Next
एका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट
अनिकेत कोनकर
Friday, September 14, 2018 | 03:15 PM
15 1 0
Share this article:

सुभाष मेहतर

रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातले सुभाष मेहतर हे अत्यंत उत्तम मूर्तिकार आहेत. गणपतीच्या रेखीव मूर्ती ते घडवितात. लाकडावर चांगलं कोरीव काम करण्याचं कौशल्यही त्यांनी प्राप्त केलं आहे. लहानपणी दुर्दैवानं त्यांचे पाय अधू झाले; मात्र त्याचा बाऊ न करता त्यांनी कलेचा ध्यास घेतला, जिद्दीनं वाटचाल केली आणि यश खेचून आणलं. आज त्यांच्याकडच्या मूर्ती परदेशातही जातात. अशा या मूर्तिकाराची प्रेरणादायी गोष्ट...
...........
निसर्गानं आपल्या प्रत्येकाला सुंदर शरीर दिलं आहे. हात-पाय-डोळे-नाक-कान असे सगळे त्या शरीरातले अवयव आपापलं काम इमाने-इतबारे पार पाडत असतात, म्हणून सगळं व्यवस्थित चाललेलं असतं; पण त्यांनी आपलं काम अत्यंत उत्साहानं, पूर्ण क्षमतेनं आणि चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यासाठी जिद्द नावाचा एक प्रकार अत्यंत आवश्यक असतो. ही गोष्ट दैवी देणगी म्हणून मिळत नाही आणि तिचं अस्तित्व एखाद्या अवयवासारखं दिसतही नाही. ती आपल्या स्वतःलाच प्रयत्नपूर्वक फुलवावी लागते. आणि तशी ती फुलवली, तर त्या जोरावर माणूस वाट्टेल ते करू शकतो. मग शरीराचा एखादा अवयव अधू असला, तरी त्याचा त्या माणसाच्या वाटचालीच्या वेगात अडसर होत नाही. उलट ती वाटचाल इतरांनाही प्रेरणादायी आणि पथदर्शी होते. या सगळ्याचं मूर्तिमंत उदाहरण अनुभवायचं असलं, तर रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातल्या सुभाष तुकाराम मेहतर यांना भेटावं. काय आहे असं या माणसात? साधारण ४०-४२ वर्षं वय असलेला हा माणूस मूर्तिकार आहे... गणपतीच्या अत्यंत सुरेख, देखण्या, रेखीव मूर्ती यांच्या हातून आकार घेतात. दुर्दैवानं लहानपणीच, चार-पाच वर्षांचे असताना काही आजारामुळे त्यांच्या पायांना अधूपण आलं; पण वर म्हटल्याप्रमाणे त्यांनी स्वतःतली जिद्द अशी काही फुलवली आहे, की त्यामुळे त्यांच्या हातांमध्ये जादुई कलेचं कसब निर्माण झालं आहे. प्रत्यक्षात ते स्वतःच्या पायांवर उभे राहू शकत नसले, तरी आज ते लौकिकार्थाने स्वतःच्या पायावर उभे आहेत, स्वावलंबी आहेत आणि एकत्र कुटुंबात गुण्यागोविंदानं राहत आहेत. हेच या माणसाचं आणि त्यांच्या कुटुंबाचं वेगळेपण!त्यांच्याबद्दल कळलं, तेव्हा आवर्जून त्यांना भेटावं असं वाटलं आणि म्हणूनच लांज्याला गेलो. लांजा शहरातून वेरवली रस्त्यावर गेल्यावर साधारण तीन-चार किलोमीटर अंतरावर त्यांचं घर आणि मूर्तिशाळा आहे. सुभाष मेस्त्री या नावानं ते परिचित आहेत. मी गेलो तेव्हा गणेशोत्सव साधारण १०-१२ दिवसांवर येऊन ठेपला होता. त्यामुळे साहजिकच मूर्तिशाळेत कामाची गडबड सुरू होती. एकामागून एक गणेशमूर्ती सुभाष यांच्या हातून रंगरूप घेत होत्या. स्प्रे-पेटिंगच्या साह्यानं मूर्तींच्या अंगाचा रंग देण्याचं काम सुरू होतं. त्यांच्या पत्नी संचिता, बंधू महेश आणि काही सहकारीही मूर्तिशाळेतली आपापली कामं वेगानं हातावेगळी करत होते. त्यांच्या आई श्रीमती प्रभावतीदेखील तिथेच होत्या. सुभाष काम करत असतानाच त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. त्यातून एकेक गोष्टी उलगडत गेल्या. लांजा तालुक्यातलं प्रभानवल्ली हे त्यांचं मूळ गाव. वडील मुंबईला नोकरीला होते आणि आई कुंभारकाम करायची. एक बहीण आणि दोन भावांसह ही चार भावंडं. त्यात सुभाष सर्वांत मोठे. सुभाष लहान असताना अचानक काही तरी आजार झाला. स्थानिक डॉक्टरांचा काही उपाय चालेना म्हणून आणि वडील मुंबईला असल्याने त्याला तिकडे नेलं; मात्र तिथल्या हॉस्पिटलमध्येही काही झालं नाही आणि कायमचं अपंगत्व आपल्या मुलाच्या नशिबी आलं, ही नकोशी आठवण सांगताना त्या माऊलीच्या डोळ्यांत नकळत पाणी तरळलं; पण त्या अडचणीवर मात करून आपल्या मुलानं जिद्दीनं केलेली पुढची वाटचाल सांगताना त्यांचा ऊर अभिमानानं भरून येत होता. 

