Next
बांधकाम कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे
प्रेस रिलीज
Thursday, May 24, 2018 | 11:21 AM
15 0 0
Share this article:पुणे :  बांधकाम साइटवर काम करणाऱ्या कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम कामगारांसाठी मोफत ४५ आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रेडाई पुणे मेट्रो, पुणे महापालिका आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होत असून, नाईकनवरे डेव्हलपर्स प्रा. लि.च्या औंध येथील लेबर कॅंपमध्ये पहिले आरोग्य तपासणी शिबिर घेऊन या उपक्रमाची सुरवात करण्यात आली.  

‘नाईकनवरे डेव्हलपर्स’चे संचालक आनंद नाईकनवरे, क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ. दिवाकर अभ्यंकर, क्रेडाई पुणे मेट्रोच्या कामगार कल्याण समितीच्या सदस्या आणि क्रेडाई पुणे मेट्रो महिला शाखेच्या निमंत्रक अर्चना बडेरा, सपना राठी, कामगार कल्याण समितीचे सदस्य पराग पाटील, समन्वयक समीर पारखी, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत, सहाय्यक आरोग्य अधिकारी व राष्ट्रीय शहर आरोग्य अभियानाच्या सहसचिव डॉ. केतकी घाटगे, लसीकरण अधिकारी डॉ. अमित शाह, महापालिकेचे समन्वयक अधिकारी विनोद जाधव, ‘नाईकनवरे डेव्हलपर्स’च्या मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख विकास जाधव यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.  

या पहिल्या आरोग्य तपासणी शिबिरात १८० बांधकाम कामगारांची तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणीबरोबरच कामगारांना धनुर्वाताचे इंजेक्शन आणि बालकांना पोलिओ लस देण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत पुढील ४४ आरोग्य शिबिरे येत्या सहा महिन्यात पालिकेच्या कार्यक्षेत्रातील बांधकामांच्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत. याअंतर्गत कामगारांची आरोग्य तपासणी, त्यांच्या मुलांना लसीकरण, राष्ट्रीय कीटकजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण, बालकांची जन्म नोंदणी आदींचा समावेश असणार आहे.

या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना कल्पना बळीवंत म्हणाल्या, ‘कामगारांना विविध बांधकामांच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या लसीकरणाचा डोस पूर्ण होत नाही, परिणामी भविष्यात त्यांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. हा प्रश्न सोडविण्यासाठी ही शिबिरे उपयुक्त ठरतील.’

‘पहिल्या शिबिरामध्ये स्त्रीरोगतज्ञ, फिजिशियन, डॉक्टर्स, परिचारिका अशा एकूण १५ लोकांच्या चमुने सहभाग घेतला. सोबत लसीकरण वाहनाचीही सोय केली होती. पावसाळ्यात बळावणाऱ्या रोगराईची शक्यता लक्षात घेतल्यास आरोग्याबाबत कामगारांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा योग्य काळ आहे’, अशी माहिती डॉ. घाटगे यांनी दिली.

डॉ. अभ्यंकर म्हणाले, ‘शहरातील बांधकाम क्षेत्र आणि कामगारांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम खूप उपयुक्त ठरेल. याशिवाय या शिबिरादरम्यान कामगारांना एखादा आजार असल्याचे निदान झाल्यास त्यांना नजिकच्या महापालिका रुग्णालयात पुढील उपचार मिळतील, अशीही सोय करण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांसाठी आरोग्य तपासणी, लसीकरण, जनजागृती कार्यक्रम, कामगारांच्या मुलांचे शिक्षण आदीसाठी कामगार कल्याण समितीतर्फे क्रेडाई पुणे मेट्रोच्या सदस्यांच्या मदतीने ‘सीएसआर’अंतर्गत उपक्रम घेण्यात येणार आहेत.’

आनंद नाईकनवरे म्हणाले, ‘देशाच्या प्रगतीत कामगारांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे त्यांचा विविध पातळ्यांवर विकास होण्याची गरज आहे. त्यातील आरोग्य विकासाचे पाऊल आज टाकले आहे. कामगारांचे वारंवार स्थलांतर, कायदेशीर बाबी, मुलांचे शिक्षण, कामाच्या ठिकाणांवरील सुरक्षितता आदी प्रश्न सोडविण्यासाठी असे अनेक उपक्रम राबवण्यासाठी आमचे योगदान राहील.’

‘कामगार कल्याण समितीतर्फे कामगारांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणे, शासनाकडून मिळणाऱ्या फायद्याचा लाभ मिळवून देण्याबरोबरच त्यांच्यासाठी कौशल्य विकास, सेफ्टी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते’, अशी माहिती अर्चना बडेरा यांनी दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search