Next
‘बोलो’... गुगल की जय बोलो!
BOI
Monday, March 11, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

शाळेतील मुलांसमवेत सुंदर पिचाई

गुगलने नव्याने सादर केलेले ‘बोलो’ अॅप प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना हिंदी आणि इंग्रजी शिकण्यास मदत करणार असून, कथा वाचण्यास प्रोत्साहन देणार आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या उपस्थितीत नुकतेच मुंबई महापालिकेच्या एका मराठी शाळेत या अॅपचे लोकार्पण झाले. त्या पार्श्वभूमीवर विशेष लेख...
............
जगातील इंटरनेटवर अधिराज्य असलेल्या एका कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई महापालिकेच्या एका शाळेत जातो. तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधतो. आपल्या कंपनीच्या एका नवीन उत्पादनाची जाहिरात करतो आणि त्याची माहिती ट्विटरवरून जगाला देतो.

ही अघटित घटना गेल्या आठवड्यात शुक्रवारी घडली. गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मुंबई महापालिकेच्या डी. एन. नगर येथील शाळेला भेट दिली. पिरामल फाउंडेशन आणि गुगलच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘बोलो अॅप’चे अनावरण करण्यात आले. या सर्वांत मुख्य गोष्ट ही, की ही शाळा मराठी माध्यमाची होती. 

गेल्या काही काळापासून भारतीय भाषेच्या वापरकर्त्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी गुगल जे नेटाने प्रयत्न करत आहे, त्यातील हा सर्वांत अलीकडचा यत्न! हे ‘बोलो अॅप’ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना हिंदी आणि इंग्रजी शिकण्यास मदत करणार आहे. आवाज ओळखण्याचे तंत्रज्ञान आणि टेक्स्ट-टू-स्पीच तंत्रज्ञानावर हे अॅप आधारित आहे आणि हे सर्वांत आधी भारतात सादर करण्यात आले आहे. ते इंटरनेटविनाही चालू शकणारे अॅप आहे. या अॅपमध्ये एक दिया नावाचे अॅनिमेटेड पात्र असून, ही मुलगी बालकांना कथा वाचण्यासाठी प्रोत्साहन देते. एखाद्या शब्दाचा उच्चार करण्यास अडचण आली, तर ही अॅनिमेटेड मुलगी मदत करते. ‘यात हिंदी आणि इंग्रजीतील सुमारे १०० कथा आहेत,’ असे ‘गुगल इंडिया’चे उत्पादन व्यवस्थापक नितिन कश्यप यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. 

गुगलने उत्तर प्रदेशातील सुमारे २०० गावांमध्ये या अॅपचे परीक्षण केले. त्या वेळी मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता. म्हणून ते सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. एकुणात गुगलचा सूर बघता मराठीत हे अॅप यायला फारसा वेळ लागणार नाही. अन् त्याला कारणही तसेच आहे. इंटरनेटच्या बाजारावर सध्या दोनच कंपन्यांची अधिसत्ता आहे - फेसबुक आणि गुगल. मॅग्ना या कंपनीच्या मते, फेसबुक आणि गुगलकडे भारतातील डिजिटल जाहिरातींच्या बाजारपेठेचा ६८ टक्के वाटा आहे, तर ग्रुपएम या कंपनीच्या अंदाजानुसार भारतात डिजिटल जाहिरातींवरील खर्च या वर्षी ३० टक्के वाढेल.

यातील फेसबुक भारतीय बाजारपेठेत कमालीचे यशस्वी ठरले आहे. फेसबुकने २०१८मध्ये भारतातून ९८ कोटी डॉलरची कमाई केली, तर गेल्याच वर्षी गुगलने एक अब्ज डॉलरचा टप्पा गाठला. भारतात जन्मलेल्या पिचाई यांच्या नेतृत्वाखालील गुगलने ही बाजारपेठ आपल्याच ताब्यात ठेवण्याचा चंग बांधला आहे. 

गुगलच्या दृष्टीने भारत हा महत्त्वाचा देश आहे. ‘गुगलच्या ‘नेक्स्ट बिलियन युजर्स’ या मोहिमेच्या दृष्टीने भारत हा सर्वांत महत्त्वाचा बाजार आहे,’ असे कंपनीचे अधिकारी सीझर सेनगुप्ता यांनी गेल्या वर्षी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले होते. कारण भारतातील हा संघर्ष गुगलला जगातील अनेक विकासशील बाजारपेठांमध्ये कामी येणार आहे. कंपनीच्या दीर्घकालीन वाढीसाठी हा अनुभव अत्यंत उपयोगी ठरणार आहे. या देशांमधील बहुसंख्य ग्राहक फेसबुक आणि त्याच्या मालकीच्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप यांच्याकडे वळत आहेत. फेसबुकने भारतीय वापरकर्त्यांसाठी फार काही विशेष सेवा दिल्या नसल्या, तरी लोकांच्या दृष्टीने ती सेवा वापरायला खूप सोपी आहे. 

