Next
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात रिसर्च आविष्कार स्पर्धा
प्रेस रिलीज
Saturday, October 20 | 10:34 AM
15 0 0
Share this story



औंध : रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात रिसर्च आविष्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डेप्युटी रजिस्ट्रार एम. व्ही. रासवे, सेवानिवृत्त प्राध्यापिका डॉ. मृदुला कर्णिक उपस्थित होत्या.  



विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रासवे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी आपल्यामधील कलागुण ओळखून सृष्टीमधील नाविन्यपूर्ण गोष्टींचा शोध लावला पाहिजे. रिसर्च आविष्कार स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती वाढीस लागणार आहे. वर्तमानपत्रांमधून वेगवेगळे कार्टून दाखवले जातात. तोसुद्धा एकप्रकारे नाविन्यपूर्ण असा आविष्कारच आहे. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांची वैचारिक क्षमता वाढीस लागणार आहे. त्यामुळेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नाविन्यपूर्ण आणि एक स्वतंत्र वेबसाइट तयार केली आहे. त्याच्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या मनातील कल्पना त्यावर सांगू शकतात. त्यामुळे अनेक नाविन्यपूर्ण शोधांची माहिती एकत्रितरित्या विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे.’

विद्यार्थ्यांनी अपयशावर मात करून जीवनात यशस्वी व्हावे, असा संदेश देताना डॉ. रासवे यांनी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे कौतुक केले.



डॉ. कर्णिक म्हणाल्या, ‘आपण नाविन्यपूर्ण विचार करतो, शोध लावतो, तेव्हा त्याला नाविन्यपूर्ण रिसर्च म्हणतात. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक राजहंस दडलेला असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी साचेबंद विचार न करता सार्वत्रिक दृष्टीने विचार करायला पाहिजे. आपण नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी विचार करायला लागल्यास आपला रिसर्च नाविन्यपूर्ण ठरतो. नाविन्यपूर्ण शोधामुळे अनेकांचे कल्याण होणार असेल, तर तो रिसर्च चांगला ठरतो. आजपर्यंत मानवाने अनेक शोध लावले आहेत. प्रत्येक शोध एकापेक्षा वेगळा नाविन्यपूर्ण असल्याचे दिसून येते.’



महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या, ‘रयत शिक्षण संस्था शताब्दी महोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्त महाविद्यालयीन पातळीवर या रिसर्च आविष्कार स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. या स्पर्धेमधून तरुण मुला-मुलींच्या संशोधन वृत्तीला वाव मिळणार आहे. आजच्या तरुणांना संशोधनामध्ये उंच भरारी घेण्यासाठी मोठी संधी आहे. विद्यार्थ्यांनी छोट्या मोठ्या रिसर्च आविष्कार स्पर्धेत सहभागी होऊन केंद्र शासनाच्या रिसर्च आविष्कार स्पर्धेच्या माध्यमातून पेटंट मिळवण्यापर्यंत मजल मारावी.’



पाहुण्यांची ओळख व प्रास्ताविक प्रा. डॉ. सुहास निंबाळकर यांनी केले. प्रा. डॉ. संजय नगरकर यांनी आभार मानले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, रिसर्च आविष्कार कमिटीचे समन्वयक प्रा. कुशल पाखले, प्रा. मयुर माळी, डॉ. सविता पाटील, प्रा. शशी कराळे, डॉ. तानाजी हातेकर, प्रा. एकनाथ झावरे, प्रा. भीमराव पाटील, प्रा. सुप्रिया पवार, प्रा. असावरी शेवाळे, प्रा. सायली गोसावी, प्रा. किरण कुंभार, प्रा. प्रदीप भिसे, प्रा. हर्षकुमार घळके, डॉ. अतुल चौरे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link