Next
बात बात में रुठो ना....
BOI
Sunday, March 04, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

अमिया चक्रवर्ती (Source : Veethi.com)अमिया चक्रवर्ती हे जुन्या काळातील उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट निर्माते व लेखकही. लेखन क्षेत्रातील त्यांची कारकीर्द फार मोठी नाही; पण एका लोकप्रिय व उत्तम चित्रपटासाठी काय आवश्यक असते याची त्यांना जाण होती. आणि त्यामुळेच चित्रपटातील गीते या महत्त्वाच्या भागाकडे त्यांचे बारीक लक्ष असायचेच. सहा मार्च हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या ‘सीमा’ या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील ‘बात बात में रुठो ना....’ या गीताचा...
............
सिनेमा कोणाचा असतो? कथालेखकाचा? अभिनेत्याचा? कॅमेरामनचा? संगीतकाराचा? गायक-गायिकांचा? की गीतकारांचा? खरे तर या सर्वांचाच तो असतो; पण या सर्वांबरोबरच नव्हे तर एक पायरी अधिक असा म्हणजे सिनेमा दिग्दर्शकाचा असतो. हिंदी चित्रपटसृष्टीत आवर्जून ज्या दिग्दर्शकांचे चित्रपट पहावेत अशी काही नावे आहेत आणि त्या नावांमध्ये एक नाव आहे अमिया चक्रवर्ती.

नवीन पिढीला कदाचित हे नाव ज्ञात नसेल. कारण अमिया चक्रवर्ती यांनी दिग्दर्शित केलेला अखेरचा चित्रपट ‘कठपुतली’ हा १९५७मध्ये पडद्यावर झळकला होता आणि या चित्रपटाची निर्मिती चालू असतानाच दिग्दर्शकाचे काम करत असतानाच, सहा मार्च १९५७ रोजी अमिया चक्रवर्तींचे हृदयविकारामुळे निधन झाले होते. अभिनेता ‘आगा’ हा अमिया चक्रवर्तींचा जिगरी दोस्त होता. त्यामुळे त्यांनी आगाला सांगून ठेवले होते, की कोणत्याही चित्रपटाची जबाबदारी पार पाडत असताना मला मृत्यू आला, तर तो चित्रपट पूर्ण करणे ही तुझी जबाबदारी असेल. आपल्या मित्राची ही शेवटची इच्छा आगा यांनी पूर्ण केली. त्यांनी नामवंत दिग्दर्शक नितीन बोस यांना हा चित्रपट पूर्ण करण्यास सांगितले आणि नितीन बोस यांनी एकही पैसा मानधन न घेता हा चित्रपट पूर्ण केला.

चित्रपटसृष्टीत अशी माणुसकी सांभाळणारी माणसेसुद्धा भेटतात. त्याच अमिया चक्रवर्तींच्या सहा मार्च रोजी असलेल्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कारकिर्दीवर एक धावती नजर टाकली तर काय दिसते? अभिनेत्री, निर्माती देविकाराणीच्या ‘बॉम्बे टॉकीज’मध्ये ‘कँटीन मॅनेजर’ म्हणून अमियाजींनी नोकरी स्वीकारली होती; पण अल्पावधीतच ते ‘बॉम्बे टॉकीज’चे सर्वेसर्वा हिमांशू रॉय यांचे सहायक म्हणून काम पाहू लागले आणि हिमांशू रॉय यांच्या पश्चात बॉम्बे टॉकीजचे दिग्दर्शक म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. त्यामध्ये त्यांनी ‘बसंत’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. तो तुफान चालला.

बॉम्बे टॉकीज बंद पडल्यावर त्यांनी अन्य संस्थांचे जे चित्रपट दिग्दर्शित केले त्यामध्ये ‘गर्ल्स स्कूल’, ‘बादल’ यांचा समावेश होतो. ‘अंजान’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट, तर बॉम्बे टॉकीजच्या ‘हमारी बात’ व ‘चार आँखे’ या चित्रपटांच्या कथा त्यांनी लिहिल्या होत्या. दिलीपकुमार यांची नायकाची भूमिका असलेल्या पहिल्या ‘ज्वारभाटा’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही अमियांनी केले होते.

