Next
प्रभू सोमनाथा...
BOI
Tuesday, February 13 | 06:45 AM
15 0 0
Share this story

प्रातिनिधिक फोटो‘प्रभू सोमनाथा’ हे भक्तिगीत आणि महाशिवरात्र असं एक समीकरणच होऊन गेलंय. ‘विजयपताका श्रीरामाची’ हे गाणं ऐकल्याशिवाय गुढीपाडवा साजरा झाल्यासारखा वाटत नाही, तसंच ‘प्रभू सोमनाथा’ या गाण्याचं आहे. म्हणूनच आज, महाशिवरात्रीच्या औचित्याने ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आनंद घेऊ या ‘प्रभू सोमनाथा’ या जगदीश खेबूडकर यांच्या रचनेचा...
..........
मकर संक्रांत झाली, की रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकू समारंभाची लगबग घराघरात दिसते. हळदीकुंकू समारंभात यंदा वाण काय लुटायचं, हा दर वर्षी बायकांना पडणारा प्रश्न तुळशीबाग चुटकीसरशी सोडवते. फक्त गर्दीच्या महापुरात तन, मन, धनाने उडी टाकायची तयारी दर्शवली, की झालं! तिळगुळाची वडी तोंडात विरघळेपर्यंत लुटलेल्या वाणाबद्दल पसंती-नापसंतीचे उद्गार काढत मैत्रिणी हसतखेळत आपापल्या घरी जातात. सात वारांच्या सोनेरी रथातून आलेले सूर्यदेव रथसप्तमीला पूजले जातात. मातीच्या रंगीबेरंगी बोळक्यातून दूध उतू घालवलं जातं. जणू संसारातलं सुख दुधासारखं उतू जावं. भरभरून सुखाचा ठेवा प्राप्त व्हावा अशा भक्तिभावानं रथसप्तमी साजरी होते. अवघं आयुष्य तेजोमय व्हावं, जीवनात अंधाराचा लवलेश नसावा म्हणून सूर्यनारायणाकडून प्रकाशाचं दान मागितलं जातं. भवसागर लीलया पार करता यावा, म्हणून उदंड ऊर्जा सूर्य भगवानाच्या पूजेतून मिळवायची. अपार श्रद्धेतून सद्गुणांची पाठराखण करणारी आपली भारतीय संस्कृती! सणवार उत्साहाने, आनंदाने साजरे करण्याची आपली वृत्ती पूर्वापार अनुभवायला येतच राहते. रथसप्तमीनंतर सूर्यकिरणं अधिक तेजस्वी होतात. कडाक्याची थंडी हळूहळू कमी होते. हवेत उबदारपणा येतो. खरं म्हणजे वसंतपंचमी झाली, की हवेत लक्षणीय बदल होतो. वासंतिक वारे महाशिवरात्रीची चाहूल घेऊनच वाहू लागतात. बटमोगऱ्याच्या कळ्या टपोऱ्या होतात. सोसायटीच्या बागेत, रानावनात, अंगणात चाफा चहुअंगानी फुलून येतो. त्याचा मंदमंद सुवास महादेवाच्या पिंडीवर दरवळत राहतो. महादेवाची मंदिरं रंगरंगोटीनं सजवली जातात. महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी शिवभक्त सज्ज होतात.

महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत असताना आकाशवाणीवर भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात ‘प्रभू सोमनाथा’ हे गाणं हमखास ऐकायला मिळतंच. वर्षानुवर्षांची परंपरा आजतागायत सुरू आहे. त्या त्या उत्सवाचं औचित्य साधून श्रोत्यांना ते ते गाणं ऐकवलं, की आम्हा उद्घोषकांना जे समाधान मिळतं, ते शब्दातीत आहे. मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र आणि श्वेततपुष्प वाहून जो आनंद शिवभक्ताला मिळतो, अगदी तस्साच आनंद ‘प्रभू सोमनाथा’ हे गाणं प्रसारित केल्यावर मिळतो. आशाताईंच्या आवाजातील भक्तिरसात ओतप्रोत अशा जगदीश खेबूडकर यांच्या ओळी कानावर येतात आणि खरंच खूप धन्यता वाटते. 

मनी धन्य झाले तुझे गीत गाता
प्रभू सोमनाथा, प्रभू सोमनाथा.

