Next
‘विक्रांत-ईशा’ची स्टायलिस्ट मुंबईची, तर गुरुजी पुण्याचे
BOI
Saturday, January 12, 2019 | 04:18 PM
15 0 0
Share this article:


पुणे : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती ‘विकीशा’च्या लग्नाची. ‘विकीशा’ म्हणजे तेच ते विक्रांत सरंजामे आणि ईशा निमकर. ‘तुला पाहते रे’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेतील बिझनेस टायकून विक्रांत सरंजामे आणि चाळीत राहणारी ईशा निमकर यांच्या शाही लग्नाची जय्यत तयारी हा सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय आहे. 

हे लग्न अगदी खऱ्याखुऱ्या राजेशाही लग्नासारखे वाटावे यासाठी या जोडीचे पोशाख, हेअर स्टाइल, लूक सगळ्यावर प्रचंड मेहनत घेण्यात आली आहे. तसेच लग्नातील विधीही अगदी पारंपरिक पद्धतीने करून चित्रित करण्यात आले आहेत. या जोडीचे लग्नाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमातील फोटो व्हायरल झाले आहेत. त्यातील त्यांचे पोशाख, लूक याबद्दल खूप कौतुक होत आहे. त्या ‘लूक्स’साठी मेहनत घेतली आहे मुंबईची स्टायलिस्ट आणि अभिनेत्री शाल्मली टोळ्ये हिने. तसेच, या लग्नाचे पौरोहित्य केले आहे पुण्यातील वेदमूर्ती धनंजय घाटे गुरुजी यांनी. या दोघांशी संवाद साधून ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने त्यांचे अनुभव जाणून घेतले.

शाल्मली टोळ्ये
‘‘विकीशा’चा लग्नातील लूक, कपडे, स्टाइल याबद्दल सगळीकडेच खूप चर्चा होत आहे. लोकांना ईशाचा लूक, तिची हेअरस्टाइल, दागिने, बाकी अॅसेसरीज आणि एकूणच तिचे व्यक्तिमत्त्व आवडत आहे. विक्रांत सरंजामे यांचाही बदललेला लूक प्रेक्षकांना मोहवणारा आहे. याबद्दल खूप चांगल्या प्रतिक्रिया माझ्याकडे येत आहेत. लोक कौतुक करत आहेत. हे बघून खूप आनंद होतोय. आपण केलेल्या मेहनतीचे सार्थक झाल्यासारखे वाटतेय. हा सगळा खेळ दोन-तीन दिवसांमध्ये दिसणार असला, तरी त्यासाठी आम्ही गेला महिनाभर प्रचंड मेहनत घेतोय,’ असे शाल्मलीने सांगितले.

‘या दोघांचे कपडे कृतिका दीक्षित हिने डिझाइन केले आहेत. ईशा आणि विक्रांत यांचा लूक कसा असला पाहिजे, कोणत्या कार्यक्रमात कोणते कपडे चांगले दिसतील, ते ‘हटके’ कसे असतील, दागिने कोणते असले पाहिजेत, त्यांची हेअरस्टाइल, चप्पल, शूज, पर्सेस, अशा सगळ्या बारीकसारीक गोष्टींचा विचार करून मी त्यांचे स्टायलिंग केले आहे. याकरिता अनेक डिझायनर्सना भेटून त्यांच्याकडे काय खास गोष्टी उपलब्ध आहेत, याची माहिती घेतली. आपल्याला हव्या तशा गोष्टी कुठे मिळतील, हे शोधून त्या मिळवल्या आणि मग प्रत्येक प्रसंगात खास दिसेल अशा पद्धतीने विक्रांत-ईशा ही जोडी नटली,’ असे शाल्मली म्हणाली.


‘हे खूप आव्हानात्मक काम होते. कारण हे लग्न अत्यंत गर्भश्रीमंत व्यावसायिकाचे वाटले पाहिजे. तसेच ईशा आणि विक्रांत यांच्या वयातील फरक जाणवला पाहिजे. ईशा अगदी निरागस, गरीब घरातून आलेली  युवती आहे. त्यामुळे अचानक तिचा लूक एकदमच आधुनिक थाटाचा किंवा अवघडलेपण येईल असा होणे चांगले दिसले नसते. तिची ती इमेज जपत तिचे सौंदर्य खुलवणे गरजेचे होते. याकरिता तिचे कपडे, दागिने, हेअरस्टाइल ठरवताना खूप काळजी घ्यावी लागली. तेच विक्रांतबाबत. लग्नासाठी त्याचा लूक बदलेला दाखविणे आवश्यक होते. त्यामुळे त्याची हेअरस्टाइल, त्याचे खास पोशाख, दागिने या सगळ्या बाबी खूप विचारपूर्वक ठरवल्या. त्याचा परिणाम आता दिसतोय. सगळ्यांना ही जोडी खूप आवडतेय. त्यांचा लग्नसोहळा बघण्यासाठी लोक उत्सुक आहेत,’ असे शाल्मलीने नमूद केले.  

