Next
कागदाच्या लगद्याच्या गणेशमूर्ती मुंबईतून परदेशात
प्रशांत सिनकर
Friday, September 07, 2018 | 05:25 PM
15 0 0
Share this article:ठाणे : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत अलीकडे आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर जागृती केली जात आहे. त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या मूर्ती वापरणे किंवा जलस्रोतांत त्यांचे विसर्जन न करणे वगैरे गोष्टी हळूहळू केल्या जाऊ लागल्या आहेत. परदेशात प्रदूषणाबाबतचे नियम अत्यंत काटेकोर असल्याने मूर्ती विसर्जन अवघड ठरते; मात्र कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या मूर्तींच्या विसर्जनाचा अडसर येत नसल्याने परदेशात या मूर्तींची मागणी वाढते आहे. नवी मुंबई आणि कुर्ला येथील प्रथमेश इको-फ्रेंडली या संस्थेच्या कारखान्यात अशा प्रकारे बनविलेल्या मूर्ती अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इंग्लंड, न्यूझीलंड आदी देशांत गेल्या आहेत. परदेशात स्थायिक झालेले अनेक भारतीय तिथे गणेशोत्सव साजरा करतात. परंतु हा उत्सव साजरा करताना कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होऊ नये, यासाठी अनेक निर्बंधही घातले जातात. त्यामुळे परदेशात उत्सव साजरा करताना धातू अथवा फायबरच्या गणेशमूर्तींची पूजा करण्यावर भर दिला जातो. परंतु कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाला पाश्चिमात्य देशांत परवानगी देण्यात आल्याने तशा मूर्तींची मागणी वाढल्याची माहिती प्रथमेश इको-फ्रेंडली संस्थेचे संदीप गजाकोश यांनी  दिली.अमेरिकेतील टेक्सास शहरात बी. एफ. संधू टेम्पल सोसायटीचे एकता मंदिर आहे. टेक्सासमध्ये मराठी, गुजराती, पंजाबी, तामिळ असे सर्व राज्यांतील नागरिक रहातात. त्यामुळे वर्षभर भारतीय सण-उत्सव साजरे केले जात असतात. विशेषकरून गणेशोत्सवाला आगळे महत्त्व आहे. मूर्ती विसर्जनामुळे जलप्रदूषणाचा धोका असल्यामुळे तेथे विसर्जनाला परवानगी नव्हती. त्यामुळे या ठिकाणी दर वर्षी फायबरच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात होती. परंतु, कागदी मूर्तींच्या विसर्जनामुळे प्रदूषण होत नसल्याचा दाखला तेथील एका प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे गेल्या सात वर्षांपासून कागदाच्या लगद्यापासून आम्ही बनविलेल्या मूर्ती तिकडे पाठवत आहोत, असे गजाकोश यांनी सांगितले. यंदा टेक्सासमध्ये पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती असलेली सहा फूट उंचीची मूर्ती पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

उंच आणि मोठ्या मूर्तीही वजनाला हलक्या
शाडू मातीच्या मूर्तीपेक्षा कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या मूर्ती वजनाला हलक्या असून, किमतीच्या बाबतीतही स्वस्त असतात. शाडू मातीने तयार केलेल्या मूर्ती लांबच्या प्रवासात हाताळणेही कठीण असते. त्यामुळे परदेशात लगद्यापासून बनविलेल्या मूर्तींना पसंती दिली जाते. गजाकोश यांच्या संस्थेत बनविलेल्या मूर्ती अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, मॉरिशस, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसारख्या देशांमध्ये गेल्या आहेत. एका मूर्तीची उंची दहा फूट असून, मुंबईतील विक्रोळी बाल विकास मित्रमंडळाची पंचमुखी गणेशमूर्ती पंधरा फूट उंचीची आहे. ती  कागदाचा लगदा आणि शाडूच्या मातीपासून बनविण्यात आली आहे. 

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील गणेशोत्सवाच्या विशेष बातम्या व लेख https://goo.gl/X8v1iW या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search