Next
इंडेक्स ईटीएफ
BOI
Saturday, June 30, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

इक्विटी, बॅलन्स्ड व डेट असे म्युच्युअल फंडाचे तीन मुख्य प्रकार असल्याचे मागील एका लेखात आपण पाहिले. आता इंडेक्स ईटीएफ म्हणजे काय याची माहिती ‘समृद्धीची वाट’ सदराच्या आजच्या भागात घेऊ या.
..............
इंडेक्स ईटीएफ हा म्युच्युअल फंडाच्या इंडेक्स फंडाचा ईटीएफ (एक्स्चेंज ट्रेडेड फंड) आहे. यासाठी आधी आपण इंडेक्स फंड म्हणजे काय हे पाहू आणि मग ईटीएफ म्हणजे काय हे समजून घेऊ. इंडेक्स फंड ही म्युच्युअल फंडाची एक स्कीम असून, यात केवळ निवडलेल्या इंडेक्समधील शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते आणि तीही सबंधित शेअरचे इंडेक्समध्ये जेवढे वेटेज असेल त्या प्रमाणातच केली जाते. यामुळे अशा इंडेक्स फंडचा परफॉर्मन्स साधारणपणे जो इंडेक्स निवडला असेल, त्या इंडेक्सच्या परफॉर्मन्सच्या जवळपास असतो. यामुळे संबंधित फंड मॅनेजरला गुंतवणुकीबाबत फारसे सक्रिय राहावे लागत नाही आणि मिळणारा रिटर्न इंडेक्स रिटर्न्सच्या जवळपास असतो. तसेच ट्रॅकिंग एरर अन्य इक्विटी फंडांच्या तुलेनेने कमी असते. यामुळे अशा इंडेक्स फंडाचा एक्स्पेन्स रेशो जेमतेम ०.२ टक्के इतका असतो. अन्य इक्विटी फंडांचा एक्स्पेन्स रेशो एक ते दोन टक्के इतका असतो.

उदा. यूटीआय निफ्टी इंडेक्स फंडमधील गुंतवणूक ही निफ्टीच्या ५० शेअर्समध्येच केली जाते आणि तीही सबंधित कंपनीचे निफ्टीमधील जेवढे वेटेज असेल, तेवढ्याच प्रमाणात. निफ्टी ५०मध्ये रिलायन्सचे वेटेज ७.८ टक्के, इन्फोसिसचे ५.१२ टक्के व मारुती सुझुकीचे ३.१८ टक्के इतके वेटेज असेल, तर एकूण गुंतवणुकीच्या ७.८ टक्के रिलायन्समध्ये, ५.१२ टक्के इन्फोसिसमध्ये व ३.१८टक्के मारुती सुझुकीमध्ये गुंतवणूक केली जाते. अशा रीतीने निफ्टीमधील सर्व ५० शेअर्सचे जे प्रत्येकी वेटेज असेल, त्या टक्क्यांमध्ये त्या शेअरमध्ये गुंतवणूक केली जाते. सध्या आयसीआयसीआय प्रुडेन्शियल निफ्टी-फिफ्टी, यूटीआय निफ्टी-फिफ्टी, एचडीएफसी निफ्टी-फिफ्टी व एचडीएफसी सेन्सेक्स हे प्रमुख इंडेक्स फंड गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत.

आता आपण ईटीएफ म्हणजे काय हे पाहू. यामुळे आपल्याला इंडेक्स ईटीएफ म्हणजे काय हे समजू शकेल. ईटीएफ म्हणजे एक्स्चेंज ट्रेडेड फंड. हा फंड  आपल्याला शेअर्सप्रमाणे स्टॉक एक्स्चेंजवर घेता किंवा विकता येतो. त्याची खरेदी-विक्री दिवसभर स्टॉक मार्केट चालू असेपर्यंत बाजारभावाने होत असते. याउलट साधा इंडेक्स फंड डायरेक्ट किंवा वितरकामार्फत घेता येऊ शकतो किंवा विकू शकतो. यात खरेदी-विक्रीची किंमत दिवसअखेरीच्या ‘एनएव्ही’नुसार (नेट असेट व्हॅल्यू) होत असते. इंडेक्स ईटीएफ हा स्टॉक एक्स्चेंजवर ट्रेड होत असल्याने याची खरेदी विक्री डी-मॅट खात्यामार्फत होणे बंधनकारक आहे. याउलट साध्या इंडेक्स फंडची विक्री फिजिकल किंवा डी-मॅट अशा दोन्ही पद्धतींनी करता येते. 

ज्या गुंतवणूकदारांना केवळ मार्केट रिस्कच घ्यायची आहे व त्या प्रमाणात रिटर्न अपेक्षित आहे, अशांसाठी इंडेक्स फंड हा एक चांगला पर्याय आहे. आपण इंडेक्स ईटीएफचा पर्याय निवडला, तर आपली गुंतवणूक अधिक ‘लिक्विड’ (तरल) होते. ही गुंतवणूक आपण ब्रोकरमार्फत करत असल्याने दिवसभराच्या व्यवहाराचे स्टेटमेंट आपल्याला लगेच ब्रोकरकडून दिले जाते. विशेष म्हणजे आपण एक युनिटसुद्धा घेऊ अथवा विकू शकतो. इंडेक्स फंडमध्ये अशी सुविधा नाही. दोन्हीही ठिकाणी युनिटची फेस व्हॅल्यू (दर्शनी किंमत ) १० रुपये असून, प्रत्यक्ष खरेदी-विक्रीची किंमत इंडेक्स फंडमध्ये दिवसअखेरीच्या युनिटच्या ‘एनएव्ही’नुसार, तर इंडेक्स ईएटीएफमध्ये युनिटच्या वेळोवेळी बदलणाऱ्या बाजारभावानुसार होत असते. 

याचप्रमाणे आपल्याला सोन्यामध्ये गुंतवणूक करावयाची असेल, तर आपण गोल्ड म्युच्युअल फंडामार्फत करू शकता किंवा गोल्ड ईटीएफमार्फतही करू शकता. यात एक ग्रॅम म्हणजे एक युनिट असते व सोन्याच्या बाजारातील किमतीनुसार युनिटची किंमत कमी-अधिक होत असते.

- सुधाकर कुलकर्णी
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dilip S Borkar About 238 Days ago
Thanks for good knowledge
0
0

Select Language
Share Link