Next
‘विचारधारा आणि समाजसंघटन यांच्यातील दुवा ठरणारे साहित्य संमेलन’
दैनंदिन लेखन कला व्यासंग जोपासणाऱ्या कवी-कवयित्रींच्या स्नेहसंमेलनात डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन
BOI
Wednesday, June 05, 2019 | 05:21 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘साहित्यविश्वात होणाऱ्या बदलांमध्ये साहित्यिक व्यासंग जोपासणाऱ्या कार्यप्रवण समूहाचे एकत्रीकरण करून साहित्य संमेलन घेणे अत्यंत गरजेचे आहे. विचारधारा आणि समाजसंघटन यांच्यातील दुवा ठरणारे साहित्य अशा संमेलनातून पुढे यायला हवे’, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. 

आपला दैनंदिन लेखन कला व्यासंग जपत ‘काव्यस्पंदन’ या व्हॉट्सअॅप समूहाच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या कवी-कवयित्रींचे पारिवारीक एकदिवसीय स्नेहसंमेलन पुण्यात नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या वेळी सबनीस बोलत होते. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली रंगलेले हे संमेलन अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार ठरले. 

येथील पुणे-सोलापूर रस्त्यावरील मधूबन मंगल कार्यालय याठिकाणी महाराष्ट्रातील ३०० प्रतिनिधींच्या उपस्थितीत हे संमेलन पार पडले. ‘पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदे’च्या कोषाध्यक्ष व संस्कृती प्रकाशनाच्या सर्वेसर्वा सुनिता राजे पवार यांनी ऑनलाईन साहित्यिक उपक्रम म्हणून या साहित्य संमेलनाचे महत्त्व विषद केले. 
‘सोशल मिडियाचा वापर करून लेखक आणि रसिकांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे’, असे प्रतिपादन सुनिता राजे पवार यांनी केले. पुढे त्या म्हणाल्या, ‘अनेक साहित्य प्रवाहातून प्रवाहित राहणारी साहित्य सरिता रसिकांना नवचैतन्य देणारी अक्षरधन संजीवनी आहे. अनेक साहित्यिकांची साहित्य निर्मिती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची व नवनवीन साहित्य निर्मिती करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.’  

‘या साहित्य संमेलनाचे स्वरूप पारिवारिक असले, तरी राज्यभरातील साहित्यिकांनी ‘वॉट्सअॅप’च्या माध्यमातून दिलेले वैचारिक योगदान आज या संमेलनात प्रकाशित झाले आहे. १११ कवींच्या २२२ रचनांचा प्रातिनिधिक कविता संग्रह, विविध क्षेत्रांतील ५४ कार्यप्रवण व्यक्तिमत्त्वांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करणे, हे सगळे प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे’, असे मत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.   

भारतीय संविधान ग्रंथाचा ग्रंथदिंडीत समावेश
पारंपरिक पद्धतीने छत्रचामर, अब्दागिरी, नऊवारी साडी नेसून सालंकृत पेहरावातील महिला, पारंपरिक पोशाखात सहभागी झालेले साहित्यिक, भगवद्गगीता, दासबोध, शब्दकोष, कुराण  आणि सर्वांत महत्त्वाचे भारतीय संविधान हे ग्रंथ विराजमान झालेली भव्य ग्रंथदिंडी, या संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरली.  ग्रंथदिंडीत संविधान ठेवून समतेचा क्रांतिकारी विचार ‘काव्यस्पंदन’ने समाजाला दिला. संविधान ग्रंथदिंडीची मूळ संकल्पना विक्रम शिंदे, सुजित कदम व अजित माने यांच्या शिस्तबद्ध संयोजनातून साकार झाली.

संमेलनप्रसंगी घेण्यात आलेल्या ‘राज्यव्यापी काव्य सादरीकरण स्पर्धे’मध्ये प्रवीण पवार व ऋचा कर्वे (प्रथम), विजया देव व शिवाजी उराडे (द्वितीय), सुचिता कुलकर्णी व युवराज जगताप (तृतीय), तसेच शिवाजी गायकवाड, शिल्पा ढोक, निशिकांत गुमास्ते आणि विनायक अनिखिंडी यांनी पारितोषिके मिळवली. यासाठी कविता क्षीरसागर, सुजित कदम, संगीता माने यांनी परीक्षकांची भूमिका बजावली, तर मंजिरी सरदेशमुख आणि विक्रम मालन आप्पासो शिंदे यांनी सुत्रसंचालन केले. 

११ पुस्तकांचे प्रकाशन 
संगीतकार चिन्मय वाघ यांनी या वेळी सभासद कवींच्या गेय रचनांचा संगीतमय अविष्कार सादर केला. डॉ. रवींद्र वेदपाठक यांच्या सुर्यगंध प्रकाशनाच्या वतीने या वेळी अकरा पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रसिद्धीसाठी नाही, तर प्रगतीसाठी, हे  ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असणाऱ्या या समूहाची वाटचाल स्वागताध्यक्ष विजय सातपुते यांनी अत्यंत समर्पक शब्दात मांडली. ‘काव्यस्पंदन’ समूहाच्या निर्मात्या रंजना लसणे यांनीही या वेळी आपले मनोगत व्यक्त केले.  

याशिवाय महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘कविता : रूप, स्वरूप, प्रवास आणि  अभिजातता’ या विषयावर अभिनव परिसंवाद रंगला. आरती देवगावकर, अभिजीत थिटे, स्वप्निल पोरे, सागरराजे निंबाळकर यांनी या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन करत साहित्य रसिकांना वैचारिक मेजवानी दिली. सर्व वक्त्यांनी कवितेचा ऐतिहासिक, प्राचीन आणि वास्तववादी आढावा घेत कवितेचा प्रवास, तिचे बदलते स्वरूप यावर अभ्यासपूर्ण चर्चा केली. परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ. निशिगंधा सदामते यांनी केले. 

या वेळी अजय बिरारी, ज्ञानदा रामतीर्थकर आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रंजना लसणे, भालचंद्र दादा कऱ्हाडे, अजित माने, संगीता माने, डॉ. रवींद्र वेदपाठक, सुजित कदम, विक्रम शिंदे, किरण जोशी, अजय रामटेके, उर्मिला इंगळे, शीला अंभूरे, प्रिता पाटील, किशोर टिळेकर, राजेश दिवटे, डॉ. निशिगंधा सदामते, मंजिरी सरदेशमुख, राजेश पोतदार, सायली पिपळे, प्रज्ञा कुलकर्णी,  अक्षय कोटस्थाने, सुचिता जोशी, प्रज्ञा कुलकर्णी, क्रांती पाटील, श्रद्धा मोहिते, भानुदास मारणे या काव्यस्पंदन परिवारातील सर्व सदस्यांनी सहकार्य केले.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search