Next
खासदार बारणे लिखित ‘मी अनुभवलेली संसद’ पुस्तकाचे प्रकाशन
BOI
Saturday, January 05, 2019 | 04:28 PM
15 0 0
Share this story

खासदार श्रीरंग बारणे लिखित ‘मी अनुभवलेली संसद’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन. या वेळी अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार संजय राऊत, आनंदराव अडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते.

नवी दिल्ली : ‘खासदार श्रीरंग बारणे लिखित ‘मी अनुभवलेली संसद’ या पुस्तकात संसदीय कामकाजाचा लेखाजोखा मांडला आहे’, असा गौरव लेाकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केला. येथील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात सुमित्रा महाजन यांच्या हस्ते खासदार बारणे लिखित ‘मी अनुभवलेली संसद’ या मराठी व इंग्रजी पुस्तकाच्या आवृत्तीचे गुरुवारी प्रकाशन झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार संजय राऊत, आनंदराव अडसूळ, तेलंगणा राष्ट्रसमिती पक्षाचे नेते जितेंद्र रेड्डी, विविध राज्यातील पक्षाचे खासदार, तसेच महाराष्ट्रातील खासदार या वेळी उपस्थित होते. 

या वेळी महाजन म्हणाल्या, ‘बारणे यांचे लोकसभेतील कामकाज गौरवण्यासारखे आहे. त्यांनी सातत्याने विविध प्रश्नांद्वारे संसदीय कामकाजामध्ये भाग घेतला असून, कार्यकुशल खासदारामध्ये त्यांची गणना होते. मी या अगोदरही त्यांच्या मतदार संघामध्ये चिंचवड येथे क्रांतिवीर चाफेकरांच्या टपाल तिकिटाचे अनावरण प्रसंगी गेले असता त्यांच्या मतदार संघातील कामही जवळून पाहिले आहे. केंद्र सरकारच्या पासपोर्ट कार्यालय निर्मितीपासून दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेच्या माध्यमातून आदिवासी भागात लाईट पोहोचविण्यापर्यंत त्यांनी केलेले काम, हिंदुस्थान अँन्टीबायोटिक्स या ऐतिहासिक कारखान्याच्या अडचणीच्या काळात त्यांनी केलेली धडपड जनतेसाठी झोकून देणाऱ्या लोकप्रतिनिधीचे काम दर्शवितात.’

‘केंद्र सरकारच्या अनेक योजनांची अंमलबजावणी कशा प्रकारे एका खासदाराला करावी लागते याची मांडणी त्यांनी केली असून, सर्व सध्या लोकसभेच्या कामकाजात होत असलेला गदारोळ पाहता सामान्य जनतेमध्ये त्याविषयी नाराजी पसरते. या पुस्तकाच्या माध्यमातून इतर सदस्यांनीही बारणे यांचा चांगल्या कामाचा दाखला घ्यावा’,असे महाजन यांनी सांगितले. 

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते म्हणाले, ‘बारणे यांची काम करण्याची लोकसभेतील धडपड ही चळवळीतील तळमळीच्या कार्यकर्त्याची आहे. आज या कार्यक्रमाला असलेली लोकसभा सदस्यांची उपस्थिती हा त्यांनी संसदेत त्यांच्या स्वभावाने जमा केलेला ठेवा आहे. माझ्या एका सहकाऱ्याने संसदीय कामाकाजाच्या अनुभव असलेले पुस्तक लिहिले याचा मला सार्थ अभिमान आहे.’

खासदार संजय राऊत म्हणाले, ‘बारणे यांनी यापूर्वीही तीन पुस्तके लिहिली असून, महाराष्ट्रातील एक मराठी खासदार दिल्लीमधील कामकाजाविषयी त्याचे अनुभव पुस्तकात संग्रहित करून प्रकाशित करतो ही कदाचित पहिली घटना असावी. बारणे यांचा नम्र स्वभाव, प्रचंड लोकसंपर्क, थोड्या कालावधीत संसदेमध्ये मिळवलेला अनुभव या माध्यमातून दिल्ली येथे बारणे यांनी कार्यकुशल खासदार म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे. बारणे यांच्या पुस्तकातून लोकसभेच्या कामकाजाचा उलगडा होत असून, त्यांचे पुस्तक इतरांनी आवर्जून वाचावे असे आहे.’ 

केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनीही बारणे यांच्या या पुस्तकास शुभेच्छा दिल्या.

गेल्या साडे चार वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेल्या कामकाजाच्या पाठपुराव्याविषयी माहिती या पुस्तकात देण्यात आली असून, अनेक छायाचित्रांसहित दाखले दिले आहेत. लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे संदेश या पुस्तकात आहेत. याच बरोबर महाराष्ट्रासह इतर राज्यातील १९ खासदारांनी बारणे यांच्या कार्याचा गौरव या पुस्तकात केला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link