Next
साधा मुहूर्ताच्या ट्रेडिंगची सुवर्णसंधी
BOI
Wednesday, November 07, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this story

दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर शेअर बाजारात मुहूर्ताचे ट्रेडिंग केले जाते. शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची ही एक पर्वणीच असते. यंदाही सात नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत मुहूर्ताचे ट्रेडिंग करण्याची सुवर्णसंधी आहे. या वेळी कोणते शेअर्स खरेदी करणे फायद्याचे ठरेल, याबाबत माहिती देत आहेत अर्थतज्ज्ञ डॉ. वसंत पटवर्धन
......
या वर्षी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आज, सात नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत आहे. सध्या शेअर बाजार तेजीत असल्याने अनेक शेअर्समध्ये येत्या वर्षभरात २५ ते ४० टक्क्यांपर्यंत नफा मिळणे अपेक्षित आहे; तरीही देशातील आणि जगातील राजकीय आणि आर्थिक परिस्थितीवर शेअर बाजार कसेही झोके घेऊ शकेल. या वर्षात राजस्थान, मध्य प्रदेश , तेलंगण या महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यातील यशापयशावर विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या एप्रिल २०१९मध्ये (किंवा तत्पूर्वी) अपेक्षित असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकतील. या गोष्टीचा त्या त्या वेळी शेअर बाजारावर परिणाम घडेल; पण बराचसा परिणाम विविध कंपन्या आपले जून, सप्टेंबर, डिसेंबर, मार्चचे त्रैमासिक विक्री व नफ्याचे आकडे कसे दाखवतात यावर अवलंबून राहील. 

सप्टेंबर २०१९च्या तिमाहीसाठी ग्राफाइट धातू उत्पादक कंपनी असलेल्या ‘हेग’ने प्रचंड नफा दाखवला आहे. सहामाहीचा (एप्रिल – सप्टेंबर) विचार केला, तर शेअरगणिक उपार्जन ४४० रुपये इतके झाले आहे. मार्च २०१९ला संपलेल्या वर्षासाठी ते ७५० रुपयांवर जाणार असेल, तर वर्षभरात शेअरचा भाव ५६०० रुपये व्हावा. या भावालाही किं/उ गुणोत्तर फक्त ७.२ पटच पडते. हा शेअर जरूर घ्यावा. 

त्याचप्रमाणे याच क्षेत्रातील ‘ग्राफाइट इंडिया’च्या शेअरचे मार्च २०१९ वर्षाचे उपार्जन २०० रुपयांवर दिसले. तिथेही सध्याच्या एक हजार रुपये भावाला किं/उ गुणोत्तर पाचपट दिसेल. हा शेअरही वर्षभरात १४०० रुपयांवर जावा. याखेरीज येस बँक, स्टरलाइट टेक्नॉलॉजीज, अशोक लेलँड, एल अँड टी इन्फोटेक, बजाज फायनान्स, मोल्ड्टेक पॅकेजिंग, दिवाण हाउसिंग, इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स, पिरामल एंटरप्रायजेस, मारुती सुझुकी, बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शिअल, ओएनजीसी, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, डी मार्ट (अॅव्हेन्यू एंटरप्रायजेस) या शेअर्सचाही विचार गुंतवणूकदार करू शकतात. 

गुंतवणुकीसाठी कितीही पर्याय असले, तरी आपल्या भागभांडारात दहापेक्षा जास्त कंपन्यांचे शेअर्स असू नयेत. अधिक कंपन्यांचे शेअर्स असतील, तर त्यांचे चढ उतार अभ्यासणे, त्रैमासिक आकड्यांचा अभ्यास करणे आणि पंचवीस टक्के नफा झाला, की विक्री करून नफा मिळवून घेणे, वाटल्यास पुन्हा त्याच शेअरमध्ये वाढत्या संख्येने गुंतवणूक करणे यावर लक्ष देणे कठीण होते. उदाहरणार्थ, बजाज फायनान्स शेअर २३०० रुपयांना घेतला व २६०० रुपयांना विकला, तर वाढलेल्या पैशात पुन्हा बजाज फायनान्सचे शंभरऐवजी १२० शेअर्स घेता येतील. असे काळजीपूर्वक व्यवहार करण्यासाठी शेअर बाजारामधील व्यवहाराची आवड हवी. व्यसन मात्र नको; नाही तर काही जण दूरदर्शन वाहिन्या दिवसभर बघण्यात बराच वेळ घालवतात तसे करू नये. 

(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत. शेअर बाजारातील गुंतवणूक आणि व्यवहारांसंदर्भात मार्गदर्शन करणारे त्यांचे सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link