Next
झुंज प्रतिष्ठानतर्फे वृद्धाश्रमात आनंदसोहळा
दत्तात्रय पाटील
Friday, August 17, 2018 | 02:06 PM
15 0 0
Share this storyठाणे :
कुणी खेळत होते, तर कुणी गणांच्या ठेक्यावर बेभान होऊन नाचत होते, तर कुणी हे सगळे पाहून मनमुराद हसत होते. भरवलेला घास मनापासून खात होते. उपस्थितांचे कौतुक करत होते, आयुष्यात वाट्याला आलेले दु:खाचे प्रसंग विसरून गप्पा मारता मारता आनंदाचा उपभोग घेत होते. त्यामुळे चराचरामधले चैतन्य त्यांच्या गात्रागात्रात सळसळू लागले. हा आनंद सोहळा कोणाच्या वाढदिवसाच्या पार्टीत सुरू नव्हता, तर तो रंगला होता कल्याण तालुक्यातील खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमात. तेथील सर्व ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हास्याचे कारंजे फुलवले झुंज प्रतिष्ठानच्या युवकांनी. आजी-आजोबांना सगळे दु:ख विसरून हसायला, बागडायला लावून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याची ‘झुंज’च्या शिलेदारांची ही काही पहिली वेळ नव्हती. मागील तीन वर्षांपासून हे युवक स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या वृद्धाश्रमात ‘गप्पा, गोष्टी आणि बरंच काही’ या उपक्रमाचे आयोजन करतात.एरव्ही सुटी म्हटले, की पिक्चरला जाणे, हॉटेलात जाऊन पोटपूजा करून धमाल करणे हा कॉलेजकुमारांचा आवडता छंद; पण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्थापन केलेली झुंज प्रतिष्ठान ही संस्था वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना आनंद देण्यासाठी धडपडतेय. राहुल हरिभाऊ, जयेश चौधरी आणि त्यांच्या मित्रांनी स्थापन केलेल्या ह्या ग्रुपला एक दिवस वृद्धाश्रमाला भेट देण्याची कल्पना सुचली. सर्वांना ती आवडली. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येचा दिवस त्यासाठी निवडण्यात आला आणि नियोजन झाले. त्यानंतर ही ‘यंग ब्रिगेड’ तयारीनिशी दर वर्षी त्या दिवशी मातोश्री वृद्धाश्रमात पोहोचू लागली. यंदाही हा उपक्रम साजरा करण्यात आला.त्यांचा दिवस सुरू झाला तो आजी-आजोबांच्या थरथरत्या हातांना आधार देऊन. काही जणांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेल्या मुलांनीच दूर लोटलेले, तर काही जण स्वखुशीने येथे आलेले. सुरुवातीला या आजी-आजोबांच्या डोळ्यांत दु:खाची किनार होती; पण त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवूनच जायचे, असे या युवकांनी ठरवले होते. सर्वप्रथम त्यांनी सर्व ज्येष्ठांना हॉलमध्ये एकत्र केले आणि मनोरंजक खेळ सुरू केले. बादलीमध्ये चेंडू टाकणे, चिठ्ठीद्वारे चित्रपटातील डायलॉग व जुनी गाणी म्हणणे अशा स्पर्धांमध्ये तेथील वृद्धांनी उत्साहाने सहभाग घेतला. ‘झुंज’चे शिलेदार सतीश गराठे यांनी अनेक पारंपरिक व देशभक्तीपर गीते सादर करून वृद्धांना गाण्याच्या ठेक्यांवर नाचायला लावले. कमलेश रोहणे यांनी गाण्यांना ढोलकीची सुरेख साथ दिली. या ज्येष्ठांना पुन्हा तरुण होण्याचा आनंद मुलांनी दिला. त्यांना बोलते केले. एका आजोबांनी म्हातारपणात योगासनांची नव्हे, तर प्रेमासनांची जास्त गरज असल्याचे सांगितल्यावर उपस्थितांचे चेहरे भावविभोर झाले. झुंज प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘गप्पा गोष्टी आणि बरंच काही’ या आनंदसोहळ्यात जयेश शेलार, शिवाजी पाटील, पौर्णिमा शेलार, उमेश ठाकरे, साईनाथ सोनवणे, धीरज चौधरी, प्रीतेश बाईंग, प्रकाश जाधव, डॉ. दिनेश ठाकर, सतीश माके, कैलास भोईर, मैनुद्दीन मुल्ला, जयेश चौधरी सहभागी झाले होते.

(या उपक्रमाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link