Next
एड्सबाधित चिमुकल्यांचा आधार बनलेली ‘तुळजाई’
BOI
Monday, November 06 | 03:45 PM
15 0 0
Share this story

तुळजाई प्रतिष्ठानच्या स्वआधार प्रकल्पातील मुली

‘घराला उंबरा राहो, पेटती राहू दे चूल, कुण्याही माय पदराशी खेळते राहू दे मूल’ हे ब्रीद खरे ठरवणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील काही हात आपापल्या परीने एड्सबाधित चिमुकल्यांना सांभाळण्याचे काम करत आहेत. शिवाय मानसिक विकलांग मुलींचा आधारही बनत आहेत. ‘लेणे समाजाचे’मध्ये आज पाहू या उस्मानाबाद येथील ‘तुळजाई प्रतिष्ठान’च्या कार्याबद्दल...
...........
‘एचआयव्ही एड्स’बद्दल अजूनही समाजात पुरेशी जागरूकता असल्याचे पाहायला मिळत नाही. मुळात हा उघडपणे बोलण्यासारखा विषय नाही ही मानसिकता अजूनही बहुतांश ठिकाणी आहे. त्यामुळे हा आजार आणि याबाबत असणारे गैरसमज यांच्यात वाढच होताना दिसते. त्यातही एचआयव्हीग्रस्त आई-वडिलांची एचआयव्हीबाधित मुले असतील, तर त्यांच्याकडे पाहण्याची समाजाची मानसिकता फारच वाईट असते. अशा मुलांना जन्मापासूनच समाजाच्या रोषाचा सामना करावा लागतो. पालकांच्या मृत्यूनंतर या मुलांना मोठ्या दिव्यातून जावे लागते. अशा मुलांना मायेची, वात्सल्याची गरज असते. हे लक्षात घेता आपले सामाजिक दातृत्व समजून उस्मानाबाद येथील ‘तुळजाई प्रतिष्ठान’ अशा मुलांसाठी कार्य करत आहे. 

आपल्या आजूबाजूला असलेल्या काही एड्सबाधित आणि काही मृत पालकांची एड्सबाधित मुले पाहताना, त्यांना होणारा त्रास, समाजाकडून मिळणारी हीन दर्जाची वागणूक, त्यांच्या आरोग्याची हेळसांड हे पाहत असताना या मुलांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही भावना जागृत होऊन आळणी येथील शहाजी चव्हाण यांनी २००९मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील आपल्या तुळजाई प्रतिष्ठानांतर्गत कळंब या ठिकाणी ‘एचआयव्ही’बाधित मुलांच्या संगोपनासाठी पहिले पाऊल उचलले. यातूनच ‘तुळजाई प्रतिष्ठान’ संचलित सहारा एचआयव्ही प्रकल्पाचा जन्म झाला. याशिवाय मानसिक विकलांग मुलींसाठीही संस्था कार्यरत आहे. ‘स्वआधार’ नावाचा प्रकल्प या मुलींसाठी काम करत आहे. 

सहारा प्रकल्प 
अनेकदा रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड इतकेच नाही, तर स्मशानभूमी आणि कचराकुंड्यांमध्येही अशी नवजात बालके टाकलेली सापडतात. हे थरारक असले तरी वास्तव आहे. अशा परिस्थितीत, या सापडलेल्या मुलांना आसरा देऊन त्यांना एक चांगले जीवन देण्याचे काम तुळजाई प्रतिष्ठान करत आहे. सरकारी माहितीनुसार, सद्यस्थितीत भारतात जवळपास ७० हजार आणि उस्मानाबाद जिल्ह्यात जवळपास ५०० बालके ‘एचआयव्ही’बाधित असून, ती या प्रकारे जीवन जगताना आढळली आहेत. तुळजाई प्रतिष्ठानच्या ‘सहारा’ प्रकल्पांतर्गत ‘एचआयव्ही’बाधित मुलांसाठी काम केले जाते. सध्या संस्थेत अशी ५० बालके आहेत. जिल्ह्यातील अशा आणखी बालकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न संस्थेमार्फत केला जात आहे. आजची बालके ही उद्याचे नागरिक आहेत, याचा विचार करून सहारा प्रकल्पातील बालकांना चांगले शिक्षण दिले जाते, त्यांचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले जाते आणि मूल्यशिक्षण देऊन त्यांना घडवण्याचे कार्य केले जात आहे. तसेच या बालकांना स्वयंपूर्ण बनवण्याचे काम केले जाते. या बालकांसाठी भविष्यात पुनर्वसन प्रकल्प उभारण्याची योजनाही संस्थेमार्फत आखली जात आहे.  

