Next
‘हमीद दलवाईंचे विचार विचार करायला लावणारे’
BOI
Monday, November 06 | 05:09 PM
15 0 0
Share this story

चिपळूण : ‘महात्मा गांधींनंतर ज्येष्ठ साहित्यिक हमीद दलवाई यांचे विचार विचार करायला लावणारे असल्याने त्यांचे हे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण त्यांच्या जीवनावरील माहितीपट तयार करत आहे,’ अशी माहिती दिग्दर्शिका व ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी दिली.

दलवाई यांच्या जीवनावरील माहितीपटासाठी त्यांच्या जन्मगावी मिरजोळी येथे शुक्रवारपासून ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा, अभिनेत्री अमृता सुभाष यांच्या उपस्थितीत चित्रिकरणास प्रारंभ झाला. दलवाई यांचे साहित्य प्रभावी असल्याने आजही मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कार्य पुढे सुरू रहावे म्हणून त्यांच्या पत्नी मैरूनिसा दलवाई यांनी हमीद दलवाई फाउंडेशनची स्थापना केली. या फाउंडेशनच्या माध्यमातून ठिकठिकाणी विविध कार्यक्रम राबवले जातात. यातूनच काही वर्षांपूर्वी मिरजोळी येथे हमीद दलवाई स्मृती भवन साकारण्यात आले. या भवनातही अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. चार महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नी मैरूनिसा दलवाई यांचे निधन झाले आहे.

हमीद दलवाईदलवाई यांचे कार्य अखंड ठेवण्यासाठी त्यांचे कुटुंब नेहमीच पुढाकार घेते. यातूनच हा माहितीपट तयार केला जात आहे. नसीरुद्दीन शहा दलवाई यांची भूमिका साकारणार असून त्यांना अमृता सुभाष व ज्योती सुभाष साथ देत आहेत. शुक्रवारी खासदार हुसेन दलवाई यांच्या उपस्थितीत या चित्रिकरणास प्रारंभ झाला आहे. सकाळी सात वाजल्यापासून दलवाई यांच्या निवासस्थानाबरोबरच स्मृतिभवन येथे, तर सायंकाळी कालुस्ते येथे चित्रिकरण झाले.

खासदार हुसेन दलवाई, दलवाई जमातीचे चेअरमन जियाउद्दीन दलवाई, अर्बन बँकेचे संचालक रहिमान दलवाई यांच्या हस्ते या तीन अभिनेत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अंनिसचे हमीद दाभोळकर, मिरजोळीच्या सरपंच कनिज दलवाई, ज्येष्ठ सदस्य अहमद दलवाई, माजी तंटामुक्त अध्यक्ष खालीद दलवाई, माजी उपसरपंच कमलाकर आंब्रे, खलील दलवाई, हमिद दलवाईंच्या ज्येष्ठ कन्या रूबिना दलवाई, बशीर दलवाई, अजमल दलवाई, कबीर दलवाई, अन्वर दलवाई आदी उपस्थित होते.

ज्योती सुभाष म्हणाल्या, ‘हमीद दलवाईंचे सामाजिक कार्य, लिखाण स्फूर्तीदायक आहे. धर्माच्या संबंधातील त्यांचे विचार भावनेच्या पलिकडेचे आहेत. आपण राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्या असून दलवाई यांनी आपल्या सातारा-रेहमतपूर गावाला भेट दिली होती. त्यांच्याबाबत आपल्याला बरीच माहिती आहे. त्यामुळे त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा माहितीपट काढत आहोत. खासदार दलवाई, अहमद दलवाई यांनी त्यांच्या अनेक आठवणी सांगितल्या असून त्याचाही या माहितीपटात समावेश करून घेतला जाणार जाईल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link