मार्स अँड मूव्हीज ही स्वतःची संस्था स्थापन करून अमिया चक्रवर्ती यांनी ‘दाग’, ‘पतिता’, ‘बादशहा’, ‘सीमा’, ‘देख कबिरा रोया’ व ‘कठपुतली’ हे सहा अप्रतिम आणि वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट निर्माण केले. या प्रत्येक चित्रपटाचे एक वेगळे वैशिष्ट्य होते. यामध्ये ‘दाग’सारखा चित्रपट दारूबंदी-दारूचे दुष्परिणाम यांबद्दलचा होता, तर ‘पतिता’मध्ये बलात्कारित स्त्रीची कहाणी मांडली होती; पण हे चित्रपट प्रचारकी थाटाचे नव्हते. कला आणि मनोरंजन यांची योग्य सांगड त्या चित्रपटांमध्ये घातली होती. एका नटीचे दु:ख ‘कठपुतली’ चित्रपटात मांडले होते. ‘देख कबिरा रोया’ चित्रपटात जवाहर कौल, दलजित, अनुपकुमार असे फारसे प्रसिद्ध नसलेले नायक घेऊन चित्रपट छान रंगवला होता.

अमिया चक्रवर्ती अशा तऱ्हेने उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट निर्माते व लेखकही ठरतात. अर्थात लेखन क्षेत्रातील त्यांची कारकीर्द फार मोठी नाही; पण एका लोकप्रिय व उत्तम चित्रपटासाठी काय आवश्यक असते याची त्यांना जाण होती. आणि त्यामुळेच चित्रपटातील गीते या महत्त्वाच्या भागाकडे त्यांचे बारीक लक्ष असायचेच. त्यामुळे त्यांनी आपल्या चित्रपटातून जी गीते लोकांपुढे आणली ती आकर्षक चालीतील होती व आशयसंपन्नही होती. ‘देख कबिरा रोया’सारखा चित्रपट तर केवळ त्यातील एकापेक्षा एक सुंदर गाण्यांकरिता बघावा असा होता.

त्यामुळेच त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने कोणते गीत सुनहरे गीत म्हणून घ्यावे, हा प्रश्न पडला आहे. कारण त्यांच्या साऱ्याच चित्रपटातील गीते एकाहून एक सुंदर होती. सामान्यपणे हिंदी चित्रपटगीतांतून प्रेमाच्याच गोष्टी होतात असा एक समज आहे; परंतु प्रेमाव्यातिरिक्त हिंदी चित्रपटगीतांनी आपल्याला भरपूर काही सांगितले आहे. त्यातील एक भाग म्हणजे जीवन जगण्याची कला! यावर भाष्य करणाऱ्या काही सुंदर रचना हिंदी चित्रपटाच्या गीतकारांनी आपल्या काव्यातून मांडल्या आहेत. त्यापैकीच एक गीत - जीवन जगताना कशाची काळजी घ्यायची हे सांगणारी रचना - गीतकार हसरत जयपुरी यांची... संगीत शंकर जयाकिशन यांचे, तर स्वर लता मंगेशकर यांचा... १९५५च्या ‘सीमा’ चित्रपटातील हे गीत! चित्रपटाची नायिका नूतन! समाजात तिच्यावर अन्याय झालेला असतो म्हणून ती खूप चिडलेली असते. तिला मुलींच्या सुधारगृहात ठेवले जाते. तेथेही ती चिडचिड करत असते. वास्तविक तेथे तिच्याशी सगळे जण चांगले वागत असतात; पण तरीही ती सर्वांचा रागराग करत असते. तेव्हा तिला समजवण्यासाठी त्या आश्रमातीलच एक तरुणी (शुभा खोटे) एक गाणे म्हणून जीवनाची रीत तिला सांगते. हसरत जयपुरींचे हे सांगणे फक्त त्या नायिकेसाठी नाही, तर आपणा सर्वांसाठी आहे. आपण सारे पण साध्या साध्या गोष्टींवरून किती नाराज होत असतो, नाही का? म्हणून तर कवी सांगतो -