हे भक्तिगीत आणि महाशिवरात्र असं एक समीकरणच होऊन गेलंय. माणिक वर्मांच्या आवाजातलं ‘विजयपताका श्रीरामाची’ हे गाणं ऐकल्याशिवाय गुढीपाडवा साजरा झाल्यासारखा वाटत नाही, तसंच ‘प्रभू सोमनाथा’ या गाण्याविषयी. ‘सतीचं वाण’ हा चित्रपट शाळेत असताना पाहिलेला; पण तो आत्ताही जसाच्या तसा आठवतोय. खोलवर संस्कार करणारे चित्रपट कधी विसरलेच जात नाहीत. या चित्रपटाच्या निमित्ताने आजीनं सती मालूबाईची कहाणी सांगितली होती आणि सोमेश्वाराच्या मंदिरातही जाण्याचा योग आला होता. ती विहीर, विहिरीत उतरण्यासाठीच्या त्या पायऱ्या आणि मालूबाईची कहाणी... कधीच विसरू शकत नाही मी. मालूबाईची भूमिका आशा काळे यांनी केली होती. सोज्वळ शालीन चेहऱ्याच्या आशाताई बालमनावर एक वेगळाच ठसा उमटवून गेल्या होत्या. चित्रकार आणि लेखक मिलिंद रथकंठीवार, गायन आणि निवेदनाचा छंद जोपासणारी आमची मैत्रीण शुभदा कुलकर्णी आणि मी, आम्ही तिघं मिळून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘शेलारखिंड’ या कादंबरीचं अभिवाचन करत असू. एका कार्यक्रमाला आशा काळे आल्या होत्या. त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग पहिल्यांदाच आला होता. त्यांना पाहिलं आणि आश्चंर्य वाटलं, की काळाच्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही दिसत नव्हत्या. फार पूर्वी चित्रपटामध्ये त्यांना पाहिलं होतं, अगदी तश्शाच त्या होत्या. दातांच्या कुंदकळ्या, छानशी जिवणी, गोरापान गोड हसरा चेहरा, कपाळावरचं टपोरं कुंकू, अगदी शाळकरी वयात मी पाहिल्या होत्या, अगदी तश्शाच. किती आपलेपणानं त्या बोलल्या! अंतरीचा जिव्हाळा त्यांच्या प्रत्येक शब्दात जाणवत होता. अभिवाचन ऐकून खूप खूष झाल्या होत्या. त्यांनी दिलेली शाबासकी कितीतरी दिवस आम्हाला सुखावत होती. ...तर अशा आशा काळे जेव्हा जेव्हा महाशिवरात्री येते तेव्हा तेव्हा हमखास आठवतात. सती मालूबाई म्हणून डोळ्यांसमोर उभ्या राहतात.

शिवभक्त मालूबाई, जिवापाड प्रेम करणारा तिचा पती आणि तिला छळणारी दुष्ट आणि खाष्ट सासू. सासूची भूमिका ललिता पवार यांनी केली होती. मला आजही आठवतंय सुपात भुईमुगाच्या शेंगा घेऊन बसलेली आणि सुनेशी कडाकडा भांडणारी ‘सतीचं वाण’मधली ती सासू ललिता पवार आणि शांत, सोशीक आणि महादेवावर पराकोटीची भक्ती असलेली मालूबाई म्हणजे आशा काळे. तिच्या पातिव्रत्याची परीक्षा घेणारी द्वाड सासू, पण सदैव तिच्या पाठीशी राहणारा तिचा पती आणि साक्षात शंभू महादेव सोमनाथ, श्री शंकर. महादेवाच्या पूजेत सर्व दु:ख, वेदना विसरून अनेक संकटांशी सामना करत मालूबाई आपलं जीवन कंठत असते. आनंदानं, भक्तिभावानं गाणं म्हणते. त्या गाण्यात जणू तिच्या आयुष्याची कहाणी जगदीश खेबूडकर यांनी आपल्या शब्दांमध्ये गुंफली आहे. प्रतिभावंत संगीतकार प्रभाकर जोग यांचं संगीत आणि आशा भोसले यांचा स्वर, यामुळे भक्तिरसात न्हाऊन निघालेलं हे गाणं केवळ अविस्मरणीय. फुलांची परडी हातात घेऊन फुलं, बिल्वदळं वेचत, देहभान विसरून गीत गाणारी मालूबाई आशा काळे यांच्या रूपात पाहतच रहावी अशी. प्रपंच आणि परमार्थाचा मेळ घालणारं काव्य जगदीश खेबूडकरांनी लिहिलं.