देव्हाऱ्यावरील कोरीव कामलहान असताना सुभाषला मित्र खांद्यावर उचलून शाळेत घेऊन जायचे; पण चौथीनंतर मात्र ते शक्य होईनासं झालं. त्यामुळे त्याची शाळा सुटली; पण सुभाषची शिक्षणाची आस मात्र कमी झाली नव्हती. पुढे वयाची अट भरल्यानंतर १७ क्रमांकाचा फॉर्म भरून त्यानं भांबेड हायस्कूलमधून बाहेरून दहावीची परीक्षा दिली. मित्रांच्या आणि शिक्षकांच्या मदतीने चांगला अभ्यास केलेला असल्यानं तो यशस्वीही झाला. वडील गेल्यानंतर आईनेच कुंभारकामासोबतच शेतमजूर म्हणून वगैरे कामं करून या सगळ्या मुलांना वाढवलं. दरम्यानच्या काळात, आईचं कुंभारकाम पाहून सुभाष यांनाही मातीकामाची आवड निर्माण झाली होती. वाकेड येथील दिनकर वासुदेव शिंदे हे मूर्तिकार या कुटुंबाच्या परिचयाचे होते. वयाच्या १७-१८व्या वर्षी सुभाष यांनी त्यांच्याकडे जायला सुरुवात केली. त्यांनी सुभाष यांना मूर्तिकामाचे धडे दिले.

लाकडावरील कोरीव काम
असलेली आवड आणि जिद्द यांना सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड मिळाल्यामुळे सुभाष यांची मूर्तिकला दिवसेंदिवस बहरत गेली. आपले पाय अधू आहेत, याचा जराही बाऊ न करता त्यांनी ध्यास घेऊन ती कला त्यांनी आत्मसात केली. एवढंच नव्हे, तर ते सुतारकामही शिकले. लाकडाच्या देव्हाऱ्यांवर किंवा अन्य वस्तूंवर ते फार उत्तम कोरीव कामही करतात. समर्पण वृत्तीनं काम केल्याशिवाय शक्य होण्यासारखी ही गोष्ट नव्हे. नऊ महिने सुतारकाम आणि गणेशोत्सवाच्या आधीचे तीन महिने मूर्तिकाम, असा त्यांच्या कामाचा क्रम आता ठरून गेला आहे. 

सुभाष यांच्या हस्तकौशल्यातून साकारलेली मूर्ती

सुभाष यांच्या हस्तकौशल्यातून साकारलेली मूर्ती

लाल मातीच्या आणि शाडूच्या मातीच्याच म्हणजेच पर्यावरणपूरक मूर्तीच सुभाष घडवितात. केवळ साच्यांमधूनच नव्हे, तर ग्राहकांच्या मागणीनुसार अनेक सुंदर गणेशमूर्ती ते हातीही घडवून देतात. साचे वारंवार अन्य कोणाकडून आणणं शक्य नसल्यामुळे आपण घडविलेल्या काही मूर्तींपासून साचेही त्यांनी स्वतःच तयार केले आहेत. या कामात कुटुंबीयांचा आपल्याला खूप मोठा आधार आहे, असं सुभाष यांनी आवर्जून सांगितलं. बंधू महेश आणि त्यांची पत्नी मानसी हे दाम्पत्य त्यांना मदत करतं. (दुसरा भाऊ मुंबईला असतो. बहिणीचं लग्न झालं.) 

सुभाष यांचे बंधू महेश आणि त्यांची पत्नी मानसी यांचीही त्यांना मोठी मदत आहे.

सुभाष यांची पत्नी संचिता

साधारण तीन वर्षांपूर्वी सुभाष यांचं लग्न झालं. त्यांच्या सौभाग्यवती संचिता यांच्याही पायाला थोडासा अधूपणा आहे; मात्र लग्न होऊन या घरात आल्यावर त्यांनीही मूर्तिशाळेत आपल्या पतीला साथ द्यायला सुरुवात केली. सहजीवन म्हणतात ते याला! (सुभाष-संचिता यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे.) त्याव्यतिरिक्त, राहुल पांचाळ, विशाल गिरकर, रोहित वामनसे, केदार पांचाळ, वितेश कसबले ही त्यांची वाकेडची मित्रमंडळीही त्यांना मदत करतात. 

