Next
चित्रे, कॅलिग्राफी आणि लेखांतून बिनचेहऱ्याच्या माणसांची भेट...
BOI
Wednesday, May 02, 2018 | 01:00 PM
15 0 0
Share this article:

ज्येष्ठ पत्रकार आणि ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘बिनचेहऱ्याची माणसं’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या सात मे रोजी मुंबईत होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ‘लोकमत मीडिया’चे चेअरमन विजय दर्डा आणि ‘लोकमत’चे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा यांच्या उपस्थितीत हे पुस्तक, तसेच त्याचे ई-बुक आणि ऑडिओ बुक प्रकाशित होणार आहे. त्या निमित्ताने अतुल कुलकर्णी यांची ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या प्राची गावस्कर यांनी घेतलेली ही मुलाखत...
.........
अतुल कुलकर्णी
प्रश्न : ‘बिनचेहऱ्याची माणसं’ हे पुस्तक लिहिण्यामागची नेमकी कल्पना काय होती? ती कशी सुचली?
उत्तर : मी मुंबईत आलो तेव्हा हे शहर मला तसे नवीन नव्हते; मात्र या शहरात मी कधी पत्रकारिता केली नव्हती. मराठवाड्यासारख्या प्रदेशातून आल्यामुळे असेल, पण एक बुजरेपणा डोके वर काढायचा. अवतीभवती पाहिले तेव्हा लक्षात येऊ लागले की, फारशी माहिती नाही असे लोकही बिनधास्त वावरतात मग आपण का नाही...? सुरुवातीला शहर समजून घेण्यासाठी असो किंवा इथली माणसं, अनेक तास फिरायचो. फिरण्याला दिशा नसायची. सिटी बसमध्ये बसायचे. शेवटचा स्टॉप सांगायचा. तेथे उतरून दुसऱ्या बसमध्ये बसायचे. लोकल नेईल तिथे जायचे. पाहत राहायचे. माणूस अनोळखी असला, तरी त्याच्याशी गप्पा मारायच्या. यातून माणसं वाचण्याची सवय लागली. जे पाहिले ते तसे बातमीचे विषयही नव्हते; पण जे पाहत होतो, अनुभवत होतो, ते तसे रोजच्या जगण्यातले चालतेबोलते अनुभव होते. हे कुठेतरी मांडले पाहिजे, लिहिले पाहिजे, असे सतत वाटत राहायचे. त्यातून काही नोंदी करत गेलो, वेळ मिळेल तसे लिहीत गेलो. प्रत्येक चेहऱ्यामागे एक माणूस असतो आणि प्रत्येक माणसामागे एक चेहरा असतो; मात्र सतत या महानगरात वावरल्यामुळे माणसं तर दिसू लागली, पण तोपर्यंत नजर मेली की काय, असे वाटू लागले. ती भावना मला अस्वस्थ करायची. यातूनच ‘बिनचेहऱ्याची माणसं’ हे पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचली.

प्रश्न : मराठीत अनेक पुस्तके प्रकाशित होतात. या पार्श्वभूमीवर या पुस्तकाचे वेगळेपण काय सांगाल?
उत्तर : हे केवळ पुस्तक नाही, तर हा एक ‘फील’ करण्याचा, समृद्ध करणारा अनुभव आहे, असे मी म्हणेन. कारण ज्याला चित्रांची आवड आहे, त्यांनी जागतिक पातळीवर गाजलेली चित्रे काढणारे प्रख्यात चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांची चित्रे पाहावीत, ज्यांना अक्षरलेखनात आवड आहे अशांनी आपल्या महाराष्ट्राचे भूषण असणाऱ्या अच्युत पालव यांच्या अक्षरांमध्ये स्वत:ला गुंतवून घ्यावे आणि ज्यांना अनुभव वाचण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी मी काही सत्य घटना, प्रसंग आपल्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याहीपलीकडे जाऊन आम्ही आणखी एक नवीन प्रयोग केलाय. ज्यांना या घटना, प्रसंग फक्त ऐकायचे आहेत, अशांसाठी आम्ही ऑडिओ बुकही तयार केले आहे. आवाजामुळे स्वत:ची वेगळी ओळख असलेले अभिनेते प्रमोद पवार आणि अभिनेत्री अनुपमा ताकमोघे यांनी या कथा अशा काही वाचल्या आहेत, की तुम्हाला एखाद्या नाटकातील प्रसंग ऐकतोय असा भास व्हावा. एकाच पुस्तकाची अशी वेगवेगळी रूपे एकाच वेळी उपलब्ध होणार आहेत.

