इतकी आहे. २०१६ मधील प्रमाणपेक्षा यात तब्बल ५८ टक्के वाढ झाली आहे. भारतीय प्रेक्षक ऑनलाइन व्हिडिओ कंटेंटमध्ये चित्रपट, बातम्या, टीव्ही शोज आणि खेळ बघण्याला प्राधान्य देतात. 

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इंडियन कॉंग्रेसमध्ये बोलताना मुकेश अंबानी यांनी ‘डेटा हे नवीन इंधन आणि संपत्ती आहे’, असे म्हटले होते. ‘रिलायन्स जिओ देत असलेल्या ब्रॉडब्रँड सेवेमुळे भारत या क्षेत्रात १३५ व्या स्थानावरून आघाडीच्या तीन देशांमध्ये स्थान मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. प्रत्येक भारतीयाला पहिला टीव्ही, पहिला कॅमेरा, पहिले इंटरनेट आणि पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स दरमहा फक्त १०० रुपयांमध्ये मिळेल, तेव्हा भारत खरच बदलला असे म्हणता येईल. भारतातील प्रत्येक फोन फोर जी असेल आणि प्रत्येक ग्राहकाला फोर जी सेवा मिळेल,’असेही अंबानी यांनी म्हटले होते. 

त्याच दिशेने आता त्यांची वाटचाल सुरू असून, लवकरच व्हिडिओ स्ट्रीमिंग क्षेत्रात क्रांती घडण्याचे संकेत मिळत आहेत. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link