स्वआधार प्रकल्प :
सहारा प्रकल्पाबरोबरच तुळजाई प्रतिष्ठानने मानसिक विकलांग मुलींसाठी ‘स्वआधार’ हा प्रकल्प सुरू केला आहे. मराठवाड्यात प्रथमच मानसिक विकलांग म्हणजेच मतिमंद मुलींच्या संगोपनासाठी संस्थेने २००८मध्ये हे कार्य सुरू केले. सद्यस्थितीमध्ये या प्रकल्पांतर्गत ४४ मुलींना आधार देण्याचे कार्य संस्था करत आहे. या मुली मानसिक विकलांग, शारीरिक दुर्बल असल्याने त्यांचे पालक प्रतिष्ठेचे कारण देत किंवा आर्थिक परिस्थितीमुळे औषधीचा खर्च झेपत नसल्याचे कारण देत त्यांना बेवारस अवस्थेत सोडून जातात असे लक्षात आले आहे. 

या मुलींचे जीवन हे निरागस फुलांसारखे आहे. या मानसिक विकलांग मुलींना आधार देण्याचे, प्रेम देण्याचे काम स्वआधार संस्था करत आहे. परंतु असे असताना या मुली आता आयुष्यभर या प्रकल्पात राहणार आहेत याचा विचार करता संस्थेला त्यांच्या आरोग्याची, इतर सोयी-सुविधांची तजवीज करणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारकडून मिळणारे अनुदान हे खूपच तुटपुंजे आहे. त्यामुळे समाजाने सढळ हाताने या मुलींच्या कल्याणासाठी संस्थेला मदत करावी, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे. 

संस्थेने या दोन्ही प्रकल्पांसाठी भविष्यात साकारता येतील अशा अनेकविध योजना आखल्या आहेत. यामध्ये अनाथ मतिमंद मुलींसाठी पुनर्वसन प्रकल्प, संस्थेच्या जागेत औषधी वनस्पतींची लागवड, जिल्ह्यातील किमान १०० एड्सबाधित मुलांना हक्काचा निवारा मिळवून देणे, उस्मानाबाद शहरालगत सुसज्ज असा एक वृद्धाश्रम उभारणे अशा काही योजनांचा समावेश आहे. 

सहारा प्रकल्पातील एड्सबाधित बालकांना आणि मतिमंद बेवारस मुलींचे शिक्षण व पुनर्वसनासहित या बालकांना स्वयंपूर्ण बनवणे आवश्यक असल्याने, तसेच त्यांना आरोग्याच्या सुविधा लवकर मिळण्यासाठी संस्थेने उस्मानाबाद शहराजवळ गडपाटीमध्ये चार एकर जमीन घेतली आहे. या दोन्हीही प्रकल्पांची विद्यमान इमारत भाड्याची असून, ती लहान आहे. हे लक्षात घेता या चार एकरांत हे दोन्ही प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. या बालकांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांना आनंद देण्यासाठी समाजघटकांनी आपापला खारीचा वाटा उचलून सहकार्य करण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे. 

संस्थेला मदत म्हणून आपण काय करू शकतो यासाठीही संस्थेने काही बाबी सांगितल्या आहेत. यामध्ये आपण आपला वेळ संस्थेसाठी देऊ शकतो, येथील मुलांचे पालकत्व घेऊ शकतो, संस्थेला आर्थिक किंवा धान्यरूपी किंवा साहित्यरूपी मदत करू शकतो, मुलांसाठी शालेय साहित्य देऊ शकतो, आपल्या किंवा स्नेहीजनांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेत स्नेहभोजन देऊ शकतो, बांधकामासाठी निधी देऊ शकतो किंवा संस्थेच्या आवारात वृक्षारोपण करू शकतो, असे संस्थेने म्हटले आहे. 

संपर्क :
तुळजाई प्रतिष्ठान संचलित स्वआधार मतिमंद मुलींचा प्रकल्प,
आळणी, उस्मानाबाद.
मोबाइल : ७०५७८ २७३१७, ९५९५० ९६२८३ 
ई-मेल : swaadhar.mr@gmail.com
फेसबुक : https://goo.gl/VQZPK6

(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध होतील.)

(संस्थेची माहिती देणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Charan pande About 35 Days ago
Charan pande
0
0

Select Language
Share Link