प्रश्न : यातील सगळी पात्रे खरी आहेत?
उत्तर : हो. चेहरे नसलेल्या माणसांचे शब्दचित्र मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. यातील सगळी पात्रे खरी आहेत. घडलेल्या सगळ्या घटना खऱ्या आहेत. आपल्याकडे नावे कळली, की लोक त्यांना जात, धर्म यांच्या चष्म्यातून पहातात. तसे होऊ नये आणि या सार्वत्रिक अनुभवाला व्यक्तिगत स्वरूप येऊ नये म्हणून त्यांची नावे टाकलेली नाहीत; मात्र यातील अनुभव कोणाच्याही बाबतीत खरे होतील असे आहेत. 

प्रश्न : या बिनचेहऱ्याच्या माणसांच्या माध्यमातून तुम्ही काय सांगू इच्छिता?
उत्तर : आज सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांच्या रोजच्या जगण्याचे प्रश्न अत्यंत बिकट बनलेले असताना आजही लोकांना कधी धर्माच्या, कधी जातीच्या, तर कधी अन्य विषयांकडे जाणीवपूर्वक वळवले जाते; मात्र या सगळ्यांच्या पलीकडे माणूस म्हणून असणाऱ्या भावना, जाणिवा यांचा आम्ही विचारच करेनासे झालो आहोत. साधे साधे प्रश्नदेखील अनेकदा लोकांना किती तीव्रतेने भेडसावत असतात. जन्म देणाऱ्या आई-वडिलांप्रति आपले काही उत्तरदायित्व आहे की नाही इथपासून ते रोजच्या जगण्यात येणारी भावभावनांची वादळे आम्ही कशी झेलतो, कशी हाताळतो यावर या पुस्तकाच्या निमित्ताने विचार व्हावा, असे मला आवर्जून वाटत आहे...

प्रश्न : या पुस्तकात आणखी काय वेगळ्या गोष्टी आहेत?
उत्तर : या पुस्तकाला प्रख्यात व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी प्रस्तावना दिली आहे. मोजक्या शब्दात त्यांनी चांगली मतं मांडली आहेत. अनिल किणीकर यांनी सिद्धहस्त लेखणीतून चित्र आणि लेख याविषयी मांडलेली मते हा वाचनाचा एक वेगळा अनुभव ठरावा. शिवाय आनंद अवधानी आणि ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर यांनी या पुस्तकासाठी वेगळे काही लिखाण केले आहे.

प्रश्न : या पुस्तकामुळे मिळालेल्या समाधानाबद्दल, तसेच हे अनुभव पुस्तकरूपात येईपर्यंतच्या प्रवासाबद्दल काय सांगाल?
उत्तर : समाधान हे आपल्या मानण्यावर असते; पण एवढे नक्की, की या पुस्तकाच्या निमित्ताने मला वेगळे प्रयोग करता आले. माझे मित्र आनंद अवधानी यांच्यामुळे ‘बुकगंगा’चे मंदार जोगळेकर आणि गौरी बापट यांच्याशी माझी ओळख झाली. त्यांनी या पुस्तकासाठी खूप मनापासून सहकार्य केले. यामुळे एक वेगळा प्रयोग आपल्यापुढे ठेवताना मला समाधान वाटत आहे. लेख, चित्रे आणि कॅलिग्राफी यांचे एकत्रित पुस्तक हा प्रयोग लोकांना किती आवडेल माहिती नाही; पण आम्ही तिघांनी खूप प्रेमाने हा प्रवास पूर्ण केलाय, एवढे नक्की.(‘बुकगंगा’ आणि स्पंदन प्रकाशनातर्फे प्रकाशित होणार असलेले हे पुस्तक प्रकाशनपूर्व सवलतीत मिळवण्यासाठी http://www.bookganga.com/R/7SFUG येथे क्लिक करा.)

(अतुल कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘बिनचेहऱ्याची माणसं’ या पुस्तकाची माहिती देणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.) 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Atul Kulkarni About
प्राची, थॅक्स, चांगली मुलाखत घेतल्याबद्दल. तुम्ही सगळे कार्यक्रमाला याल ही अपेक्षा करतो आणि विनंतीही... अतुल कुलकर्णी
2
0

Select Language
Share Link
 
Search