Next
पत्रकार रवीशकुमार यांना मॅगसेसे पुरस्कार जाहीर
यंदाच्या पाच विजेत्यांत दोन पत्रकारांचा समावेश
BOI
Friday, August 02, 2019 | 01:46 PM
15 0 0
Share this article:

रवीशकुमारमनिला : आशियाचे नोबेल पारितोषिक समजला जाणारा रेमन मॅगसेसे पुरस्कार यंदा भारतीय पत्रकार रवीशकुमार यांना जाहीर झाला आहे. ‘आवाज नसलेल्या सामान्य जनतेचा आवाज बनल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे,’ अशा शब्दांत पुरस्कार निवड समितीने रवीशकुमार यांचा गौरव केला आहे. यंदाच्या पाच पुरस्कार विजेत्यांमध्ये रवीशकुमार यांच्यासह दोन पत्रकारांचा समावेश आहे. 

म्यानमारचे पत्रकार को स्वे विन, थायलंडच्या मानवाधिकार कार्यकर्त्या अंगखाना नीलापैजित, फिलिपिन्सचे संगीतकार रेमुंडो पंजाते कायाब्याब आणि दक्षिण कोरियात तरुणांमधील हिंसा आणि मानसिक आरोग्याच्या विषयांवर कार्यरत असलेले कार्यकर्ते किम जोंग-की यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नऊ सप्टेंबर २०१९ रोजी फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे होणार असलेल्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 

४४ वर्षांचे रवीशकुमार हे ‘एनडीटीव्ही इंडिया’ या वृत्तवाहिनीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक आहेत. ‘भारतातील सर्वांत प्रभावशाली टीव्ही पत्रकारांपैकी ते एक आहेत. रवीशकुमार यांचा प्राइम-टाइम हा कार्यक्रम सर्वसामान्य नागरिकांच्या खऱ्या आयुष्याशी, त्यांच्या दुर्लक्षित समस्यांसंदर्भात भाष्य करतो,’ असे पुरस्कार निवड समितीने म्हटले आहे. ‘तुम्ही लोकांचा आवाज बनला असाल, तरच तुम्ही पत्रकार आहात,’ अशा शब्दांत रवीशकुमार यांचा गौरव करण्यात आला आहे. 

रवीशकुमार यांच्या निवडीसंदर्भात रेमन मॅगसेसे अॅवॉर्ड फाउंडेशनच्या वेबसाइटवर असे लिहिले आहे - ‘उच्च दर्जाच्या व्यावसायिक आणि नैतिक पत्रकारितेशी असलेली त्यांची सातत्यपूर्ण बांधिलकी, सत्य, प्रामाणिकपणा आणि स्वातंत्र्य यांच्या पाठीशी उभे राहायचे त्यांचे नैतिक धैर्य, आवाज नसलेल्या सर्वसामान्य जनतेला सर्वशक्तिनिशी आणि आदरयुक्त पद्धतीने आवाज मिळवून देण्याचे त्यांचे तत्त्व, सत्तेला सत्य धीटपणाने आणि तरीही शांतपणे सांगण्याची त्यांची पद्धत यांमुळे लोकशाहीच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचे ध्येय त्यांची पत्रकारिता साध्य करते. या सगळ्याचा विचार पुरस्कारासाठी त्यांची निवड करताना करण्यात आला आहे.’

फिलिपिन्सचे तिसरे (दिवंगत) राष्ट्राध्यक्ष रेमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ १९५७पासून मॅगसेसे पुरस्कार दिले जातात. आशियातील हा सर्वोच्च सन्मान आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात ते फिलिपिन्सचे अध्यक्ष होते. मॅगसेसे यांनी निरपेक्ष, निःस्वार्थी भावनेने जनतेची सेवा केली आणि चांगले परिवर्तन घडवून आणले. त्यामुळे ते फिलिपिन्सचे लोकप्रिय नेते होते. अशाच पद्धतीने समाजसेवा करणाऱ्या आशियातील विविध क्षेत्रांतील व्यक्तींना दर वर्षी हे पुरस्कार दिले जातात. रेमन मॅगसेसे अॅवॉर्ड फाउंडेशनकडून त्यांची निवड केली जाते.

अन्य पुरस्कारविजेत्यांबद्दल : 
को स्वे विनको स्वे विन हे म्यानमारमधील ४१ वर्षांचे पत्रकार आहेत. मुस्लिम मानवाधिकार कार्यकर्त्याच्या मारेकऱ्याचे जाहीर समर्थन केल्याबद्दल त्यांनी अशिन विराथू या बौद्ध भिक्खूवर टीका केली होती आणि द्वेष पसरवून बुद्ध धर्माचा अपमान केल्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायला हवी असे मत व्यक्त केले होते. ते कार्यरत असलेले म्यानमार नाऊ हे माध्यम बालकामगारांसह अन्य विविध विषयांवर दर्जेदार, संयत आणि निष्पक्षपाती वार्तांकन करण्याबद्दल ओळखले जाते. को स्वे विन यांची नैतिक, स्वतंत्र आणि समाजाच्या प्रश्नांशी निगडित असलेली पत्रकारिता, त्यांची समन्यायी दृष्टी, अत्यंत महत्त्वाच्या, पण दुर्लक्षित राहिलेल्या विषयांचे सत्य उघड करण्याची धडपड आणि मानवाधिकार जपण्यासाठी माध्यमाच्या सत्य सांगण्याच्या क्षमतेचा उपयोग या त्यांच्या गुणांची दखल पुरस्कार निवड समितीने घेतली आहे. 

