पुणे : ‘विद्यार्थ्यांमधील कला-गुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर विविध उपक्रम होत असतात. त्याचा फायदा करून घेत विद्यार्थ्यांनी संशोधन करण्यावर भर दिला पाहिजे. नाविन्यपूर्ण कल्पना आणि संशोधक वृत्ती असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील काळात अनेक संधी आहेत,’ असे प्रतिपादन सासवड येथील गुरुकुल अॅकॅडमीच्या संचालिका उषा टिळेकर यांनी केले.
केजे शिक्षण संस्थेच्या ट्रिनिटी अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालयात ‘ग्रॅव्हिटी २०१९’ या राज्यस्तरीय परिसंवाद आणि विज्ञान संमेलनाचे आयोजन केले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या प्रसंगी अभियांत्रिकी तज्ज्ञ श्रीरंग घडियालजी, केजे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, डॉ. व्यासराज काखंडकी, सुनंदा जाधव, संस्थेचे खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, संचालिका विभावरी जाधव, ट्रिनिटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिभाऊ फाकटकर, यंत्र अभियांत्रिकी शाखेचे प्रमुख डॉ. बी. एम. शिंदे, समन्वयिका प्रा. प्रतिभा चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
घडियालजी म्हणाले, ‘उद्योग क्षेत्राला कुशल मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या गरजा ओळखून विद्यार्थ्यांनी संशोधन व प्रकल्पांवर आधारित कौशल्य आत्मसात करण्यावर लक्ष द्यावे. आपल्या संशोधनाचे पेटंट करावे. समाजातील समस्या सोडविणारे आपले संशोधन असले पाहिजे.’
‘ग्रॅव्हिटी’ महोत्सवात अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, स्थापत्यकला, व्यवसाय शिक्षण या शाखेच्या तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी २७ वेगवेगळ्या तांत्रिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसीय या महोत्सवात पाचशेपेक्षा अधिक संशोधन प्रकल्प आणि पोस्टर्स सहभागी झाले. राज्यभरातून विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कल्याण जाधव, डॉ. हेमंत अभ्यंकर, डॉ. व्यासराज काखंडकी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.