Next
लीडर नदीचं उगमस्थान : शेषनाग
BOI
Saturday, April 07, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this story

शेषनाग तलाव

समोर एक छोटासा पाण्याचा डोह दिसला. वाह शेषनाग जवळ आलं तर! जी लीडर नदी पहलगामपासून सोबत होती. ती इथे डोहासारखी दिसत होती. पुन्हा समोर गेलो आणि कधीही न विसरता येणारं दृश्य दिसलं. पहाडांनी वेढलेला एक तलाव. स्थिर पाणी. एक खूप गूढ जागा. लीडर नदीचं उगमस्थान. ते शेषनाग होतं.... स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटकंतीच्या ‘अमरनाथ ट्रेक’ या ट्रॅव्हलॉगचा हा तेविसावा भाग.. 
.............................
अभिजित पानसेसमोर रस्ता अखंड पुढे पुढे चालतच होता. त्याच्यासोबत त्याच्या वेगाने चालणं अशक्य होतं. चालताना डाव्या बाजूला एक सुंदर नैसर्गिक निर्मिती दिसली. बर्फाची गुहा! वरून पहाडाच्या कड्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या स्रोताचा बर्फ झालेला, त्याचे रूपांतर खाली रस्त्यावर एका गुहेत झालं. खूप भन्नाट निर्मिती होती ती. ती गुहा इग्लूसारखी दिसणारी होती. तिच्या आत किमान दहा लोक उभं राहू शकतील इतकी जागा होती. वर टणक बर्फाचं छप्पर. प्रवेशद्वाराजवळ कडेने पाणी ओघळत होतं. 

शेषनागआत बरेच लोक जात होते. मी ही फोटो काढले. तेवढ्या प्रवासात दिसलेली ही एक सर्वोत्तम गोष्ट होती. निसर्ग काय काय जादू करतो, हे त्याच्या सानिध्यात गेल्यावरच कळतं. तिथे थोडा वेळ थांबलो. पुन्हा आपला दांडी मार्च.. शेषनाग मार्च सुरू केला. रस्ता सरळसोट होता. खाली लीडर बर्फ झाली होती. थंडी चांगलीच वाढली होती. तीन एक किमी चालत गेलो. तेवढ्यात मध्येच एक पाण्याचा मोठा स्रोत पहाडावरून खाली येऊन रस्त्यावरून खाली जात होता. हा पार करणं थोडं जिकिरीचं होतं, कारण थोडासा वेग जास्त होता, शिवाय दगड फार कमी होते. पुन्हा एकदा सॉक्स ओले करणं चुकीचा व्यवहार झाला असता. शेवटी खूप विचार केल्यावर ठरवलं की बूट आणि सॉक्स काढून हातात घ्यायचे आणि मोकळ्या पायानेच जाणं जायचं. तेवढ्यात काही लोक दगडावर पाय ठेवून जाताना बुटाने पाय घसरून पाण्यात पडता पडता वाचल्याचे दिसले. तेव्हा आपला निर्णय योग्य होता याचे समाधान वाटले. 

पुढच्यास ठेच.. पुढचा घसरला.. मागचा शहाणा.. एका हातात लाठी, जोडे सॉक्स, दुसऱ्या हातात पाण्याची बाटली आणि पाठीवर बॅग घेऊन पाण्यात पाय टाकला. पाणी बर्फाचं होतं. गारेगार. प्रवाह पार केला. पुन्हा आपला ‘शेषनाग मार्च’ जुलैत सुरू केला. मध्ये मध्ये थांबत चालत होतो. पुन्हा एक पास लागला. पास म्हणजे खिंड. एका छोट्याश्या वळणावर असलेला निमुळता रस्ता. हा चढाव चढणं अत्यंत जिकिरीचं होतं. अंगातील त्राण गेला होता. मी पुन्हा मोबाईलच्या वायरी कानात अडकवून गाणी सुरू केली. 

रवींद्रनाथ टागोरांच्या कविता, गुलजार यांच्या आवाजातलं वाचन आणि  शान, श्रेया घोषाल यांचं गायन. मला नुकत्याच मिळाल्या होत्या त्या. मोठ्या आवाजात ते ऐकू लागलो. गुलजारांचा खर्जातला आवाज.. अप्रतिम.. मी ते ऐकत, लक्ष त्यावर केंद्रित करून, चढण चढू लागलो. जबरदस्त दम लागत होता. मोठमोठ्या शिळा होत्या. मी खूप अंतर्मुख झालो होतो. जवळून पाण्याचा एक झरा वाहत होता. अंगावर तुषार उडत होते. हे सगळं शिवाचं निर्गुण रूप होतं माझ्यासाठी. मी वेगळ्याच तंद्रीत गेलो. रस्ता फारच चिंचोळा होता. प्रचंड दम लागत होता. भोवळ येऊन पडेल की काय, असं वाटत होतं. कसं पार केलं ते माझं मलाच आठवत नाही. फक्त इतकं आठवतं, की माझी छाती दुखायला लागली होती. हे चांगलं लक्षण नव्हतं. 

खिंड पार केल्यावर पुन्हा सरळ रस्ता सुरू झाला. आता इथंच पडून राहावं, असं वाटत होतं. शेषनाग अजून तीन किमी आहे, असं कळलं. माझी अवस्था बिकट होत होती. छाती खूप दुखायला लागली होती. श्वास घ्यायला त्रास होत होता. खाली मान करून यंत्रावत चालत होतो. प्रत्येक पावलागणिक खूप त्रास होत होता. पुन्हा एक चढाव. आता तर इथेच शेवटचा श्वास जाणार, असं वाटत होतं. तो ही पार केला आणि समोर एक छोटासा पाण्याचा डोह दिसला. वाह शेषनाग जवळ आलं तर! जी लीडर नदी पहलगामपासून सोबत होती. ती इथे डोहासारखी दिसत होती. पुन्हा समोर गेलो आणि कधीही न विसरता येणारं दृश्य दिसलं. पहाडांनी वेढलेला एक तलाव. स्थिर पाणी. एक खूप गूढ जागा. लीडर नदीचं उगमस्थान. ते शेषनाग होतं.

पाच वाजून गेले होते. मला वाटलं आलं आजचं राहण्याचं स्थळ. पण तिथून आणखी दोन किमी जायचं होतं. दूर तंबू दिसत होते. मी तिथेच कोसळणार का काय.. असं वाटू लागलं. शेषनागला प्राणवायूची कमतरता असते हे माहिती होतं. खूप मृत्यू होतात तिथे हे ही माहित होतं. माझी छाती ‘इमर्जन्सी’प्रमाणे दुखत होती. चालणं अशक्य. समोरील तंबूस्थानापर्यंत पोहचू शकेल का माहिती नव्हतं. किनारा जवळ असताना नाव बुडणार का काय.. अशी अवस्था झाली होती. सूर्यास्त कधीही होणार होता. तिथे थांबणं म्हणजे मृत्य अटळ.  मी तिथेच रस्त्याच्या कडेला झोपलो...
(क्रमशः) 
- अभिजित पानसे
मोबाइल : ८०८७९ २७२२१ 
ई-मेल : abhijeetpanse.1@gmail.com

(‘अमरनाथ ट्रेक’ हा ट्रॅव्हलॉग दर शनिवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/V6rLmU या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link