Next
रत्नागिरीतील संकल्प कला मंचातर्फे गुणवंतांचा गौरव
उपक्रमाचे यंदाचे तेविसावे वर्ष
BOI
Saturday, July 28, 2018 | 03:31 PM
15 0 0
Share this article:

संकल्प कला मंचातर्फे गौरविण्यात आलेले गुणवंत

रत्नागिरी :
‘समाजातील दुर्लक्षित गुणवंतांना शोधून काढून त्यांचा सत्कार करण्याचे व्रत आम्ही संकल्प कला मंचातर्फे गेली २२ वर्षे करत आहोत. आजपर्यंत सुमारे १६०० गुणवंतांचा सत्कार संस्थेने केला आहे. काम करणाऱ्याच्या पाठीवर योग्य वेळी थाप पडणे महत्त्वाचे असते. त्यातूनच त्यांना प्रोत्साहन मिळते आणि तेच कार्य आम्ही करत आहोत. ‘संकल्प’ने ज्यांचा सत्कार केला, ते गुणवंत पुढे आणखी प्रकाशात येण्याएवढी उत्तुंग कामगिरी करतात, असा आमचा अनुभव आहे,’ असे प्रतिपादन संकल्प कला मंचाचे अध्यक्ष विनोद वायंगणकर यांनी केले. 

गुरुपौर्णिमेच्या दिवशी (२७ जुलै २०१८) रोजी रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरातील महिला मंडळाच्या हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात रत्नागिरीतील विविध क्षेत्रांतील गुणवंत विद्यार्थी, तसेच व्यक्तींचा सत्कार संकल्प कला मंचातर्फे करण्यात आला. रत्नागिरीतील ज्येष्ठ वैद्यकतज्ज्ञ डॉ. अलिमियाँ परकार, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा आणि ज्येष्ठ पत्रकार नमिता कीर, रत्नागिरी पोलिसांच्या वाहतूक पोलिस शाखेचे निरीक्षक अनिल विभुते, ‘संकल्प कला मंचा’चे ज्येष्ठ सदस्य आणि लेखक डॉ. दिलीप पाखरे या मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

रत्नागिरीतील वैद्यकीय क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल डॉ. अलिमियाँ परकार यांना यंदाच्या संकल्प गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच, ग्रामीण पोलिस ठाण्यात असताना पोलिस ठाण्याचे रूपडे पालटवून ते अद्ययावत केल्याबद्दल आणि त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल विभुते यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. 

डॉ. परकार यांनी रत्नागिरीकरांच्या वेगळेपणाबद्दल कौतुकोद्गार काढले. ‘योग्य वेळी पाठीवर कौतुकाची थाप पडली, तर चांगल्याला प्रोत्साहन मिळते. संकल्प कलामंचाचे हे कार्य कौतुकास्पद आहे,’ असे सांगतानाच या गौरवामुळे आपण निःशब्द झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अलीकडे झालेल्या काही आंदोलनांवेळी पोलिस आणि सामान्य नागरिक यांच्यातील संघर्षाचे एकही उदाहरण रत्नागिरीत पाहायला मिळाले नसल्याचे निरीक्षण विभुते यांनी नोंदविले. 

नमिता कीर यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे खऱ्या जीवनात माणसांमध्ये दुरावा निर्माण होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. ‘स्वतःच्या पलीकडे बघायला आपण शिकले पाहिजे. आपल्या जीवनातील संघर्ष एकट्यालाच करायचा असतो. त्या वेळी गुरू आपल्याला मानसिक आधार देतात. त्यामुळे गुरू महत्त्वाचे असतात,’ असेही कीर म्हणाल्या. डॉ. दिलीप पाखरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दीपलक्ष्मी पाखरे यांनी डॉ. परकार यांच्या मानपत्राचे वाचन केले. गणेश गुळवणी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. 

यांचा गौरव झाला...
सोनम चव्हाण : क्रीडापटू, विविध खेळांत पंच म्हणून कामगिरी
रियाझ अकबर अली : कॅरममध्ये जागतिक पातळीवर कामगिरी
रिझवाना ककेरी : रत्नागिरीतील पहिली महिला फौजदार, उत्तम धावपटू
अॅड. सुधाकर भावे : कायदेविषयक मोफत सल्ला केंद्र
प्रदीप कल्लू : रिमांड होममध्ये शिक्षण. भांडवल म्हणून आठशे रुपये उधार घेऊन कष्टातून वर्कशॉपची उभारणी.
सोहेल मुकादम : अपंगांना, रुग्णांना मदत, सामाजिक कार्य
तुषार साळवी : जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना अल्प मोबदल्यात अन्न.
सुधाकर बेहेरे : ९५ वर्षांच्या आईच्या निधनानंतर देहदान.
सुनील बेंडखळे (आणि ग्रुप) : ‘कोकणचा बाज, संगमेश्वरी साज’ या नाटकाचे १००हून अधिक प्रयोग
मांडवी पर्यटन संस्था : रत्नागिरी महोत्सवाचे यशस्वी आयोजन करून स्थानिक व्यावसायिकांना प्राधान्य
साई शिवलकर (आणि ग्रुप) : नदी आणि किनारा स्वच्छतेचा उपक्रम
रत्नदुर्ग माउंटेनीअर्स : सवतकडा धबधब्यावर सहा पर्यटकांचा जीव वाचवला.
डॉ. निनाद नाफडे : नाट्यलेखन आणि नाट्यप्रयोग करून रत्नागिरी पालिकेच्या विद्युतदाहिनीसाठी निधी उभारण्याचे काम.

संकेत घाग यांना शॉर्ट फिल्मबद्दल, तर मुकेश गुप्ता यांना ग्रामविकासातील कार्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. संतोष सावंत, कल्पना लांजेकर, किशोर मोरे यांचा सामाजिक कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. तेजा मुळ्ये, दीपाली भाबल यांची अनुक्रमे ‘स्नेहझुला’ आणि ‘स्नेहप्रिया’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले. आर. ए. सरतापे, मेघना महादे, अपर्णा कुलकर्णी, स्वराली शिंदे यांचा पीएचडी मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आला. चैतन्य वैद्य सीए झाल्याबद्दल आणि संकेत देवळेकर विक्रीकर अधिकारी झाल्याबद्दल त्यांचीही संस्थेने सन्मानासाठी निवड केली. 

त्याशिवाय, संकल्प परिवारातील भक्ती पाटील, प्रीतम साळुंखे, मंजूषा जोशी, सोनम साळुंखे, सरस्वती संकेश्वरी, आसावरी आखाडे, पूजा जोशी, गणेश गुळवणी, नंदकुमार भारती, चंदू कांबळे, भूषण बागुल यांचाही आपापल्या क्षेत्रातील चांगल्या कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.  

(याच कार्यक्रमात रश्मी कशेळकर यांच्या ‘भुईरिंगण’ या पुस्तकाचा प्रकाशनसोहळाही मान्यवरांच्या हस्ते झाला. त्याचे सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘भुईरिंगण’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search