कंटार आयएमआरबी या कंपनीने सादर केलेल्या अहवालानुसार, भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या पहिल्यांदाच पन्नास कोटींच्या वर गेली आहे. डिसेंबर २०१८पर्यंत भारतात ५६ कोटी ६० लाख लोक इंटरनेट वापरत होते आणि २०१९च्या शेवटपर्यंत ही संख्या ६२ कोटी ७० लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जगातील अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेत ही संख्या आणि वाढ मोठी आहे. त्यातही ग्रामीण भागात हा प्रसार जास्त प्रमाणात आहे. विशेष म्हणजे मागास म्हणून हिणविल्या जाणाऱ्या बिहारने इंटरनेट वापरात आघाडी घेतली आहे. म्हणूनच सुंदर पिचाई वारंवार भारतात येतात आणि सर्वसामान्यांपासून सत्ताधाऱ्यांपर्यंत सर्वांशी संवाद साधतात. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी न्यूयॉर्कमध्ये पिचाई यांची भेट घेतली होती. त्या वेळी या दोघांमध्ये भारतात संगणकामध्ये भारतीय भाषांचा वापर, तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत चर्चा झाली होती. भारतातील प्रत्येक ठिकाणच्या व्यक्तीसाठी इंटरनेचा वापर सोपा करणे आणि भारतीय वापरकर्त्यांना बळ देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे, याबाबत कंपनीच्या योजनांबाबत त्या वेळी चर्चा झाली होती. आणि म्हणूनच आज गुगलच्या भारतातील कार्यालयांत चार हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात. फेसबुकच्या तुलनेत हा आकडा आठपट अधिक आहे.

यापूर्वीही भारतीयांना केंद्रस्थानी ठेवून गुगलने अनेक अॅप्स तयार केली आहेत. गुगल पे (तेज) हे ऑनलाइन पेमेंट अॅप असो किंवा स्थानिक माहिती देणारे नेबर्ली अॅप असो, अशा प्रत्येक अॅपद्वारे गुगलने भारतीयांना काही तरी खास सेवा दिली आहे. केवळ भारतीय ब्लॉगरसाठी असलेले ब्लॉग कम्पास हे अॅपही तसेच. अशा विविध सेवांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचा वापर सेवांचा आणखी विस्तार करण्यासाठी होतो आणि त्यातूनच नवीन बाजारपेठ मिळविण्याचेही प्रयत्न होतात. उदाहरणच घ्यायचे झाले, तर गुगल सध्या ४००पेक्षा अधिक रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा पुरवत आहे. या वायफाय सेवांचा वापर करणाऱ्या व्यक्तींकडून मिळालेल्या माहितीचा वापर करूनच नेबर्ली अॅप तयार करण्यात आले. एरव्ही फुकटात अशी सेवा पुरवायला गुगल ही धर्मादाय संस्था थोडीच आहे?

आता या नव्या अॅपच्या माध्यमातून भारतात आपली उपस्थिती आणखी वाढविण्याचा प्रयत्न गुगल करत आहे. इंग्रजीत यालाच ‘कॅच देम यंग’ असे म्हणतात. एखाद्या व्यक्तीच्या गुणांना उमलत्या वयापासून खतपाणी घालून त्याचा आपल्या फायद्यासाठी यथावकाश वापर करणे, असा त्याचा अर्थ. लहानपणी होणारे संस्कार माणसाला आयुष्यभर पुरतात. त्यामुळे ज्या बालकाच्या हातात अगदी कोवळ्या वयात गुगलच्या कथा येतील, ते आयुष्यभर गुगलचेच कीर्तन करत राहणार, यात काय शंका?

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balkrishna Gramopadhye About 129 Days ago
Can this be used in favour of Marathi , as well?
0
0
Prajakta About 134 Days ago
आमच्यासारख्या प्राथमिक शिक्षकांसाठी ही खुपचं उत्साहवर्धक बातमी आहे.
0
0

Select Language
Share Link
 
Search