सुभाष यांचे सहकारी

गेली साधारणपणे वीसहून अधिक वर्षं ते मूर्तिकाम करत आहेत. २००९मध्ये त्यांनी स्वतःची मूर्तिशाळा सुरू केली. त्या वेळी गजानन साळवी यांनी आर्थिक मदत केल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. तसंच, त्यांना पंतप्रधान रोजगार हमी योजनेचंही थोडंफार साह्य मिळालं. 

मूर्तिकामाव्यतिरिक्त त्यांनी मुक्त विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेतलं. ते कम्प्युटर, इंग्रजी, मराठी टायपिंग वगैरे शिकले, वेगवेगळ्या शहरांत जाऊन अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षाही दिल्या. शिकण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. नोकरीसाठीही त्यांनी प्रयत्न केले होते; मात्र नोकरीसाठी आधी डोनेशन भरायला हवं, असं काही ठिकाणी सांगण्यात आलं आणि ते साहजिकच त्यांना शक्य नव्हतं. अनेक प्रयत्न करून त्यांनी नंतर नोकरीचा मार्गच सोडून दिला आणि मूर्तिकाम व सुतारकामातच आपलं पूर्ण लक्ष केंद्रित केलं. सुरुवातीला त्यांच्याकडे १०-१५ मूर्तींची ऑर्डर असायची. आज हा आकडा साधारणपणे ४०० ते ४५०पर्यंत गेलाय. आज लांजा, वेरवली, भांबेड अशा आजूबाजूच्या अनेक गावांतून त्यांच्याकडच्या मूर्तींना मागणी आहे. गेली दोन-तीन वर्षं त्यांच्याकडच्या मूर्ती दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आदी देशांतही गेल्या आहेत. जीव ओतून काम करणं ही त्यांची खासियत असल्यानंच त्यांच्याकडच्या मूर्ती सर्वांना आवडतात आणि त्यांची कीर्ती परदेशातही जाऊन पोहोचली आहे. बोलता बोलता ‘आजच्या तरुण मुलांमध्ये एखादी गोष्ट आवडीनं करण्याचं प्रमाण कमी झालंय,’ असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं.

मेहतर कुटुंबीयांचे घर

सुभाष यांची दुचाकी

पूर्वी ते वाकेडलाच कामाला जायचे, नंतर लांज्यात भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेत त्यांचं काम सुरू होतं. काही वर्षांपूर्वी त्यांनी स्वतःचं घर बांधलंय आणि आता ते तिथेच काम करतात. पाय अधू असले, तरी ते कुणा दुसऱ्यावर अवलंबून नाहीत. कोणाच्याही घरी जाऊन सुतारकाम करण्याची आवश्यकता असेल, तर तिथे जाऊन करतात. दुचाकीही चालवतात. म्हणूनच या लेखाच्या सुरुवातीला म्हटलंय तसं, रूढार्थानं ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाहीत, हे खरं आहे; पण ते सत्य स्वीकारून त्यांनी जिद्दीनं केलेल्या कष्टांमुळे ते आज लौकिकार्थानं स्वतःच्या पायांवर उभे आहेत. ही नक्कीच प्रेरणादायी वाटचाल आहे. 

आई श्रीमती प्रभावती यांच्यासह सुभाष

तिथून निघताना त्यांच्या आईला विचारलं, ‘तुमच्या कुटुंबाचं वैशिष्ट्य काय सांगाल?’ त्या लगेच म्हणाल्या, ‘सगळे एकमेकांना विचारून राहतात (म्हणजे त्यांच्यात एकी आहे) आणि काहीही करायचं असलं, तरी मोठ्या भावाचा सल्ला घेतात. मुलं-बाळं गुण्यागोविंदानं नांदण्याव्यतिरिक्त आणखी काय हवं?’ या कुटुंबाकडे केवळ जिद्द आणि समर्पण भावनेनं काम करण्याची वृत्ती एवढंच नव्हे, तर एकमेकांबद्दलचा आदर, मायेचा ओलावा आणि समाधानही आहे, हे त्या आजींच्या वाक्यावरून प्रकर्षानं जाणवलं. आजच्या काळात बहुतांश ठिकाणी दिसणाऱ्या समस्यांवरचं उत्तरच जणू त्यांनी सांगितलं होतं. 

संपर्क : 
सुभाष मेहतर : ९६७३२ ७३१७३

(सुभाष मेहतर यांच्या मूर्तिशाळेचा व्हिडिओ सोबत देत आहोत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील गणेशोत्सवाच्या विशेष बातम्या व लेख https://goo.gl/X8v1iW या लिंकवर वाचता येतील.  )
 
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ashish About
Congratulations & Best Wishes for future
1
0
Jitendra Harishchandra Brid About
सुंदर ....... सुभाष जी आम्हाला तुमचा अभिमान आहे पुढील कामासाठी शुभेच्छा
2
0
MAKARAND About
श्री. सुभाष मेहतर यांच्या मुर्तीकलेस सलाम.
3
0

Select Language
Share Link
 
Search