बात बात में रुठो ना, अपने आपको लुटो ना
ये रंग बदलती दुनिया है, तकदीर पे अपनी रुठो ना

हर एक गोष्टीवर नाराज होण्यात काय अर्थ आहे? प्रत्येक गोष्टीवर रुसून, राग व्यक्त करून स्वतःलाच त्रास होतो. हे असे स्वतःलाच स्वतःला लुटायचे असते का कधी? (हे कधीच विसरून उपयोगाचे नाही, की) हे जग सतत बदलत असते (ओघाने माणसेही बदलत असतात) आणि मग माझ्या नशिबी हे असे का आले म्हणून आपल्या नशिबावर रुसून काय होणार आहे?

संतापलेल्या नायिकेला ही तिची मैत्रीण तिचेच वर्णन करताना सांगते, की -  

लाज की लाली आग बनी है 
भीगी पलके, अबरुतनी है 
आँखो में सुर्खी, दिल में मुहब्बत 
होठों पे छुपी हँसी है...

(अगं चिडल्यामुळे बघ तुझा नेहमी) लाजून लाल होणारा चेहरा (आज तुझ्या या त्राग्यामुळे) आगच बनला आहे. (लज्जेची लाली क्रोधाची लाली बनली आहे.) (डोळ्यांतील अश्रूंमुळे तुझ्या) पापण्या ओल्या बनल्या आहेत व भुवया (अबरु) (रागामुळे) ताणल्या गेल्या आहेत. डोळ्यांतील गुलाबी लाली (सुर्खी) संतापामुळे लाल झाली आहे; (पण तू मुळात अशी नाहीस, तुझ्या) हृदयात प्रेम आहे आणि तुझ्या ओठांच्या मागे हास्य लपले आहे. (आहे की नाही हे खरे?) 

मैत्रिणीला आता तत्त्वज्ञानाची कडू गोळी देताना ती म्हणते - 

ढलती है राते लेकर अंधेरा 
लायी बहारे नया सवेरा   
जीवन सफर में दुख हो या सुख हो 
करना है फिर भी बसेरा......

निराशेचा-दुःखाचा अंधार ही रात्र घेऊन जाणार आहे (व आशेचा, इच्छापूर्तीचा) वसंत ऋतू उगवणारी सकाळ घेऊन येणार आहे. (अगं वेडे) जीवनाच्या या प्रवासात दुःख मिळो अगर सुख मिळो, जीवन जगावेच लागते ना? नव्हे जगायचेच असते. म्हणून प्रत्येक गोष्टीवर रुसण्यात काय अर्थ आहे? 

या जगाची रीत कशी आहे? हे सांगताना - 

फूल खुशी के हर कोई ले ले 
कोई ना देखे आँसू के मेले 
तुम जो हसों तो हस देगी दुनिया 
रोना पडेगा अकेले में......

सुखात साथ द्यायची व दुःख आले की निघून जायचे, ही या जगाची रीत सांगताना कवीने ‘फूल खुशी के,’ ‘आँसू के मेले’ या उपमा वापरल्या आहेत. आपण हसतो तेव्हा जग हसते, पण आपण रडतो तेव्हा एकट्यानेच रडायचे असते. (ओघानेच, तुमच्या दु:खाशी जगाला काही देणे-घेणे नसते, ते तुमचे तुम्हीच सहन करायचे असते, हे ते सांगतात...) 

हसरतच्या या काव्यास साजेशी चाल व संगीत देऊन शंकर जयकिशन यांनी हे गीत मधुर बनवले आहे. लतादीदींचा स्वर अप्रतिमच! चिडलेली नूतन-अभिनयाची जाणकार; पण पहिलाच चित्रपट असूनही शुभा खोटे, गीतातील ओळींच्या अर्थाच्या अनुषंगाने चेहऱ्यावरचे जे भाव दर्शवतात ते अप्रतिम! शुभ खोटे काय, सी. एस. दुबे काय अगर  आगा काय! अशा दुय्यम अभिनेत्यांकडून उत्कृष्ट अभिनय करून घेण्यात अमिया चक्रवर्ती वाकबगार होते. तेच त्यांचे मोठेपण होते. त्यामधूनच अशी सुनहरी गीते तयार झाली होती.

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search