‘मालिकेचे शूटिंग सुरू असताना शेवटच्या क्षणी कोणतीही अडचण येऊ शकते. अशा वेळी प्रसंगावधान राखून निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते. सतत काय वेगळे मिळेल, याचा शोध घ्यावा लागतो. अगदी बारीक बारीक गोष्टींकडे प्रेक्षकांचे लक्ष असते. त्यामुळे खूप जागरूकपणे सगळ्या गोष्टींचे भान ठेवून, प्रेक्षकांच्या भावनांना धक्का लागणार नाही, याची काळजी घेत काम करावे लागते,’ असे शाल्मली म्हणाली.

या मालिकेतील मुख्य जोडीसह ईशाची आई, विक्रांतची आई, त्याची वाहिनी सोनिया आणि मायरा यांचेही स्टायलिंग शाल्मलीने केले आहे. हा खूप काही शिकवणारा, आत्मविश्वास वाढवणारा, आनंददायी अनुभव असल्याची भावना तिने व्यक्त केली. 

‘मला स्वतःला नटायला आवडते. कोणत्या कार्यक्रमाला आपण कसे दिसले पाहिजे, त्यासाठी पोशाख कसा असला पाहिजे, दागिने, पर्स, चप्पल या सगळ्या बाबी कशा असल्या पाहिजेत, याबाबत मी खूप चोखंदळ आहे. प्रार्थना बेहेरे, ऋता दुर्गुळे, गिरीजा ओक, स्वप्नाली पाटील, शृजा प्रभुदेसाई या माझ्या मैत्रिणी नेहमी माझ्या स्टाइल्सचे, माझ्या सेन्सचे कौतुक करतात. माझी मदत घेतात. या सगळ्यांच्या सततच्या आग्रहामुळे मी या कामाबाबत गांभीर्याने विचार केला. ‘तुला पाहते रे’ मालिकेचे निर्माते अतुल आणि अपर्णा केतकर यांनी या मालिकेसाठी हे काम करशील का, असे विचारले, तेव्हा एक वेगळा अनुभव म्हणून हे काम स्वीकारले,’ असे शाल्मलीने सांगितले.

पौरोहित्य घाटे गुरुजींकडे...

विक्रांत सरंजामे आणि ईशा निमकर यांचा विवाहसोहळा अगदी खराच वाटावा म्हणून ज्या ज्या गोष्टी करण्यात आल्या आहेत, त्यापैकीच एक म्हणजे पौरोहित्य. या मालिकेतील विवाहाचे पौरोहित्य केले आहे पुण्यातील वेदमूर्ती धनंजय घाटे गुरुजी यांनी. बहुतेक वेळा मालिका किंवा चित्रपटांमधील विवाहाच्या प्रसंगी पौरोहित्य करणारा कोणी तरी कलाकारच असतो. त्यातील मंत्रोच्चार योग्य पद्धतीने केले जात नसल्याचे अनेकदा दिसते. ‘तुला पाहते रे’मध्ये मात्र विवाहसोहळा अगदी खरा वाटण्यासाठी प्रत्यक्ष पौरोहित्य करणाऱ्या ज्येष्ठ गुरुजींनाच ती भूमिका देण्यात आली आहे. 

‘तुला पाहते रे’मधील विक्रांत आणि ईशा यांच्यासह वेदमूर्ती घाटे गुरुजी

पुण्यातील वेदमूर्ती धनंजय घाटे गुरुजी १९८५पासून पौरोहित्य करतात. या कालावधीत त्यांनी जवळपास चार हजार विवाहांचे पौरोहित्य केल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील दगडूशेठ हलवाई ट्रस्ट गणपतीच्या गणेशोत्सवातील पूजेची व्यवस्था घाटे गुरुजींकडे असते. तसेच पुणे फेस्टिव्हलमध्येही पहिल्या दोन-तीन वर्षांचा अपवाद वगळता प्रत्येक वर्षी त्यांचा सहभाग असल्याचे ते म्हणाले. ‘तुला पाहते रे’चे निर्माते केतकर यांच्या विवाहाचे पौरोहित्यही घाटे गुरुजींनी केले होते. त्यामुळे त्यांच्याकडून याबाबत विचारणा झाली, असे त्यांनी सांगितले.

‘विक्रांत आणि ईशाच्या विवाहसोहळ्यात प्रत्यक्ष लग्नाप्रमाणेच सर्व विधींचे चित्रीकरण करण्यात आले आहे. सप्तपदी, लाजाहोम, ऐरणीपूजन वगैरे विधींचा समावेश त्यात आहे. पौरोहित्य हा नेहमीच्या जीवनाचा भाग असल्यामुळे ते करताना वेगळे काही वाटले नाही; मात्र चित्रीकरण, डबिंग वगैरे सगळ्या प्रक्रियेचा अनुभव घेता आला. तो नक्कीच वेगळा अनुभव होता,’ असे घाटे गुरुजींनी सांगितले. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search