तिथे प्राणनाथ इथे देवराजा
दोन दैवतांची घडो नित्य पूजा
एक पाठीराखा एक सौख्यदाता
प्रभू सोमनाथा... 

प्रभू सोमनाथ मालूबाईचं कसं रक्षण करतो हे सांगणारे अनेक प्रसंग या चित्रपटात आहेत. आजही सोमेश्वतराच्या मंदिरात ती विहीर आणि त्या विहिरीच्या पायऱ्या उतरून गुन्हेगाराला गुन्हा कबूल करायला लावणाऱ्या गोष्टी सांगितल्या जातात. म्हणजे कोणी चोरी केली असेल, चोरी करणारी घरातलीच व्यक्ती असेल, तर घरातले सर्व सदस्य सोमेश्वरराच्या विहिरीवर जातात. प्रत्येक जण विहिरीच्या पायऱ्या उतरून जातो आणि पाय धुवून वर येतो. असं म्हणतात, की ज्याने चोरी केली असेल तो पाय धुवून वर यायला लागला, की साक्षात महादेव नागाच्या रूपात त्या चोरी करणाऱ्याला आडवा येतो. घाबरून तो चोर कबुली देतो. अर्थात ही दंतकथा; पण या दंतकथेमागे एक संस्कारकथा दडलीय. वाईट कृत्य करणाऱ्याला शिक्षा होतेच आणि अशा कृत्यांपासून माणसानं परावृत्त व्हावं. वाईट गोष्टीची परिणती वाईटातच होते. म्हणून नेहमी चांगलं वागावं. चोरी करू नये, खोटं बोलू नये, निष्पाप जिवांना त्रास देऊ नये. अंधश्रद्धेपेक्षा सुसंस्कारावर, सद्वर्तनावर श्रद्धा असायला हवी. सद्वर्तन, सद्विचार, सदाचार म्हणजेच परमेश्ववराचा अवतार. भक्तिभावाचा प्रचार आणि प्रसार जर समाजहितासाठी होणार असेल, तर तो आवश्यकच. चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमाद्वारे तो केला जात असे. त्यातलाच ‘सतीचं वाण’ हा चित्रपट. दुर्जनांचा नाश आणि सज्जनांचं रक्षण हाच या चित्रपटाचा प्रमुख उद्देश होता. एक पतिव्रता स्त्री, तिची महादेवावरची अपार भक्ती आणि संसार, प्रपंचातील तिची ओढ अशा त्रिवेणी संगमावर उभं राहिलं हे सुरेख गीतशिल्प.

मनी मानसी या तुझी ओढ होती
तुझे नाम ओठी तुझे रूप चित्ती
तेच भाग्य माझे मिळे आज हाता
प्रभू सोमनाथा... 

जे जे मंगल आहे, पवित्र आहे, उदात्त आहे त्याची पूजा करणारी भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीत साजरे होणारे सण-उत्सव. त्यातलाच महाशिवरात्रीसारखा धार्मिक सण, खुलभर दुधाची कहाणी सांगणारी भारतीय संस्कृती आणि परंपरा, विज्ञानाची सांगड घालत आपल्या दैनंदिन जीवनाचे नवे अर्थ लावत खऱ्या सुखाच्या वाटा दाखवणाऱ्या परंपरा जपणारी गाणी गुणगुणत महाशिवरात्री साजरी करू या. जणू प्रत्येक स्त्रीच्या मनीचं गूज कवीनं उलगडण्याचा प्रयत्न केलाय. प्रभाकर जोग यांच्या समर्थ स्वररचनेतून, आशा भोसले यांच्या गोड गळ्यातून आणि आशा काळे यांच्या सोज्वळ भूमिकेतून साकार झालेलं हे गीत आजही तितकंच टवटवीत आहे. भक्तीच्या सुगंधानं दरवळणारं, महाशिवरात्रीच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करणारं हे गीत पुन्हा पुन्हा ऐकू या.

माहेरीचे सुख सासरास आले
जीवशिव दोन्ही एकरूप झाले
किती किती गावी तुझी गोड गाथा
प्रभू सोमनाथा, प्रभू सोमनाथा... 

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत. दर मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरातले लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/HfxM58 या लिंकवर वाचता येतील.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link