Next
जे. आर. डी. टाटा
BOI
Sunday, July 29, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

भारताचे महान आणि द्रष्टे उद्योगपती जे. आर. डी टाटा यांचा २९ जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
.... 
२९ जुलै १९०४ रोजी पॅरिसमध्ये जन्मलेले जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा हे भारतात नागरी विमान सेवेचा पाया घालणारे पहिले द्रष्टे उद्योगपती, वैमानिक! उद्योगपती रतनजी दादाभॉय टाटा हे त्यांचे वडील आणि त्यांच्या आईचे नाव होते सुझान ब्रीअरे. त्या फ्रेंच होत्या. रतनजी टाटा हे टाटा उद्योगसमूहाची स्थापना करणाऱ्या सर जमशेदजी टाटा यांचे चुलत बंधू होते. ‘जेआरडी’ यांची आई ही भारतात १९२९मध्ये कार चालवणारी पहिली महिला होती. जे. आर. डी. टाटा हे देशातील पहिले परवानाधारक वैमानिक होते. टाटा उद्योगसमूहातील अनेक नव्या उद्योगांचा पाया ‘जेआरडीं’नी घातला. यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स, टायटन इंडस्ट्रीज, टाटा टी, व्होल्टास आणि देशातील पहिली विमान कंपनी एअर इंडिया यांचा समावेश आहे. फ्रान्स, लंडन, जपान आणि भारतात त्यांचे शिक्षण झाले. १९२५मध्ये त्यांनी ‘टाटा सन्स’मध्ये बिनपगारी अॅप्रेंटिस म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आणि १९३८मध्ये वयाच्या ३४व्या वर्षी ते ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष बनले होते. स्टील, रसायने, ऊर्जा, वीज, अभियांत्रिकी आणि आतिथ्यशीलता या क्षेत्रात त्यांना अधिक रस होता. त्यामुळे या क्षेत्रातील अनेक उद्योगांचा पाया त्यांनी घातला. उद्योगात मूल्य आणि तत्त्वे यांचा पाया बळकट करून त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा आदर्श जगासमोर उभा केला. टाटा म्हणजे विश्वासार्हता, हे समीकरण जनमानसात रुजवण्यात ‘जेआरडीं’चे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली टाटा समूहाने आपली उलाढाल १०० दशलक्ष अमेरिकी डॉलरवरून पाच अब्ज डॉलर्सच्या पुढे नेली. ८८व्या वर्षापर्यंत कार्यरत असलेल्या ‘जेआरडीं’च्या नेतृत्वाखाली टाटा समूहाच्या कंपन्यांची संख्या ९५ झाली होती. सर दोराबजी टाटा ट्रस्टचे ते अध्यक्ष होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली १९४१मध्ये टाटा मेमोरिअल सेंटर हे कर्करोगावर उपचार, संशोधन करणारे आशियातील पहिले रुग्णालय उभे राहिले. १९३६मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, १९४५मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि राष्ट्रीय सादरीकरण कला केंद्र या संस्थांची स्थापनाही ‘जेआरडीं’नी केली. १९४५मध्ये टाटा मोटर्सची स्थापनाही त्यांनी केली. १९३२मध्ये त्यांनी टाटा एअरलाइन्स ही स्वतःची विमान कंपनी स्थापन केली. नंतर तिचे राष्ट्रीयीकरण करून ती एअर इंडिया झाली. ‘जेआरडी’ २५ वर्षे या कंपनीचे अध्यक्ष होते. देशात सर्वोत्तम हवाई वाहतूक सेवा देण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या या योगदानाची दाखल घेऊन त्यांना मानद एअर कमोडोर पद देण्यात आले होते. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले होते. १९५५मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. देशाच्या प्रगतीतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च मानाच्या नागरी पुरस्कारानेही त्यांना सन्मानित केले होते. या महान द्रष्ट्या उद्योजकाचा १९९३मध्ये वयाच्या ८९व्या वर्षी २९ नोव्हेंबर १९९३ रोजी जीनिव्हामध्ये मृत्यू झाला. 

यांचाही आज जन्मदिन :
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (जन्म : २९ जुलै १९२२) 
निर्विष व्यंगचित्रे काढणारे शि. द. फडणीस (जन्म : २९ जुलै १९२५)
कादंबरीकार आणि नाटककार न्यूटन बूथ टार्किंग्टन (जन्म : २९ जुलै १८६९, मृत्यू :  १९ मे १९४६)  
(यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link