Next
‘एआरएआय’ आणि ‘एनसीएल’मध्ये सामंजस्य करार
प्रेस रिलीज
Friday, August 03, 2018 | 04:14 PM
15 0 0
Share this article:

ई–मोबिलिटी क्षेत्रातील बॅटरी विकास आणि संशोधनासाठी एआरएआय आणि एनसीएल यांच्यात सामंजस्य करारावेळी (डावीकडून) एआरएआयचे एम. आर. सराफ, रश्मी उर्ध्वरेषे आणि एनसीएलचे प्रा. अश्विनी कुमार नांगिया.

पुणे : इलेक्ट्रिक मोबिलिटी असलेल्या वाहनांची संख्या वाढविणे ही आज काळाची गरज आहे. भविष्यात या इलेक्ट्रिक गाड्यांमधील बॅटरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असणार आहे. त्यामुळे वाहन उद्योगासाठी लागणाऱ्या योग्य बॅटरी विकसित करत त्याचे एकत्रित संशोधन गतिमान करण्याच्या उद्देशाने दी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) यांमध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.

‘एआरएआय’च्या संचालिका रश्मी उर्ध्वरेषे आणि ‘एनसीएल’चे संचालक प्रा. अश्विनी कुमार नांगिया यांनी ‘एआरएआय’मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी ‘एआरएआय’चे वरिष्ठ उपसंचालक व टेक्नोलॉजी ग्रुपचे प्रमुख एम. आर. सराफ, ‘एनसीएल’च्या वरिष्ठ संशोधक डॉ. मंजुषा शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी त्यांनी उपस्थितांना आपापल्या संस्थाबद्दल माहिती देत सादरीकरण केले.   

या प्रसंगी बोलताना उर्ध्वरेषे म्हणाल्या, ‘इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या जास्त क्षमतेच्या, कार्यक्षम, आकारमानाने कमी आणि वजनाने हलक्या असलेल्या बॅटरी विकसित करण्यासाठी त्यावर होत असलेल्या संशोधनाला गतिमान करण्याची गरज आहे. हेच लक्षात घेत ‘एआरएआय’ आणि ‘एनसीएल’ या दोन संस्थांनी एकत्र येऊन काम करण्याचे ठरविले. ज्यामध्ये मूलभूत सामग्री संशोधन (फंडामेंटल मटेरियल रिसर्च) क्षेत्रात असलेली एनसीएलची ताकद तर एआरएआयला असलेले वाहन उद्योगाशी संबंधित तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि या विषयीचा असलेला प्रदीर्घ अनुभव यांचा मेळ घातल्यास हे सहज शक्य होईल, असा आमचा विश्वास आहे.’

‘हा सामंजस्य करार करत असताना सुरुवातीला ऑटोमोटिव्ह अॅप्लिकेशन्ससाठी रासायनिक व बॅटरी इंजिनीअरिंगवर अधिक भर देण्यात येईल; मात्र असे असले, तरी भविष्यात ‘एआरएआय’ आणि ‘एनसीएल’साठी वेगवेगळ्या क्षेत्रात एकत्र काम करण्याची ही खूप मोठी संधी आहे. सध्या शास्त्रज्ञांसमोर वर नमूद केलेल्या भारतीय बनावटीच्या बॅटरीज बनविणे हे मोठे आव्हान आहे. हीच गोष्ट लक्षात घेत ‘एआरएआय’ने ‘एनसीएल’सारख्या संस्थेबरोबर सामंजस्य करार करत या देशाअंतर्गत संशोधन आणि विकासाला गती देण्याचे काम हाती घेतले आहे,’ असे उर्ध्वरेषे यांनी नमूद केले.

‘या आधी अंतराळात वापरलेल्या बॅटरीचा वापर ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये करत ‘एआरएआय’ने वाहनउद्योगात एक आश्वासक प्रयोग केला होता. जानेवारी २०१७ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीच्या द्वैवार्षिक परिषदेत हा प्रयोग प्रदर्शित देखील करण्यात आला होता. हा प्रयोग करत असताना ‘एआरएआय’ने ‘इस्त्रो’बरोबर करार करत या संशोधनाला मूर्त स्वरूप दिले असून, हे संशोधन आता वापरात आणण्यासाठी तयार आहे.  त्यानंतर आता ‘एनसीएल’बरोबर झालेला हा सामंजस्य करार हे दुसरे महत्त्वाचे पाउल असल्याचे आम्हाला वाटते. ‘एआरएआय’ आणि ‘एनसीएल’ची ही सहभागीदारी ई- गतिशीलतेमध्ये (ई–मोबिलिटीमध्ये) योग्य संशोधन आणि विकास होण्याच्या प्रक्रियेला गती देईल,’ असा विश्वास र्ध्वरेषे यांनी यावेळी व्यक्त केला.

‘आज आपण वाहन उद्योगाला आवश्यक तंत्रज्ञान देशातच उपलब्ध करून देऊ शकलो नाही, तर जागतिक स्तरावरील इतर संस्थांनी दिलेले पर्याय आपल्याकडील संस्था अवलंबतील. हे होत असताना आपल्यासाठी कोणीही थांबणार नाही हे लक्षात घ्यायला हवे. याबरोबरच नीती आयोगाने इंधनाची आयात कमी व्हावी या उद्देशाने जी पावले उचलण्याचे ठरविले आहे, त्या दृष्टीने भविष्यात ‘एआरएआय’ आणि ‘एनसीएल’ यांना आणखी काम करता येईल. यामध्ये प्रामुख्याने बॅटरीचा पुनर्वापर, इलेक्ट्रिक मोबिलिटीमधील वाढ, कॅटेलिस्ट डेव्हलपमेंट आदी क्षेत्रांचा समावेश असेल,’ असे प्रा. नांगिया यांनी या वेळी नमूद केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search