किम जोंग-कीकिम जोंग-की एका कोरिअन इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या चीनमधील विपणन विभागाची जबाबदारी पाहणारे एक यशस्वी उद्योजक होते. पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यासह त्यांचा संसार सुखाचा चालला होता. ते करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असतानाच त्यांच्या मुलाचा एका दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला. त्यानंतर किम यांनी फाउंडेशन फॉर प्रिव्हेंटिंग यूथ व्हायोलन्स (एफपीवायव्ही) म्हणजेच तरुणांमधील हिंसेला प्रतिबंध करण्यासाठी एक संस्था स्थापन केली. दक्षिण कोरियातील शाळांमध्ये होणारी हिंसा ही मोठी समस्या असून, तिचा दुष्परिणाम विद्यार्थी, त्यांचे पालक, शाळा आणि एकंदरच समाजावर होतो. या समस्येशी दोन हात करण्याकरिता किम जोंग-की यांनी ही संस्था स्थापन केली. अशा प्रकारचा संघटित प्रयत्न करणारी ही पहिलीच संस्था. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या चांगल्या कामाचा परिणाम संपूर्ण देशावर होतो आहे. 

त्यांनी स्वतःच्या दुःखाचे परिवर्तन कोरियाच्या तरुणांना हिंसेपासून वाचवण्याच्या मोहिमेत केले. परस्परांबद्दल आदरभाव, स्वतःची प्रतिष्ठा, सहनशीलता ही मूल्ये तरुणांमध्ये रुजविण्याचे कार्य ते करतात. त्यांच्या देशव्यापी कार्यामुळे देशातील सर्व  क्षेत्रे या मोहिमेत सहभागी झाली. त्यामुळे धोरणात बदल घडून आला, शिवाय सामाजिक वर्तनात बदल होऊन अहिंसक समाजाची उभारणी होण्यास हातभार लागला आहे. 

अंगखाना नीलापजितअंगखाना नीलापैजित यांनी २००६मध्ये स्वयंसेवी संघटना आणि स्वतःच्या कुटुंबाच्या मदतीने जस्टिस फॉर पीस फाउंडेशन ही संस्था स्थापन केली. मानवाधिकार आणि शांतता कार्यकर्त्यांचे जाळे या माध्यमातून उभारले गेले. मानवाधिकाराच्या  दक्षिण थायलंडमधील परिस्थितीबद्दलचे दस्तावेजीकरण या माध्यमातून झाले. त्या संदर्भात जनजागृती करण्यात, या संदर्भातील प्रकरणांवर कार्यवाही करण्याचा दबाव सरकार टाकण्यात, बळी पडलेल्यांना कायद्याचे साह्य पुरविण्यात आणि महिलांना मानवाधिकार व शांतता प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात या संस्थेने मोठे कार्य केले. 

२०१५मध्ये अंगखाना यांना थायलंडच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या आयुक्त म्हणून नेमण्यात आले. तळागाळात काम करण्याचा अनुभव असलेल्या त्या एकमेव आयुक्त होत्या. दक्षिण थायलंडमध्ये हिंसेला बळी पडलेल्या त्यांच्या पतीसह कित्येक पीडितांना न्याय मिळविण्यासाठी अतुलनीय धैर्याने त्या कार्यरत आहेत. पक्षपाती झालेल्या कायद्याच्या यंत्रणेची पुनर्रचना करण्यासाठी त्या कार्यरत आहेत. एक अत्यंत नम्र आणि सामान्य व्यक्ती मानवाधिकार उल्लंघनाविरोधात आवाज उठवून राष्ट्रीय पातळीवर प्रभाव पाडू शकते, याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. 

कायाब्याब रेमुंडो पंजातेमनिलामध्ये जन्मलेले कायाब्याब रेमुंडो पंजाते हे चार भावंडांपैकी एक. त्यांचे वडील सरकारी कर्मचारी होते, तर आई ऑपेरामधील गायक आणि संगीतशिक्षिका होती. घरची परिस्थिती तशी बेताचीच असली, तरी त्यांचे घर संगीताने भरलेले आणि भारलेले होते. १९७०च्या दशकाच्या उत्तरार्धात रेमुंडो यांनी या क्षेत्रात कार्याला सुरुवात केली. १९७८मध्ये त्यांच्या गाण्याला मेट्रो मनिला पॉप्युलर म्युझिक फेस्टिव्हलमध्ये मोठे पारितोषिक मिळाले. त्याच वर्षी दक्षिण कोरियातही त्यांचा गौरव झाला. त्यामुळे त्यांच्या कार्याचा ठसा उमटायला सुरुवात झाली. 

‘आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आपली पुढची पिढी आपल्यापेक्षा अधिक कर्तृत्ववान असली पाहिजे. त्यासाठी आपल्याला माहिती असलेली प्रत्येक गोष्ट आपण त्यांना शिकवली पाहिजे. शिकवायला, मला जे माहिती आहे ते इतरांना द्यायला आणि संगीतात रमायला मला आवडते. हे सारे करताना मी खूप आनंदी असतो,’ असे ते म्हणतात. 

त्यांच्या गीतांनी आणि संगीताने फिलिपिन्सच्या लोकप्रिय संगीताची प्रेरणा अनेक पिढ्यांना दिली. फिलिपिन्समधील संगीत क्षेत्रातील तरुण, बुद्धिमान युवकांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ते निरपेक्ष भावनेने निरंतर प्रयत्न करत आहेत. संगीतामुळे आनंद आणि अभिमान तर मिळतोच, पण विविधतेतून एकजूट करण्याची ताकदही संगीतात आहे, हे त्यांच्या उदाहरणावरून दिसते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search